माहुरात निर्जळी कायम; बंधाऱ्यातले पाणी नदीपात्रातच जिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 07:37 PM2018-04-10T19:37:54+5:302018-04-10T19:37:54+5:30

पैनगंगा नदीपात्र कोरडे पडल्याने माहूरला पाणीपुरवठा करणारी नळयोजना बंद पडल्याने गेल्या २० दिवसांपासून शहरात निर्जळी असून नगरपंचायतने ११ लाख रुपये भरुन उच्चपातळी बंधाऱ्यातून सोडवून घेतलेले पाणी नदीपात्रातच जिरले.

Moorish remains dry; The water from the bund was deposited in the river only | माहुरात निर्जळी कायम; बंधाऱ्यातले पाणी नदीपात्रातच जिरले

माहुरात निर्जळी कायम; बंधाऱ्यातले पाणी नदीपात्रातच जिरले

Next
ठळक मुद्देशहरात गतवर्षीपर्यंत ४० वर्षांपूर्वीच्या नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. श्रीदत्त जयंतीच्या वेळी नदीपात्रातील डोहांत पाणी असल्याने ४ दलघमी पाणी  कोल्हापुरी बंधाऱ्यात पोहोचले होते.

श्रीक्षेत्र माहूर : पैनगंगा नदीपात्र कोरडे पडल्याने माहूरला पाणीपुरवठा करणारी नळयोजना बंद पडल्याने गेल्या २० दिवसांपासून शहरात निर्जळी असून नगरपंचायतने ११ लाख रुपये भरुन उच्चपातळी बंधाऱ्यातून सोडवून घेतलेले पाणी नदीपात्रातच जिरले. परिणामी उन्हाळाभर पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी येण्याची शक्यता कमीच असल्याने शहरातील नागरिकांसह आलेल्या भाविकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

शहरात गतवर्षीपर्यंत ४० वर्षांपूर्वीच्या नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. कालवा योजना व देवस्थानांवरील योजनेच्या मोटारीद्वारे दररोज २० लक्ष लिटर पाणी घेतले जाते तर फिल्टरचे पाणी द्यावयाचे झाल्यास दररोज ४० लक्ष लिटर पाणी बंधाऱ्यातून घ्यावे लागणार आहे. धनोडा कोल्हापुरी बंधाऱ्यापासून हिंगणी-दिगडी उच्चपातळी बंधारा नदीमार्ग ९ कि.मी. आहे. भर उन्हाळ्यात २ दलघमी पाणी सोडल्यास ते पाणी नदीमार्गे पाणीपुरवठा योजनेच्या बंधाऱ्यात येईल. या शासकीय अंदाजानुसार ४ एप्रिल २०१८ रोजी ७ लक्ष २० हजार रुपये उर्ध्व पैनगंगा विभागाकडे न.प.ने भरले. या रकमेतून हिंगणी/ दिगडी कु या उच्चपातळी बंधाऱ्यातून २ दलघमी पाणी धनोडा नदीपात्रात सोडावयास पाहिजे असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसे न करता मोहपूर उ.पा. बंधाऱ्यातून १ दलघमी पाणी साकूर बंधाऱ्यातून हिंगणी दिगडी कु. बंधाऱ्यात सोडून फक्त १ दलघमी पाणी हिंगणी दिगडी बंधाऱ्यातून सोडल्याने ते पाणी धनोडा- माहूरपर्यंत पोहोचले नाही. यामुळे नदीपात्रात पाणी पिण्यासाठी येणारी जनावरे व काठावरील ३० कि.मी. परिसरातील शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे.   

