संकलन केंद्रावर कचरा आढळल्यास झोन अधिकारी जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 01:45 AM2019-01-13T01:45:01+5:302019-01-13T01:45:56+5:30

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ संदर्भात शहरात सर्वत्र स्वच्छतेबाबत जनजागृती सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात शहरातील सफाई कर्मचारी याबाबत गंभीर नाहीत. स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तीन चमू गठित करण्यात आल्या आहेत. शहरातील कचरा उचलण्याच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. शहरातील १७० कचरा संकलन केंद्रावर कचरा पडून असल्याचे आढळून आल्यास संबंधित झोनचे सहायक आयुक्त, झोनल अधिकारी यांना जबाबदार धरले जाणार आहे.

Zone Officer responsible for collection of waste at the collection center | संकलन केंद्रावर कचरा आढळल्यास झोन अधिकारी जबाबदार

संकलन केंद्रावर कचरा आढळल्यास झोन अधिकारी जबाबदार

Next
ठळक मुद्देआयुक्तांचा आकस्मिक दौरा : दररोज सकाळी विविध भागातील स्वच्छतेची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ संदर्भात शहरात सर्वत्र स्वच्छतेबाबत जनजागृती सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात शहरातील सफाई कर्मचारी याबाबत गंभीर नाहीत. स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तीन चमू गठित करण्यात आल्या आहेत. शहरातील कचरा उचलण्याच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. शहरातील १७० कचरा संकलन केंद्रावर कचरा पडून असल्याचे आढळून आल्यास संबंधित झोनचे सहायक आयुक्त, झोनल अधिकारी यांना जबाबदार धरले जाणार आहे.
स्वच्छतेच्या कामात कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली आहे. प्रत्येक झोनमधील परिस्थिती पाहण्यासाठी आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या तीन चमू तयार केल्या आहेत. पहिल्या तुकडीत आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, दुसऱ्या चमूत अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे व अझीझ शेख तर तिसऱ्या चमूत उपायुक्त राजेश मोहिते व नितीन कापडनीस आदींचा समावेश आहे. तिन्ही चमूतील अधिकारी सकाळी ७ ते १० या वेळेत शहरातील विविध भागांमध्ये संबंधित झोनचे सहायक आयुक्त, झोनल अधिकारी, कनकचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतील. तसेच समस्यासंदर्भात कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत आहेत.
तीन चमूंनी शहरातील बसस्थानक, शाळा, उद्याने, तलाव, बाजार परिसरात भेट देऊन तेथील पाहणी केली आहे. शहरातील अंबाझरी, फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा या तलावाला आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. तलावातील गाळ, कचरा काढण्याचे निर्देश दिले. याशिवाय कॉटन मार्केट, कळमना बाजार, धरमपेठ, नेताजी बाजार, सक्करदरा, कमाल टॉकीज, गोकुळपेठ आदी बाजारांना भेट देऊन येथील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच शहरातील सार्वजनिक शौचालयांची पाहणी करून येथील स्वच्छतेबाबत निर्देश देण्यात आले. स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी आयुक्त दररोज सकाळी शहरातील विविध ठिकाणी आकस्मिक भेट देऊन पाहणी करीत असल्याने सफाई कर्मचारी व अधिकारी कामाला लागले आहेत.
दरम्यान, शुक्रवारी स्वच्छतेसंदर्भात बैठक घेण्यात आली होती. यात झोनच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. यावेळी अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, अजीज खान, उपायुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राजेश मोहिते, आरोग्य अधिकारी डॉ. संजय कांबळे, स्वच्छ भारत मिशनचे अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.
जीपीएस घड्याळ न वापरणाऱ्यावर कारवाई
स्वच्छतेच्या कामात बेजाबदारपणा बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे तसेच ओला व सुका कचऱ्याचे योग्य संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्याबाबतची पाहणी करून योग्य कार्यवाही करणे, हा आयुक्तांच्या दौऱ्याचा उद्देश आहे. यावेळी ‘जीपीएस घड्याळ’ न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यापुढेही घड्याळ न वापरल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

 

Web Title: Zone Officer responsible for collection of waste at the collection center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.