गोदावरीचे पाणी भाजप सरकारनेच गुजरातला वळविले; छगन भुजबळ यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 05:16 PM2019-04-15T17:16:50+5:302019-04-15T17:17:41+5:30

पैनगंगेच्या पाण्याबाबत नांदेडवर अन्याय

BJP government diverted Godavari water to Gujarat; The charge of Chhagan Bhujbal | गोदावरीचे पाणी भाजप सरकारनेच गुजरातला वळविले; छगन भुजबळ यांचा आरोप 

गोदावरीचे पाणी भाजप सरकारनेच गुजरातला वळविले; छगन भुजबळ यांचा आरोप 

Next

नांदेड : उर्ध्व पैनगंगेचे पाणी कै. शंकरराव चव्हाण यांनी महत्प्रयासाने नांदेडसाठी आणले. त्यामुळेच नांदेड जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ झाली होती. मात्र हे पाणी वरच्या भागात नेऊन नांदेडकरांवर भाजप सरकारने अन्याय केल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली. गोदावरीच्या पाण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस धादांत खोटे बोलत असून गुजरातचा पुळका असल्याने त्यांनीच हे पाणी तिकडे वळविल्याचा आरोपही त्यांनी केला. खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ भोकर येथे रविवारी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. 

छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात शिवसेना-भाजपावर चौफेर हल्ला चढविला. २०१० मध्ये काँग्रेस आघाडी सरकारने हे पाणी गुजरातला देण्याबाबत कसलाही निर्णय घेतलेला नाही. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये येवून गोदावरीच्या पाण्याबाबत धादांत खोटे विधान केले. 

गुजरातचा पुळका कोणाला आहे हे सर्वसामान्यांना कळते. उलट भाजप सरकारच नांदेडकरांचे पाणी पळवून या जिल्ह्याची कोंडी करु पाहत आहे. भाजपाचे हे मनसुबे पूर्ण होणार नाहीत, याची खबरदारी मतदारांनीही घ्यायला हवी, असे सांगत काँग्रेसची सत्ता आल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येईल, असा शब्द भुजबळ यांनी दिला. मनसेच्या राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बनवेगिरी नांदेडमध्ये पुराव्यासह उघड केली. त्यावर काहीही संबंध नसताना अशोकराव चव्हाण यांनीच राज ठाकरे यांना किरायाने सभेसाठी आणल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज ठाकरे यांना काँग्रेसने किरायाने आणले म्हणता मग चार-पाच पक्ष बदललेल्या आणि शिवसेनेचे आमदार असलेल्या चिखलीकरांना भाजपाने कोणत्या भाडेतत्त्वावर उमेदवारी दिली? हेही मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवे होते, अशी बोचरी टीकाही भुजबळ यांनी केली. 

देशातला मतदार हा चौकीदार नव्हे,तर तो या देशाचा मालक आहे. विजय मल्ल्या, निरव मोदी आणि मेहुल चोकसीसारखे व्यापारी सर्वसामान्यांचे हजारो कोटी रुपये बुडवून पळवून गेले तेव्हा स्वत:ला चौकीदार म्हणणारे देशाचे पंतप्रधान झोपले होते का? अशी टीका करीत महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना आणि सर्वसामान्य शेतकरी चारा छावण्याची मागणी करीत असताना हे सेना-भाजप सरकार डान्सबार आणि लावण्या देत असल्याची टीकाही त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात बदल करण्याचे मनसुबे भाजपा सरकारचे असून ते उधळून लावा, असे आवाहनही भुजबळ यांनी केले. 
 

Web Title: BJP government diverted Godavari water to Gujarat; The charge of Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.