Marriage march against the Code of Conduct; Caution is required for cash | लग्नसराईला आचारसंहितेची आडकाठी; रोख रकमेबाबत खबरदारी आवश्यक
लग्नसराईला आचारसंहितेची आडकाठी; रोख रकमेबाबत खबरदारी आवश्यक

बिलोली : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. याचा फटका एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या लग्नसराईला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सोबत मोठी रक्कम ठेवणे डोकेदुखी ठरु शकते. यासाठी खबरदारी घ्यावी लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. बिलोलीपासून अवघ्या ९ किमी अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्याच्या सीमेवर गस्ती पथके तैनात केली असून त्यांच्यामार्फत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. आचारसंहितेनुसार १० हजारांहून अधिक रक्कम सोबत बाळगल्यास त्याबाबतची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता योग्य कागदपत्रे सादर केल्यास कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही. मात्र, कागदपत्रे नसल्यास त्यांना चौकशीला सामोरे जावे लागेल. योग्य कागदपत्रे नसल्यास रक्कम जप्त करण्यात येणार आहे. तेलंगणा राज्यात लग्नसराईच्या खरेदीसाठी बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक नागरिक खरेदीसाठी जातात.
लग्नासाठी सोने, कपडे, भांडी खरेदीसाठी मोठी रक्कम सोबत घ्यावी लागते. यावेळी आगामी दोन महिने अशी मोठी रक्कम बाळगताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. अधिक रक्कम असल्यास बँकेतून काढल्याची पावती अथवा एटीएम मधून घेतल्याची पावती सोबत ठेवावी लागणार आहे. सामान्य लग्नाबाबत परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. परंतु लग्नाला राजकीय नेते उपस्थित राहणार असतील तर खबरदारी घ्यावी लागेल.
ज्या ठिकाणी अधिक नागरिक जमा होतात, त्या ठिकाणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जेवणावेळी, पैशाचा वापर होण्याची शक्यता असते. यासाठी अधिकाºयांकडून खबरदारी घेण्यात येणार आहे.
एप्रिल, मे महिन्यात १९ मुहूर्त
एप्रिल व मे महिन्यात एकाचवेळी लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि लग्नसराईची झुंबड उडणार आहे. दोन महिन्यांत १९ विवाहमुहूर्त आहेत. एप्रिलमध्ये १७, १८, २२, २४, २६, २७ व २८ तर मे महिन्यात ७, ८, १२, १७, १९, २१, २३, २६, २९, ३०, ३१ रोजी विवाहमुहूर्त आहेत.
खरेदीसाठी जाणा-यांना फटका
आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने तेलंगणा- महाराष्ट्र सीमेवर नाके उभारले आहेत. याचा फटका प्रामुख्याने महाराष्ट्रातून परराज्यात ये- जा नागरिकांना सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात येणा-या-जाणा-या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. खरेदीसाठी सोबत घेतलेल्या पैशाबाबतची कागदपत्रे अधिका-यांना सादर करावी लागतील.


Web Title: Marriage march against the Code of Conduct; Caution is required for cash
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.