सुखाचा संदेश देणारे परभणी जिल्ह्यातील ‘हॅप्पी व्हिलेज!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:45 AM2018-12-19T00:45:04+5:302018-12-19T00:46:37+5:30

ना भांडण-तंटा, ना वादविवाद, ना कुठले व्यसन. प्रत्येकालाच एकमेकांबद्दल कमालीची आपुलकी. असे हे ‘हॅप्पी व्हिलेज’ राज्याला आनंदी जीवनाचा संदेश देत आहे.

'Happy Village' in Parbhani district, giving message of happiness! | सुखाचा संदेश देणारे परभणी जिल्ह्यातील ‘हॅप्पी व्हिलेज!’

सुखाचा संदेश देणारे परभणी जिल्ह्यातील ‘हॅप्पी व्हिलेज!’

Next

विशाल सोनटक्के।
नांदेड : सुख म्हणजे नक्की काय असते, असा प्रश्न कोणाला पडत असेल, तर त्याने पूर्णा तालुक्यातील (जि. परभणी) कावलगावला भेट द्यायला हवी. या गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक जण भल्यापहाटे उठतो आणि ध्यानधारणेत मग्न होऊन जातो. ना भांडण-तंटा, ना वादविवाद, ना कुठले व्यसन. प्रत्येकालाच एकमेकांबद्दल कमालीची आपुलकी. असे हे ‘हॅप्पी व्हिलेज’ राज्याला आनंदी जीवनाचा संदेश देत आहे.
नांदेड येथील नवीन डंकीन परिसरात डॉ. संग्राम जोंधळे धम्मनिरंजन विपश्यना केंद्र चालवितात. कावलगाव येथील मारुतीराव पिसाळ आणि शिवाजी हळदेकर हे डॉ. जोंधळे यांच्या संपर्कात आले. या दोघांनाही तंबाखूचे व्यसन होते. यावर जोंधळे यांनी त्यांना ध्यानधारणा करण्याचा सल्ला दिला. यानुसार विपश्यना आणि ध्यानधारणा सुरू केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत दोघांचीही तंबाखू सुटली. असाच अनुभव इतर काही जणांच्या बाबतीत आल्यानंतर डॉ. जोंधळे यांनी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला याबाबत पत्र लिहून व्यसनमुक्तीबरोबरच गावातील तंटे कमी करून गाव आनंदी करण्यासाठी ध्यानधारणा उपयोगी पडू शकते, असे कळविले. यावर आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी आॅगस्ट २०१८ मध्ये डॉ. जोंधळे यांना पत्र पाठवून कावलगाव येथे विपश्यना व आणापानच्या मदतीने आनंदी गाव (हॅप्पी व्हिलेज) ही संकल्पना राबविण्यास सांगितले.
जोंधळे यांनी विपश्यना केंद्रातील चमूसह कावलगावला भेट देऊन चाचपणी केली. साडेपाच हजार लोकवस्ती असलेल्या या गावातील अनेकांना हा आगळावेगळा उपक्रम भावला. प्रत्यक्ष कामास नोव्हेंबरमध्ये सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात व्यक्तिगत सुख, आनंदासंबंधी २० प्रश्नांची उत्तरे गावातील २ हजार महिला, ग्रामस्थांंकडून भरून घेण्यात आली. याबरोबरच ‘न्युरोबिक’ या उपकरणाच्या माध्यमातून शास्त्रीयदृष्ट्या या दोन हजार नागरिकांच्या सुखाच्या स्तराचे मोजमाप करण्यात आले. हा डाटा हाती आल्यानंतर विपश्यना, ध्यानधारणा सुरू झाली.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक बनसोड, रुस्तुम वंजे, उमाकांत देशमुख, नेमाजी वंजे, गजानन धवन, रुक्मिणबाई पिसाळ, मीनाताई देशमुख, अरुणाताई सोनटक्के, शेख मोदीन, प्राचार्य डॉ. के.बी. गोरे, जय जवान जय किसान महाविद्यालयाचे मुख्याध्यापक धुमाळे आदी झटत आहेत.

Web Title: 'Happy Village' in Parbhani district, giving message of happiness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.