Kandahar taluka administration sarajave for the wipeout | पाणंदमुक्तीसाठी कंधार तालुका प्रशासन सरसावले
पाणंदमुक्तीसाठी कंधार तालुका प्रशासन सरसावले

ठळक मुद्दे वित्त आयोगातील पावणेअकरा कोटींतून ६० गावांवर लक्ष केंद्रित

गंगाधर तोगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
कंधार : तालुक्यातील ११६ पैकी ५६ ग्रामपंचायती पाणंदमुक्त झाल्या आहेत़ निधीची वाणवा असल्याने चौदाव्या वित्त आयोगातील शिल्लक व पहिला हप्ता अशा १० कोटी ७७ लाखांतून तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती प्रशासन सरसावले आहे़ नुकतेच प्राप्त झालेले २ कोटी व ग्रा़ पं़ खात्यावरील वित्त आयोगाच्या निधीतून ६० गावांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे समोर आले आहे़
तालुका पाणंदमुक्त करण्यासाठी सातत्याने निधीचा तुटवडा निर्माण होत असल्याने नागरिक, ग्रामसेवक, पं़स़ समिती अशा तिन्ही घटकांना नाहक त्रास होत आहे़ मिळणारा निधी व प्रस्तावांची संख्या यांचा ताळमेळ बसत नाही़ अशांमुळे तालुका पाणंदमुक्तीचा मुहूर्त सतत वाढत चालला आहे़ यासाठी वरिष्ठ पातळीवरून आर्थिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला़ ग्रामपंचायत स्तरावरील निधी, १४ व्या वित्त आयोगाचा ग्रा़ पं़ खात्यावरील निधी आदींचा वापर करून शौचालय बांधकाम करण्याची सूचना देण्यात आली़ त्यातून अनेक गावच्या सरपंचांनी तक्रारीचा सूर आवळला, परंतु ६ फेब्रुवारी रोजी जिल्हा स्तरावरील बैठकीत १५ फेब्रुवारीपर्यंत पाणंदमुक्त तालुका करा, अन्यथा संबंधितांना कार्यवाहीला सामोरे जाण्यास भाग पडेल, अशी ताकीद दिल्याचे समजते़ त्यामुळे ७ फेब्रुवारी रोजी शिल्लक कामे असलेल्या ग्रा़ पं़ खात्यावरील एकूण रकमेची आकडेवारी घेण्यात आली़
तालुक्यातील ४० हजार ७९८ पैकी १८२ शौचालयांचे बांधकाम पूर्ण तर ५६ गावे पाणंदमुक्त झाली, परंतु ६० गावांतील १० हजार ५१९ शिल्लक शौचालय बांधकाम अद्याप करावयाची आहेत़ त्यासाठी २ कोटी व १४ व्या वित्त आयोगातील १० कोटी ७७ लाखांचा निधी वापरला जाणार आहे़ त्यासाठी पं़ स़ ने पूर्ण तयारी केली आहे़ बँक व ग्रा़ पं़ ला पं़ स़ च्या परवानगीने फक्त शौचालय बांधकामासाठीच निधी देण्याचे सांगण्यात आल्याची माहिती ‘लोकमत’ प्रतिनिधीला दिली़
मोठ्या गावच्या ग्रामपंचायती व १४ व्या वित्त आयोगाचा निधी आणि शिल्लक उद्दिष्ट यांचा ताळमेळ बसत नाही़
कुरुळा गावातील १४७८ पैकी ९४२ शौचालयांचे बांधकाम झाले़ मात्र अद्याप ५३६ बांधकामे करायची आहेत़, परंतु सुमारे १४ व्या वित्त आयोगाचे १७ लाख खात्यात असल्याचे सांगण्यात आले़ उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सुमारे ६० लाख लागतात़ मग पाणंदमुक्त कसे होणार? असा प्रश्न कुरुळ्याचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थांना पडला आहे़यातून कसा मार्ग काढला जाईल, याची उत्सुकता आहे़ एकंदरीत कंधार तालुका पाणंदमुक्तीसाठी प्रशासकीय स्तरावर वेगवान हालचाली होत असल्याचे चित्र आहे़


Web Title:  Kandahar taluka administration sarajave for the wipeout
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.