विधानसभा इच्छुकांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:16 AM2019-05-25T00:16:44+5:302019-05-25T00:17:21+5:30

लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा ४० हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. या निवडणुकीत भोकरसह नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण हे तीन मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसून आले. दुसरीकडे नायगाव, देगलूरसह मुखेड विधानसभा मतदारसंघाने युतीला साथ दिली आहे.

election result warns to Assembly candidate | विधानसभा इच्छुकांना इशारा

विधानसभा इच्छुकांना इशारा

Next
ठळक मुद्देतीन काँग्रेस तर तीन विधानसभा मतदारसंघ युतीच्या पाठीशी

विशाल सोनटक्के ।
नांदेड : लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा ४० हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. या निवडणुकीत भोकरसह नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण हे तीन मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसून आले. दुसरीकडे नायगाव, देगलूरसह मुखेड विधानसभा मतदारसंघाने युतीला साथ दिली आहे. विधानसभानिहाय निवडणूक आकडेवारी पाहिल्यानंतर या निकालाने विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांनाही एकप्रकारे इशारा दिला आहे.
अमिताताई चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघाने काँग्रेसला सुमारे ५ हजार इतके मताधिक्य दिले आहे. येथे प्रताप पाटील यांना ८० हजार २१९ तर अशोक चव्हाण यांना ८५ हजार ५ इतके मतदान झाले आहे. शहरातील नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण हे दोन्ही विधानसभा मतदारसंघही पुन्हा काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसून येते. काँग्रेस आ. डी. पी. सावंत यांच्या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला सर्वाधिक ३० हजार ११७ इतके मताधिक्य मिळाले आहे. येथे अशोक चव्हाण यांना ९० हजार ५७१ तर प्रताप पाटील चिखलीकर यांना ६० हजार ४५४ इतकी मते मिळाली. शिवसेनेच्या ताब्यात राहिलला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघही काँग्रेससाठी लाभदायी ठरला. या मतदारसंघातून काँग्रेसला ४ हजार ८६४ इतके मताधिक्य मिळाले. दक्षिणमध्ये अशोक चव्हाण यांना ७७ हजार ३८७ तर प्रताप पाटील चिखलीकर यांना ७२ हजार ५२३ इतकी मते मिळाली. काँग्रेस आ. वसंतराव चव्हाण यांच्या नायगाव विधानसभा मतदारसंघात मात्र काँग्रेसला फटका बसला आहे. काँग्रेसच्या ताब्यातील या मतदारसंघाने युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना २० हजार ६६४ इतके मताधिक्य दिले आहे. येथे काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना ७१ हजार ४३४ मते मिळाली आहेत. तर भाजपाच्या प्रताप पाटील चिखलीकर यांना नायगाव विधानसभा मतदारसंघातून ९२ हजार ७५ मते मिळाली. नायगाव मतदारसंघातील ही आकडेवारी पाहिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. शिवसेना आ. सुभाष साबणे यांच्या देगलूर विधानसभा मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर यांना २३ हजार ३०२ मताधिक्य मिळाले आहे. येथे चिखलीकर यांना ८७ हजार २११ मते मिळाली तर अशोक चव्हाण यांना ६३ हजार ९०२ मतांवर समाधान मानावे लागले. भाजपाच्या ताब्यात असलेल्या एकमेव मुखेड विधानसभा मतदारसंघाने चिखलीकर यांना या निवडणुकीत मोठे योगदान दिल्याचे दिसून येते. चिखलीकर यांना तब्बल ३५ हजार ८२७ इतके मताधिक्य या मतदारसंघातून मिळाले आहे. अशोक चव्हाण यांना मुखेडमधून ५३ हजार ८३९ मते मिळाली. तर भाजपाच्या प्रताप पाटील चिखलीकर यांना मुखेड विधानसभा मतदारसंघातून ८९ हजार ६६६ इतकी विक्रमी मते दिली.
एकूणच भोकरसह नांदेड शहरातील उत्तर आणि दक्षिण हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसच्या पाठीशी राहिले असले तरी देगलूर आणि मुखेड या युतीच्या ताब्यातील दोन्ही मतदारसंघांनी चिखलीकर यांना भरभरुन मते दिल्याचे स्पष्ट होते. त्यातच काँग्रेसच्या ताब्यातील नायगाव मतदारसंघही चिखलीकर यांच्या पाठीशी राहिल्याने भाजपाच्या विजयाचा मार्ग सोपा झाल्याचे दिसून येते. अवघ्या काही महिन्यानंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक निकालाने विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांनाही एकप्रकारे इशारा दिला आहे. त्यामुळेच आगामी निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेससह शिवसेना-भाजपालाही नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.
विधानसभेतही राहणार वंचित फॅक्टर

  • वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच आव्हान उभे केले होते. आघाडीचे उमेदवार डॉ. यशपाल भिंगे यांनी १ लाख ६६ हजार १९६ इतकी मते खेचल्याने काँग्रेसचा धक्कादायक पराभव झाला. विधानसभानिहाय वंचित आघाडीला पडलेली मते पाहता भोकर विधानसभा मतदारसंघातून २६,०२०, नांदेड उत्तर मधून ३८,७९५, नांदेड दक्षिण २७ हजार २२२, नायगाव विधानसभा २७ हजार ५३० इतकी मते मिळविली.
  • शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीला २६ हजार ३३९ मते मिळाली. तर मुखेड मतदारसंघात १९ हजार ४३५ मतांवर आघाडीला समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, मुखेड तालुक्यातून चांगली मते मिळतील, अशी आघाडीला अपेक्षा होती. त्यामुळेच गोपीचंद पडळकर यांची सभा मुखेडमध्ये घेण्यात आली. मात्र त्यानंतरही या मतदारसंघातून वंचित आघाडीला कमी मते मिळाली.

Web Title: election result warns to Assembly candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.