Drought In Marathwada : रिठा येथील शेतकरी कुटुंबांची पोटासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 08:04 PM2018-11-23T20:04:33+5:302018-11-23T20:08:58+5:30

चार वर्षांपासून दुष्काळाचे ग्रहण रिठा, रिठातांड्यांच्या मागे लागले आहे.

Drought in Marathwada: Farmer's family wanders for the food from Ritha | Drought In Marathwada : रिठा येथील शेतकरी कुटुंबांची पोटासाठी भटकंती

Drought In Marathwada : रिठा येथील शेतकरी कुटुंबांची पोटासाठी भटकंती

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्या वेचणीतच कपाशीचा झाडा

- गोकुळ भवरे, रिठा, जि. नांदेड

डोंगराळ, अतिदुर्गम, आदिवासीबहुल असलेल्या किनवट तालुक्याचा भाग. या गावतांड्यावरील शेतकरी कोरडवाहू शेती कसतात. त्यामुळे सगळी मदार पावसावरच. पण यंदा केवळ सहाशे मि.मी.च पाऊस झाला. म्हणजेच एकूण सरासरीच्या ४८ टक्के. या पावसावर तगलेल्या कपाशीचा पहिल्या वेचणीत झाडा झाला. खरिपातील इतर पिकांचीही हीच कथा. चार वर्षांपासून दुष्काळाचे ग्रहण रिठा, रिठातांड्यांच्या मागे लागले आहे. त्यामुळे आता इथल्या माणसांच्या हाताला कामच राहिलेले नाही. या गावतांड्यावरील दीडशे कुटुंबांनी पोटासाठी घरदार सोडून स्थलांतर केले आहे.

किनवट या डोंगराळ तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी १ हजार २४० मिमी असताना किनवट तालुक्यात सप्टेंबर अखेर  केवळ ८२१ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यातही पावसाच्या पडण्यात मोठा खंड होता. परिणामी खरीप हंगामावर  मोठा परिणाम झाला. शेतकऱ्यांच्या हाती काहीच  लागले नाही. इस्लापूर मंडळात पावसाची नोंद  केवळ सहाशे मिमी इतकीच आहे. 

कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरात कापूस या नगदी पिकाचे उत्पादन आलेच नाही. कापसाची बॅग  पेरणी व  इतर  खर्च मिळून १५ हजार  रुपये केला. एका बॅगेला क्विंटल सोडाच पंधरा किलोचा उतारा आल्याने शेतकरी कर्जबाजारीच झाले आहे. पेरणीनंतर पावसाने उघडीप दिली. कसेबसे बियाणे उगवले. फूल, घाटे लागण्याच्या अवस्थेत असताना पुन्हा पावसाने दडी मारुन संपूर्ण खरीप हंगाम शतकऱ्यांच्या हातून गेला. भूगर्भातही पाणी नाही. त्यामुळे ज्वारीही हाती लागली नाही. त्यामुळे कडबा नाही.

जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. हाताला काम नसल्याने मजुरांची कुटुंबे  कामाच्या शोधात गाव सोडून स्थलांतरित झाले आहेत. गतवर्षी बोंडअळीने  गिळले. यावर्षी निसर्गाच्या प्रकोपाने शेतकरी संकटात सापडले आहे. शासनाच्या उदासीन धोरणांमुळे येथील शेतकरी देशोधडीला  लागला आहे. 

बळीराजा काय म्हणतो?

- माझ्याकडे तीन एकर शेती आहे. कापूस या वाणाची पावली लागवड केली. पाच बॅग लावल्या. दीड क्विंटलचा उतारा आला. हार्टफेल होऊन मरण्याची वेळ यावी अशीच परिस्थिती आहे. एकना एक दिवस जायचे आहे. पण निसर्गाच्या संकटाने बेकार कोंडीत सापडलो आहे. -मोहन पुरा राठोड, रिठातांडा

- कापसाची वाढ कमी झाली. बोंड आले नाही. पहिला पाऊस पडला. नंतर पावसाने उघाड दिली. दहा एकर कापूस असतानाही बॅगला वीस किलो उतारा आला नाही. आता कापसाला दोन बोंड लागले, पण फुटून कापूस पदरात येणार नाही. -वसंत उत्तम जाधव, शेतकरी

- मला साडेसात एकर शेतजमीन आहे. निसर्गाने यावर्षी दगा दिला. परिणामी कापसाला चिकट, पांढरा धागा आहे. पाणी देऊनही पाने गळून उलंगवाडी झाली. बोंड लागणे दूरच. केलेल्या खर्चाचा हिशोब पाहता जीव जायचीच वेळ आली आहे. -माधव विठ्ठल कांबळे, शेतकरी

- माझ्याकडे सोळा ते १७ एकर शेत आहे. कपाशी लावली. पहिल्यावेळेस १८ बॅग लावल्या. पण, बियाणे उगवलेच नाही.दुबार पेरणीवेळी दहा बॅग लागल्या.  जूननंतर पावसाने दगा दिला. चार क्विंटल कापूस घरात आला. आता काय करावे? खूप वाईट परिस्थिती आहे. जगणे कठीण झाले आहे, तर तिकडे शेतकऱ्याच्या बाबतीत उदासीन असलेले  राज्य व केंद्र शासन राजकारण करते आहे. -दत्ता गांगू जाधव

- एका बॅगला दहा किलोचा उतारा निघाला. असे असेल तर कपडेलत्ते, दाळदाणे, कुटुंबाचा गाडा, उसनवारी फेडावी कशी? असा प्रश्न सतावू लागला आहे.- खिरु चव्हाण, शेतकरी

काही आकडेवारी : 
- १४० - मागील ५ वर्षांची शेतकरी आत्महत्या 
- १८१९ - गावाची लोकसंख्या 
- ६०० मिमी पाऊस
- खातेदार शेतकरी ५० हजार
- भौगोलिक क्षेत्रफळ-१ लाख ५१ हजार हेक्टर
- गावे १९१, वाडीतांडे १०५
- खरीप हंगाम क्षेत्र-८२ हजार ३६० हेक्टर
- पेरणी झालेले -८० हजार ८५२ हेक्टर
- कापूस-५० हजार ७०७ हेक्टर, सोयाबीन -१६,३९९ हेक्टर, तूर-६ हजार ३३२ हेक्टर, ज्वारी- २ हजार ११२ हेक्टर, मूग-१ हजार १४३ हेक्टर, उडीद १ हजार ४५ हेक्टर

Web Title: Drought in Marathwada: Farmer's family wanders for the food from Ritha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.