पाणीप्रश्नावर काँग्रेसला घेरण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:45 AM2018-11-18T00:45:02+5:302018-11-18T00:46:35+5:30

विष्णूपुरी प्रकल्पातून दिल्या जाणा-या एका पाणी पाळीचा शेतकºयांना कोणताही लाभ होणार नसतानाही शिवसेनेच्या आग्रहातून जवळपास १० ते १५ दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पातून सोडण्यात येत आहे.

Congress to scuttle water dispute | पाणीप्रश्नावर काँग्रेसला घेरण्याचा डाव

पाणीप्रश्नावर काँग्रेसला घेरण्याचा डाव

Next
ठळक मुद्देसेना-भाजपाच्या आग्रहावरून एकच पाळीसोडलेल्या पाण्याचा शेतकऱ्यांना कसलाही लाभ नाही

नांदेड : शहरातील पाणी टंचाईच्या विषयावर महापालिकेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेसला घेरण्याचे प्रयत्न शिवसेना- भाजपाकडून सुरू आहेत की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. विष्णूपुरी प्रकल्पातून दिल्या जाणा-या एका पाणी पाळीचा शेतकºयांना कोणताही लाभ होणार नसतानाही शिवसेनेच्या आग्रहातून जवळपास १० ते १५ दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पातून सोडण्यात येत आहे. हेच पाणी आगामी काळात शहराच्या पिण्यासाठी शिल्लक राहिले असते.
विष्णूपुरी प्रकल्पातून १५ नोव्हेंबरपासून सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. दुसरी पाणी पाळी मिळणार नाही, हे पाटबंधारे विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे एका पाणी पाळीचा लाभ शेतकºयांना काय होणार? असा प्रश्न पुढे आला आहे. रब्बी हंगामात विष्णूपुरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात गहू, हरभरा, टाळकी ज्वारी आदी पिके घेतली जातात. किमान तीन पाणी पाळ्या मिळाल्या तर ही पिके येवू शकतात. मात्र एका पाणी पाळीवर शेतकºयांचे भागणार नाही. त्यामुळे या पाण्याचा फायदाच काय? असा प्रश्न विष्णूपुरी लाभक्षेत्रातील खुद्द शेतकरीच विचारत आहेत.
परंतु, केवळ राजकीय भूमिका घेत शिवसेना आ. हेमंत पाटील आणि आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी विष्णूपुरीतून पाणी सोडण्याचा आग्रह धरला आहे. प्रारंभी दोन पाणी पाळ्या देण्याबाबत कालवा बैठकीत निर्णय घेण्यात आला. मात्र प्रत्यक्षात प्रकल्पातील पाणी आणि विष्णूपुरी प्रकल्पाच्या वरील भागातील कोरडे असलेले धरणे याचा विचार करता नांदेडकरांना मोठ्या जलसंकटाला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट होते. असे असतानाही विष्णूपुरी प्रकल्पातून पाणी सोडण्यास भाग पाडणे यामागे राजकारण असल्याच दिसून येते. महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे पाण्याच्या विषयावर काँग्रेसला अडचणीत आणण्याचाच हा उद्योग मानला जात आहे.
शहरात आजघडीला दिवसाआड असलेला पाणी पुरवठा १८ नोव्हेंबर पासून दोन दिवसाआड करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठ्याच्या आरक्षण बैठकीत सेना आमदार हेमंत पाटील यांनी नांदेड शहरासाठी आता विष्णूपुरी ऐवजी इसापूर प्रकल्पातून पाणी घेण्यात यावे व विष्णूपुरीचे पाणी शेतकºयांनाच द्यावे, अशी भूमिका घेतली होती. त्याचवेळी लोह्याचे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनीही शेतकºयांसाठी विष्णूपुरीचे पाणी मिळाले पाहिजे, असे म्हटले होते. एकूणच विष्णूपुरीच्या पाण्यावर नांदेडकरांची भागत असलेली तहान ही शेतकºयांच्या हिताआड येत असल्याची भूमिका या आमदार द्वयांनी घेतली होती.
त्यामुळेच नांदेड शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी दरवर्षी आरक्षित करण्यात येणारे ३२ दलघमी पाणी यावर्षी ३० दलघमीवर आले आहे. त्याचवेळी आता विष्णूपुरीतील जलसाठा संपल्यानंतर प्रकल्पात पाणी आणण्यासाठी असलेल्या येलदरी आणि सिद्धेश्वर प्रकल्पातही पाणी नाही.
त्यामुळे नांदेडकरांसमोरील जलसंकट आणखीच गंभीर झाले आहे. आमदार हेमंत पाटील आणि आ. चिखलीकर यांनी नांदेडच्या पाणी प्रश्नावर थेट माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनाच आव्हान दिले होते. इसापूरहून नांदेडच्या पाण्याची व्यवस्था करा, असा सल्लाही त्यांनी दिला होता. यावर माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी इसापूरमध्ये येणारे पाणीही वरच्या धरणाद्वारे अडवले जात आहे. यावर सत्ता पक्षात असलेल्यांनी तोंड उघडावे, या शब्दात प्रतिउत्तर दिले होते.
मनपा पदाधिकारी, नगरसेवक गप्पच...
प्रत्यक्षात इसापूर धरणाच्या पाण्यावर नांदेडकरांची तहान भागवण्यात अनेक तांत्रिक अडचणी आहेत. या अडचणी माहित असतानाही केवळ खा. चव्हाण यांना टार्गेट करण्यासाठी पाण्याचे राजकारण केले जात आहे. शहरवासीयांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी असलेल्या महापालिका पदाधिकाºयांकडून या विषयावर आतापर्यंत ‘ब्र’ही काढण्यात आला नाही. पक्षाच्या नेत्याला अडचणीत आणण्याचे प्रयत्न करणाºयांना साधे उत्तर देण्याचे धाडसही महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक करु शकले नाहीत.

Web Title: Congress to scuttle water dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.