गुणवत्ता वाढविण्यावर भर दिल्यामुळे शाळा नावारुपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:28 AM2019-06-20T00:28:01+5:302019-06-20T00:30:14+5:30

तालुक्याच्या एका टोकाला असलेली शिराढोण ता. कंधार येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवत ज्ञानरचनावादासह नवनवीन उपक्रम राबवत मुख्याध्यापक, शिक्षक यांनी प्रयोगशीलतेने शाळा नावारूपाला आणली आहे.

increasing the quality of the school | गुणवत्ता वाढविण्यावर भर दिल्यामुळे शाळा नावारुपास

गुणवत्ता वाढविण्यावर भर दिल्यामुळे शाळा नावारुपास

Next
ठळक मुद्देडिजिटल, स्वयंअध्ययन, शैक्षणिक साहित्यांचा वापरशिष्यवृत्तीधारकांसाठी वेगळे वर्ग

गंगाधर तोगरे।

कंधार : तालुक्याच्या एका टोकाला असलेली शिराढोण ता. कंधार येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवत ज्ञानरचनावादासह नवनवीन उपक्रम राबवत मुख्याध्यापक, शिक्षक यांनी प्रयोगशीलतेने शाळा नावारूपाला आणली आहे. आनंददायी शिक्षणातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यावर भर दिल्याने ही शाळा चर्चेत आली आहे.
शिराढोण हे गाव मोठ्या लोकवस्तीचे आहे. गावात विविध धर्म व जातीचे नागरिक एकोप्याने राहून विकासाकडे वाटचाल करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचा व प्रमुख घटक मानत आले. जि. प. केंद्रीय प्रा. शाळेची स्थापना १९५७ साली झाली. शाळा प्रारंभापासूनच गावकऱ्यांनी शिक्षणातील बदलत्या संकल्पनेला अंगीकारून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले. त्यामुळे शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळेत नवनवीन उपक्रम राबवायला हुरूप आला. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शाळा गुणवत्तावाढीत झेप घेण्यासाठी सरसावली आहे.
शाळेची टोलेजंग इमारत लक्षवेधी आहे. सध्या १२ वर्गखोल्या व १२ शिक्षकी शाळेत पायाभूत व भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात असल्याने चिमुकले शिक्षणाचे धडे गिरवताना रममाण होतात. असा रमणीय परिसर आहे. ७ शिक्षिका व ५ शिक्षकांनी शाळेला नवा आयाम देण्याचा ध्यास घेतला आहे.
डिजिटल, ज्ञानरचनावादी, स्वयंअध्ययन पद्धत, शैक्षणिक साहित्याचा वापर, शिष्यवृत्तीधारक वाढविण्यासाठी वेगळे वर्ग, दिनविशेष, फलकलेखन, रद्दीतून संदर्भ साहित्य निर्मिती, सामान्यज्ञानावर आधारित प्रश्रमंजुषा, तीन भाषेत परिपाठ, कलात्मक कागदी कात्रण, आनंददायी निसर्ग सहल, प्रार्थनेला नवनवीन पुस्तकांचे वाचन, बोलक्या भिंती, अभिवाचन उपक्रम, परिसर स्वच्छता, व्यसनमुक्ती आदी वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग राबवत भावी पिढी सक्षम, गुणवान करण्यासाठी, विद्यार्थिकेंद्रित करण्यासाठी शाळेने पुढाकार घेत शाळा नावारूपाला आणण्यात कोणतीही कसर ठेवली नाही.
शाळेने प्रारंभापासून विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यावर भर दिला. त्यामुळे शाळेतून कला, साहित्य, क्रीडा, उद्योग, प्रशासन आदी विविध क्षेत्राला सक्षम मनुष्यबळ पुरवण्यात योगदान देत आले आहे. इयत्ता १ ली ७ वी पर्यंतच्या या शाळेत ३४० विद्यार्थीसंख्या आहे. त्यात १७६ मुले व १६४ मुलींची संख्या आहे. सोयी-सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. खाजगी शासनमान्य शाळा व इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे कल वाढला असताना या शाळेच्या विविध प्रयोगशील उपक्रमांनी शाळेत मुलांच्या प्रवेशासाठी पालकाचा कल दिसतो. कारण, शाळेतच विद्यार्थ्यांना नवे तंत्रज्ञान, नवे उपक्रमशील धडे मिळत असल्याने ही फलश्रुती असावी.
सी. डी. मठपती या शिक्षकाने एप्रिल महिन्यात प्रशिक्षण घेतले आहे. सामान्य विज्ञानातील संपूर्ण संकल्पना व संबोध स्पष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आकलनासाठी हे उपयुक्त ठरणार आहे. विज्ञान केंद्राचा उपयोग विद्यार्थ्यांत विज्ञान विषयाची गोडी निर्माण करुन आनंद, मनोरंजनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
उन्हाळ्यात पोषण आहार व मनोरंजनवर्ग
दुष्काळी भाग असल्यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यावर्षी उन्हाळ्यात दीड महिना पोषण आहार व मनोरंजनवर्ग घेण्यात आले. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले जाते. शिष्यवृती परीक्षेत पात्र होण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांकडून प्रयत्न केले जातात.

नानाविध उपक्रम, संकल्पना राबवून विद्यार्थ्यांत आत्मविश्वास निर्माण करणारे शिक्षकवृंद शाळेला लाभले आहेत.विद्यार्थ्यांच्या आवडी व कलानुसार आनंददायी शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक परिश्रमपूर्वक आपले योगदान देतात.
- छाया बोरलेपवार, मुख्याध्यापक

Web Title: increasing the quality of the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.