टाळे लागलेल्या आयुर्वेद व युनानी रसशाळेसाठी ३० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 01:01 AM2019-01-19T01:01:27+5:302019-01-19T01:02:39+5:30

राज्यात एकमेव असलेल्या नांदेडातील शासकीय आयुर्वेद आणि युनानी रसशाळेतील औषधीनिर्मिती गेल्या पाच वर्षांपासून ठप्प आहे़ एकेकाळी देशभरात दबदबा असलेल्या या रसशाळेला अखेरची घरघर लागली आहे़ असे असताना रसशाळेच्या सक्षमीकरणासाठी निधी देण्याऐवजी शासनाने टाळे लागलेल्या या इमारतीच्या रंगरंगोटी आणि देखभालीसाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे़

30 lakhs for Ayurveda and Unani Rashassala for the prevention | टाळे लागलेल्या आयुर्वेद व युनानी रसशाळेसाठी ३० लाख

टाळे लागलेल्या आयुर्वेद व युनानी रसशाळेसाठी ३० लाख

Next
ठळक मुद्देउत्पादन ठप्प असताना रंगरंगोटी आणि दुरुस्तीवर होणार खर्च

नांदेड : राज्यात एकमेव असलेल्या नांदेडातील शासकीय आयुर्वेद आणि युनानी रसशाळेतील औषधीनिर्मिती गेल्या पाच वर्षांपासून ठप्प आहे़ एकेकाळी देशभरात दबदबा असलेल्या या रसशाळेला अखेरची घरघर लागली आहे़ असे असताना रसशाळेच्या सक्षमीकरणासाठी निधी देण्याऐवजी शासनाने टाळे लागलेल्या या इमारतीच्या रंगरंगोटी आणि देखभालीसाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे़ त्यामुळे रसशाळेचे रुपडे पालटणार असले तरी, प्रत्यक्षात औषधी निर्मितीच नसल्यामुळे त्याचा काहीच उपयोग होणार नाही हेही तेवढेच खरे़
आयुर्वेद व युनानी रसशाळेला मोठा इतिहास आहे़ निजाम काळापासून ही रसशाळा अस्तित्वात असून देशभरात तिचा दबदबा होता़ या रसशाळेतून एकेकाळी देशभरात औषधी पुरवठा केला जात होता़ परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे या रसशाळेला नजर लागली़ गेल्या पाच वर्षांपासून शासनाने कच्चा माल खरेदीचे दरपत्रकच निश्चित केले नाही़ त्यामुळे औषधी उत्पादन ठप्प झाले़ रसशाळेतील तब्बल ४० लाखांहून अधिकची औषधी अनेक वर्षे तशीच पडून होती़
रसशाळेतील ११० कर्मचाऱ्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांना इतर विभागात हलविण्यात आले़ रसशाळेच्या भरभराटीच्या काळात औषधी वनस्पतींचा पुरवठ्यासाठी बारड परिसरात ४० हेक्टर जमीन घेण्यात आली होती़ या जमिनीवर १९८ प्रकारच्या विविध औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींची लागवड करण्यात आली होती़ परंतु आता रसशाळाच बंद पडल्यामुळे हे औषधी वनस्पती उद्यानही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे़ दुसरीकडे रसशाळेतील कोट्यवधी रुपयांची यंत्रेही धूळखात पडून आहेत़ तर काही यंत्रांचे पॅकींगही उघडण्यात आले नाही़ शासनाकडे रसशाळेसाठी अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला़ परंतु त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेल्याने नांदेडातील ही रसशाळा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे़ असे असताना शासनाने मात्र रसशाळेच्या कच्चा माल खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन रसशाळेला ‘अच्छे दिन’ आणण्याऐवजी इमारतीची रंगरंगोटी आणि दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला आहे़ प्रत्यक्षात उत्पादन बंद असल्यामुळे ही इमारत बंदच आहे़ यातील प्रयोगशाळेतील तज्ज्ञ सेवानिवृत्त झाल्यानंतर या ठिकाणी प्रयोगशाळाही नावालाच आहे़ असे असताना ३० लाखांच्या निधीची मंजुरी म्हणजे ‘आजार म्हशीला अन् इंजेक्शन पखालीला’ असाच काहीसा प्रकार असल्याचे दिसून येते़
नियोजनबद्ध रितीने रसशाळेतील उत्पादन पाडले बंद

  • नांदेडातील या रसशाळेत अनेक महत्त्वाची औषधी तयार केली जात होती़ ही औषधी जिल्हा परिषदेच्या रुग्णालयांमध्ये पाठविली जात होती़ तशी दरवर्षी मागणीही नोंदविण्यात येत होती़ परंतु, मध्यंतरी शासनाने रसशाळेकडून औषधी खरेदी न करता ती बाहेरुन घेण्यास सुरुवात केली होती़ त्यामुळे रसशाळा तोट्यात आली़ त्यात दरवर्षी कच्चा माल खरेदीसाठी शासनाकडून दरपत्रकच निश्चित करण्यात येत असल्यामुळे रसशाळेतील उत्पादन ठप्प झाले़
  • नांदेडातील ही रसशाळा टिकली पाहिजे यासाठी आतापर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासन स्तरावर प्रयत्नच केले नसल्याचे दिसून आले आहे़ रसशाळेच्या असलेल्या मोक्याच्या जागेवरच अनेकांचा डोळा आहे़ त्यामुळे रसशाळेच्या अधोगतीकडे दुर्लक्षच करण्यात आले़

 

Web Title: 30 lakhs for Ayurveda and Unani Rashassala for the prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.