चार वर्षानंतर मृत जलसाठा उचलण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:47 AM2019-05-09T00:47:10+5:302019-05-09T00:49:56+5:30

शेतीसाठी अनावश्यक पाणी पाळ्यांचा आग्रह त्याचवेळी अवैध जलउपसा रोखण्यासाठी झालेली कुचराई यामुळे विष्णूपुरी प्रकल्प तळाला गेला असून चार वर्षानंतर पुन्हा एकदा प्रकल्पातील मृत जलसाठा वापरण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

after four years lifting the dead storage | चार वर्षानंतर मृत जलसाठा उचलण्याची वेळ

चार वर्षानंतर मृत जलसाठा उचलण्याची वेळ

Next
ठळक मुद्देविष्णूपुरी तळाला : प्रकल्पात उरला केवळ ४.९४ दलघमी पाणीसाठा २.७० दलघमी मृत जलसाठा

नांदेड : शेतीसाठी अनावश्यक पाणी पाळ्यांचा आग्रह त्याचवेळी अवैध जलउपसा रोखण्यासाठी झालेली कुचराई यामुळे विष्णूपुरी प्रकल्प तळाला गेला असून चार वर्षानंतर पुन्हा एकदा प्रकल्पातील मृत जलसाठा वापरण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. त्यासाठी आवश्यक ते नियोजन मनपा पाणीपुरवठा विभागाकडून केले जात आहे. विशेषत: दक्षिण नांदेडवर जलसंकट घोंगावत आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी जलाशयातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पात केवळ ४.९४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. आजघडीला शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. विष्णूपुरीतून प्रतिदिन ०.२५ दलघमी पाणी कमी होत आहे. याच वेगाने पाणी कमी झाले तर केवळ ३१ मे पर्यंत शहराला पाणीपुरवठा करता येणार आहे.
यंदाच्या वर्षी परतीच्या पावसाने नांदेडकडे पाठ फिरविल्याने सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. पर्यायाने जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असल्याने जानेवारी महिन्यापासूनच नांदेड शहरासह ग्रामीण भागालाही टंचाईच्या झळा बसवू लागल्या आहेत. त्यातच नांदेड शहरासह परिसरातील गावांची तहान भागविणा-या विष्णूपुरी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यातही वेगाने घट होऊ लागली आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेवून मनपा प्रशासनाने पाणी कपातीचे धोरण अवलंबिले आहे. मात्र त्यानंतरही प्रकल्पात अवघा ४.९४ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे.
विष्णूपुरीतून शहराला ३१ मे पर्यंत जिवंत जलसाठ्यातून पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यानंतर शहराची तहान प्रकल्पातील मृत जलसाठ्यातून भागवली जाणार आहे. प्रकल्पाच्या मृत जलसाठ्याची क्षमता २.७० दलघमी इतकी आहे. मात्र आजघडीला प्रकल्पात असलेला गाळ पाहता मृत जलसाठ्यातून २ दलघमी पाणी मिळण्याची अपेक्षा आहे. यातून १५ दिवस म्हणजेच १५ जूनपर्यंत शहराची तहान भागवता येणार आहे. त्यातही पावसाळा लांबल्यास मात्र दक्षिण नांदेडकरांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे.
दरम्यान, आयुक्त काकडे यांनी बुधवारी काबरानगर येथील जलशुद्धीकरणाची पाहणी करुन पाणी शुद्धीकरणाबाबत माहिती घेतली. आवश्यक त्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उपअभियंता संघरत्न सोनसळे, रमेश चौरे आदींनी जलशुद्धीकरण केंद्रातील कार्याची विस्तृत माहिती दिली.
जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई मुखेड तालुक्यात जाणवत असून सद्य:स्थितीत ५१ टँकरद्वारे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. टंचाई निर्मूलनार्थ विहीर व बोअर अधिग्रहणाचे १५७ प्रस्ताव दाखल झाले असून त्यातील १११ अधिग्रहण प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. मात्र एकाही प्रस्तावाला तहसील कार्यालयाकडून मंजुरी मिळाली नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
दहा अतिरिक्त पंप लावण्यात येणार
विष्णूपुरी प्रकल्पातील शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी २०१५ मध्ये मृत जलसाठ्यातील पाणी घेण्यात आले होते. त्यानंतर आता २०१९ मध्ये मृतजलसाठ्यातून पाणी घेण्याची वेळ आली आहे. तत्कालीन आयुक्त सुशील खोडवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी घेण्यात आले.
आता प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी मृत जलसाठ्यातूृन पाणी घेण्यासाठी आवश्यक ते नियोजन वेळीच केले आहे. कोटीतीर्थ आणि काळेश्वर येथे पाणी घेण्यासाठी १० अतिरिक्त पंपाद्वारे पाणी घेवून जॅकवेलमध्ये सोडले जाईल. तेथून ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नेले जाणार आहे.
उत्तर नांदेडकरांची पाण्याबाबत बल्ले... बल्ले...
पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे उत्तर नांदेडला सांगवी बंधाºयातून पाणीपुरवठा केला जात आहे. इसापूर प्रकल्पातून पाचवी पाणीपाळी ८ मे रोजी सोडण्यात आली आहे. हे पाणी गुरुवारी सांगवी बंधाºयात पोहोचणार आहे. या पाण्याने २५ दिवस उत्तर नांदेडची तहान भागली जाणार आहे. त्यानंतर पुन्हा १ ते १० जूनदरम्यान आवश्यकतेप्रमाणे इसापूर प्रकल्पातून सहावी पाणीपाळी घेतली जाणार आहे. त्यामुळे उत्तर नांदेडकर पाणीप्रश्नाच्या चिंतेतून मुक्त झाले आहेत.
शुद्ध पाणीपुरवठा
प्रकल्पातील पाणीपातळी तळाला गेल्याने गढूळ पाणी येत आहे. याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्त काकडे यांनी पाणीपुरवठा विभागाला सूचना केल्या. त्याचवेळी काही भागात स्वत: पाहणी केली. जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरणादरम्यान आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्यानंतर केंद्रातील फिल्टर बेड हे आठ तासांच्या अंतराने स्वच्छ केले जात आहे. त्यातच क्लोरीनच्या प्रमाणाकडेही लक्ष दिले जात आहे. शहराला उन्हाळ्या शेवटी आणि पावसाळ्याच्या प्रारंभी शुद्ध पाणी पुरवठा होईल, याकडे लक्ष दिले जाणार असल्याचे काकडे म्हणाले.

Web Title: after four years lifting the dead storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.