काँग्रेसचे नांदेडमध्ये शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:12 AM2019-03-26T00:12:31+5:302019-03-26T00:13:32+5:30

जिल्ह्यातील सहकार क्षेत्र बुडीत काढण्याचे पाप भाजप सरकारने केल्याचा आरोप करीत भाजपवाले म्हणजे शॉट झालेले बल्ब असल्याचे धोंडगे यावेळी म्हणाले.

Congress demonstrates power in Nanded | काँग्रेसचे नांदेडमध्ये शक्तिप्रदर्शन

काँग्रेसचे नांदेडमध्ये शक्तिप्रदर्शन

Next
ठळक मुद्देरॅलीला प्रतिसाद : अशोकराव चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नांदेड : कै. शंकरराव चव्हाण यांची पुण्याई व नांदेड जिल्ह्यातील जनतेची साथ हेच काँग्रेसच्या यशाचे गमक असल्याचे सांगत पाच पक्ष बदलणारा भाजपाचा उमेदवार माझ्यासाठी अदखलपात्र आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मी अधिक भाष्य करणार नाही. मात्र, राज्यात सर्वाधिक मताने जिंकू, असा विश्वास व्यक्त करीत यासाठीची जबाबदारी आता कार्यकर्ते, मतदारांनी घ्यावी, असे आवाहन खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.
सोमवारी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या वतीने खा. चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मोंढा येथून रॅली काढण्यात आली. महावीर चौक, एस.पी. आॅफिस, शिवाजीनगर, ज्योती टॉकीज मार्गे इंदिरा गांधी मैदानावर रॅलीची सांगता झाली. येथेच जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी आ. डी.पी. सावंत, आ. वसंतराव चव्हाण, आ. अमिता चव्हाण, आ. अमरनाथ राजूरकर, बेळगावच्या आमदार अंजली निंबाळकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे, महापौर शीलाताई भवरे, फारुख अली खान, माजी आ. माधवराव जवळगावकर, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, रावसाहेब अंतापूरकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष डॉ. सनील कदम, श्रीजया चव्हाण, सुजया चव्हाण, माजी महापौर अब्दुल सत्तार, कविता कळसकर, अनुजा तेहरा, गंगाधर सोंडारे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने ७३ जागा जिंकून नांदेडमध्ये इतिहास घडविला. आता त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला लोकसभा निवडणुकीत करावयाची असल्याचे ते म्हणाले. या सभेत खा. चव्हाण यांनी भाजपावर चौफेर हल्ला चढविला. हा देश घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरु अशा देशभक्तांनी घडविला आहे. मात्र नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजपा पक्ष या देशाच्या घटनात्मक चौकटीला तडे देत असल्याचे सांगत राफेल विमान खरेदीत कोट्यवधीचा गैरव्यवहार करणाऱ्या पंतप्रधान मोदींना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली असल्याचे खा. चव्हाण म्हणाले.
भाजपा सरकारने सर्वसामान्यांचा पैसा जाहिराती करण्यावर उधळला आहे. याचा जाब मतदारांनी आता विचारावा, असे सांगत चौकीदारानेच देशाला लुटण्याचे काम केले आहे, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली. पंतप्रधान मोदींनी अगोदर चहावर मत मागितले. आता चौकीदार म्हणून मत मागत आहेत. परंतु, हा चौकीदार चोर आहे, त्यांनी स्वत:ला चौकीदार म्हणून देशातील समस्त चौकीदारांची बदनामी केल्याचा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला. सभेचे प्रास्ताविक आ. डी. पी. सावंत, सूत्रसंचालन आ. अमरनाथ राजूरकर तर हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी आभार मानले. रॅलीमुळे शहरातील ट्रॅफिक बराचवेळ विस्कळीत झाली होती.
शिवसेना-भाजप झालेत उपऱ्यांचे पक्ष
शिवसेना आणि भाजप हे पक्ष आता उपऱ्यांचे पक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. या पक्षातील या बदलामुळे निष्ठावंतांमध्ये मोठी खदखद आहे. भाजपवाल्यांनी कारखाने आणि सहकारी संस्था बंद पाडल्या. तर नव्याने दारुचे दुकान मात्र सुरू केले. हे दुकान सुरू करणारा नांदेड जिल्ह्याचा छोटा चौकीदार असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली. माझ्या उमेदवारीनंतर कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. आता खरी लढाई सुरू झाल्याचे सांगत भाजपा उमेदवारांनी कंधार-लोह्यात काय दिवे लावले? हे माझ्यापेक्षा अधिक ईश्वरराव भोसीकर, अरविंद नळगे आणि शंकरअण्णा धोंडगे सांगू शकतात, असेही ते म्हणाले.
भाजपवाले म्हणजे शॉट झालेले बल्ब
शंकरअण्णा धोंडगे यांनी आपल्या भाषणात भाजपावर खरमरीत टीका केली. जिल्ह्यातील सहकार क्षेत्र बुडीत काढण्याचे पाप भाजप सरकारने केल्याचा आरोप करीत भाजपवाले म्हणजे शॉट झालेले बल्ब असल्याचे धोंडगे यावेळी म्हणाले. ईश्वरराव भोसीकर यांनी भाजपा उमेदवार चिखलीकर यांच्यावर टीकेचा प्रहार करीत अशोक चव्हाण यांना विक्रमी मताने विजयी करण्याची ग्वाही दिली. तर बापूराव गजभारे यांनी चव्हाण यांना विक्रमी मताने विजयी करण्याचे आपले मिशन असल्याचे सांगितले. अरविंद नळगे यांनी भाजपाचा सर्व खेळ पैशावर सुरू आहे. मात्र त्यांचा येथे टिकाव लागणार नसल्याचे सांगत हे पैसे असेच ठेवून पुन्हा विधानसभेसाठी ते वापरणार असल्याचे सांगितले.

Web Title: Congress demonstrates power in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.