आंतरराष्ट्रीय व्यापारात प्राचीन महाराष्ट्राचे स्थान लक्षणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:59 AM2019-01-30T00:59:22+5:302019-01-30T00:59:49+5:30

प्राचीन काळातील आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताचे स्थान महत्त्वाचे होते आणि यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग लक्षणीय होता, असे प्रतिपादन डॉ. प्रमोद देव यांनी केले.

Ancient Maharashtra has significant place in international trade | आंतरराष्ट्रीय व्यापारात प्राचीन महाराष्ट्राचे स्थान लक्षणीय

आंतरराष्ट्रीय व्यापारात प्राचीन महाराष्ट्राचे स्थान लक्षणीय

googlenewsNext
ठळक मुद्देप्रमोद देव यांचे प्रतिपादन

नांदेड : प्राचीन काळातील आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताचे स्थान महत्त्वाचे होते आणि यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग लक्षणीय होता, असे प्रतिपादन डॉ. प्रमोद देव यांनी केले.
नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते ‘प्राचीन महाराष्ट्रातील व्यापार परंपरा’ या विषयावर बोलत होते.
आंतरराष्ट्रीय व्यापारातील महाराष्ट्राचा सहभाग हा सातवाहन काळापासून सुरु झाल्याचे आढळते. कोकणातील मांडवगड, चौल, नालासोपारा, कल्याण, हर्णे, वेंगुर्ला आदी बंदरांमधून ग्रीस, रोमन साम्राज्य, इजिप्त आदी प्रदेशांशी मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असे. महाराष्ट्राला या कालखंडात लाभलेले राजकीय स्थैर्य तसेच तत्कालीन राज्यकर्त्यांनी व्यापाराला उत्तेजन देण्याच्या धोरणामुळे हे शक्य झाले, असे डॉ. देव म्हणाले.
गहू, तांदूळ, मसाले, रेशीम, चंदनाची खेळणी, काचेच्या वस्तू, पाळीव प्राणी आदी वस्तूंचा व्यापार प्राचीन काळात चालायचा असे उल्लेख मिळाल्याचे सांगून ते म्हणाले, तत्कालीन महाराष्ट्रात पैठण, तेर, भोकरदन, नेवासा, नाशिक, कोल्हापूर ही शहरे महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती. या शहरांना जोडणारे व्यापारी मार्ग अस्तित्वात होते. महाराष्ट्रातील अजिंठा, वेरुळसह सर्व लेण्या याच मार्गावर स्थित असून त्यांचा उपयोग हा प्रामुख्याने व्यापाऱ्यांच्या निवासासाठी होत असे. या लेण्यांच्या उभारणीत राज्यकर्त्यांसोबतच व्यापाºयांचेही योगदान महत्त्वाचे होते आणि याला तत्कालीन महाराष्ट्राच्या समृद्धीचा पुरावा म्हणता येईल, असे त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले.
रोमन साम्राज्यामध्ये भारतीय वस्तूंना प्रचंड मागणी होती आणि आपण रोमनांकडून तुलनेने फारसे काहीच आयात करत नव्हतो. यामुळे रोमकडून भारताकडे संपत्तीचा ओघ वाढत चालला होता आणि याबद्दल तत्कालीन रोम संसदेमध्ये हा ओघ कसा थांबवता येईल, याची चिंता व्यक्त झाल्याचे पुरावे उपलब्ध आहेत, असे डॉ. देव म्हणाले.
प्राचीन भारतातील व्यापार हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आवडता विषय होता व इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रात एम. ए. करताना याच विषयावरील प्रबंधलेखनास त्यांनी सुरुवात केली होती; पण पुरेशा संदर्भसाहित्याअभावी त्यांनी विषय बदलला, असेही ते म्हणाले. या विषयाचे अनेक पैलू अजूनही दुर्लक्षित असून त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. व्याख्यानानंतर आयोजित चर्चेत प्रवीण सोनी, डॉ. लक्ष्मण मोहरीकर, डॉ. अभय दातार, डॉ. बालाजी चिरडे आदींनी सहभाग घेतला. प्रा. मधुकर राहेगावकर यांनी स्वागत केले.
सूत्रसंचालन डॉ. सचिन पवार तर डॉ. अशोक सिद्धेवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. श्यामल पत्की, डॉ. प्रभाकर देव, प्रतिभा देव, डॉ. जी.एस. शेळके, वसंत मैय्या, सुरेश जोंधळे, डॉ. एस. जी. जाधव, डॉ. सुकाळे, डॉ. दत्ता यादव, विठ्ठल निवघेकर, डॉ. प्रमोद लोणारकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Ancient Maharashtra has significant place in international trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.