पात्रातील खड्ड्यातच अडकले पाणी

श्रीदत्त जयंतीच्या वेळी नदीपात्रातील डोहांत पाणी असल्याने ४ दलघमी पाणी  कोल्हापुरी बंधाऱ्यात पोहोचले होते. यावेळी डोहातीलही पाणी आटले व दररोज नदीपात्रातून ५०० ब्रासपेक्षा वाळूची चोरी यामुळे नदीपात्रात प्रचंड मोठे खड्डे पडल्याने सोडलेले पाणी या खड्ड्यांत अडकल्याने दोन जेसीबी मशीनने पाण्यासाठी रस्ता बनवूनही पाणी माहूरला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यापासून एक किमी अंतरावर येऊन थांबले असून पूस धरणाचे पाणीही या ठिकाणापासून थोड्या अंतरावर दोन्ही नद्यांच्या संगमावर थांबले आहे. आणखी पाणी सोडल्याशिवाय हे पाणी बंधाऱ्यात येणार नसल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांसह पाणी पाहण्यासाठी गेलेल्या माहूरकरांतून येत आहेत.  मोहपूर बंधाऱ्यात ३ दलघमी पाणी तर साकूर बंधाऱ्यात ३ दलघमी पाणी तसेच हिंगणी-दिगडी कु. बंधाऱ्यात २ दलघमी पाणी उपलब्ध आहे. पैनगंगा नदीपात्रात येणाऱ्या नदीपात्रावरील वेणी धरण व पूस धरणातही भरपूर पाणीसाठा उपलब्ध आहे. कुठूनही १ दलघमी पाणी सोडल्यास कोल्हापुरी बंधारा ओसंडून वाहणार असून माहूरची पाणीसमस्या जूनपर्यंत निकाली निघणार आहे.

वाळू तस्करीने झाले नुकसान

पैनगंगा  नदीपात्रातील माहूर तालुक्यातील मौजे दिगडी कु., हडसनी रुई तर विदर्भातील महागाव तालुक्यातील नदीकिनाऱ्यावील वरोडी कवठा, थाट व हिवरा, अनंतवाडी या गावांच्या शिवारातून वाळू तस्करांनी प्रचंड प्रमाणात रस्ते बनवून वाळू उपसा केला आहे. माहूर व महागाव तहसीलदारांना या नदीपात्रात लक्ष ठेवणे अवघड जात असल्याने स्थानिक कर्मचारी याचा फायदा घेत वाळू तस्करांना ‘अर्थपूर्ण’ पाठिंबा देत असल्याने रात्र आणि दिवस धरुन ५०० च्यावर वाहने नदीपात्रात  जाऊन खुलेआम वाळूचोरी करतात. त्यातल्या त्यात रुई व थार यामधील नदीपात्रात २ किमीचा पाणी भरलेला डोह असून या डोहात बोट मशीन व जेसीबीद्वारे रात्रंदिवस वाळू उपसा केला जात असून यामुळे सोडलेले पाणी या डोहात अडकल्याने वाळूच्या तस्करीने शासनाचे नुकसान तर झाले; पण पाणी येथे अडकल्याने माहुरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून याला कारणीभूत कोण, याचा सध्या तरी शोध लागलेला नाही. 

योजना बंद पडल्याने शहराला माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी १३ कोटी रुपयांची नवीन नळयोजना मंजूर  करवून दिली. या योजनेचे स्टॉक टाके व वितरणनलिकेचे काम पूर्ण झाले. तूर्तास जुन्या टाक्यावरुन कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाणी शहराला देण्यात येत होते. श्रीदत्त जयंतीनिमित्त दिगडी-हिंगणी उच्चपातळी बंधाऱ्यातून २६ मार्च २०१८ रोजी ३ लक्ष ६० हजार रुपये खर्च पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. ४ आखाडा बाळापूर येथे भरुन १ दलघमी पाणी सोडवून घेण्यात आले. सोबतच विरा मार्ग येणाऱ्या (पूस) घटना होवूनही पाणी सोडण्यात आल्याने ते पाणी गेल्या २० दिवसांपर्यंत पुरले.

टँकरची मागणी केली आहे

हिंगणी-दिगडी कु. या उच्च पातळी बंधाऱ्यातून सोडलेले १ दलघमी पाणी नदीपात्रातील खड्डे व डोहांतच अडकल्याने पाणीपुरवठा योजनेपर्यंत पोहोचले नाही. म्हणून शासनाकडे ५ टँकरची मागणी केली आहे

-काकासाहेब डोईफोेडे, मुख्याधिकारी, न.पं. माहूर.

टँकर सुरू करीत आहोत

शर्थीचे प्रयत्न करुन पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी सर्व मान्यवरांनी मदत केली, परंतु नदीपात्रात सोडलेले पाणी नळयोजनेपर्यंत आले नसल्याने  १ दलघमी पाणी पुन्हा नदीपात्रात सोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. तोपर्यंत शहरात पाणीटंचाई निवारणार्थ टँकर सुरू करीत आहोत

- फिरोज दोसाणी, नगराध्यक्ष न.पं. माहूर.

Web Title: Moorish remains dry; The water from the bund was deposited in the river only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.