अबब ! नागपुरात अवतरला संत्र्यांचा ताजमहाल

ठळक मुद्दे२० ठिकाणी साकारलेल्या प्रतिकृती ठरल्या ‘सेल्फी पॉर्इंट’हत्ती, नाव, गांधीजींचा चष्मा, समुद्र मंथनाच्या प्रतिकृतीवर नागपूरकर मोहित

आॅनलाईन लोकमत
नागपूर : नागपुरातील २० महत्त्वाचे चौक व सार्वजनिक स्थळी या प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. जे.जे. कला महाविद्यालयाच्या प्राध्यापक, विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम व ‘लोकमत’च्या पाठिंब्यातून सकारलेल्या या अद्भूत प्रतिकृतींवर नागपूरकर मोहित झाले आहेत.
ताजमहाल साकारण्यासाठी लागली १२ हजार संत्री
रेशीमबाग परिसरातील सुरेश भट सभागृहाच्या दर्शनीस्थळी संत्र्यांनी साकारलेला भव्य ताजमहाल चर्चेचा विषय ठरला. तब्बल १२ हजार कृत्रिम संत्र्यांनी तयार केलेला हा ताजमहाल आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी येथे जणू स्पर्धाच लागली होती. जो तो या ताजमहालासोबत ‘सेल्फी’ काढत होता. ही प्रतिकृती जे.जे. कला महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी व्यंकटेश शिंदे याने साकारली. व्यंकटेश म्हणाला, पाच दिवसात ही प्रतिकृती उभारली. महाविद्यालयाचे प्रा. शशिकांत काकडे, प्रा. विजय बोंधर, प्रा. यशवंत भाऊसार व प्रा. नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि माझे मित्र व महाविद्यालयाचे विद्यार्थी कृष्णा पंडित, सुनील निंगुळे, सुहास संकपाळ यांच्या मदतीने ती आणखी सुरेख झाली.
हत्ती पाहण्यासाठी गर्दी
संत्र्यांचा हत्ती कसा असेल, हे पाण्यासाठी शनिवारी सकाळपासून ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्कमध्ये चिमुकल्यांसह मोठ्यांनीही एकच गर्दी केली. १० फूट उंच व ६ फूट रुंद असलेला हा हत्ती जे.जे. कला महाविद्यालयाचा विद्यार्थी सुहास संकपाळ याने साकारला. लहान मुलांमध्ये सर्वाधिक आवडीचा प्राणी असलेला हत्ती साकारणे तसे अवघड होते. परंतु सुहासने हे अवघड काम लीलया पेलून सहज करून दाखविले. यात त्याला महाविद्यालयाचे प्राध्यापक व मित्रांनी मदत केली.
गांधीजींचा चष्माही संत्र्यांचा
जे.जे. कला महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी मुक्ता वैद्य हिने फुटाळा तलावाच्या चौपाटीवर साकारलेला महात्मा गांधींचा चष्मा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. स्वच्छ भारत अभियानाचा प्रतीक असलेला हा चष्मा खऱ्याखुऱ्या संत्र्याने उभारला आहे. केवळ चष्म्याची गोल फ्रेम ही कृत्रिम संत्र्यांनी तयार केली आहे. मुक्ताचा हा पहिला प्रयत्न असलातरी या सुंदर कलाकृतीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

समुद्रमंथनातून निघाली संत्री
फुटाळा तलावाच्या चौपाटीशेजारी साकारलेला समुद्रमंथनाचा देखावा हा अप्रतिम असाच आहे. या मंथनातून बाहेर आलेली अमृतरुपी संत्री आहे. विशेष म्हणजे, दोर खेचणा ऱ्या माणसाची प्रतिकृती ही सुतळीच्या दोराने तयार केली आहे. १६ फूट रुंद आणि ५ फूट उंचीची ही प्रतिकृती कलाकाराच्या कल्पनेची उंच भरारी आहे. ही प्रतिकृती जे.जे. कला महाविद्यालयाचा विद्यार्थी चंद्रकांत हल्याळ याने साकारली आहे. प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे
फुटाळा तलावावर संत्र्यांची नाव
फुटाळा तलावावर संत्र्यांची नाव असा सुरेख संगम जुळून आला आहे. जे.जे. कला महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रफुल रंगदाई याच्या अथक प्रयत्नातून ही नाव साकारण्यात आली आहे.खऱ्याखुऱ्या संत्र्यांनी साकारलेल्या या नावेची उंची १२ फूट आहे. दुरून ही प्रतिकृती पाहिल्यावर पाण्यावर संत्र्याची नाव तरंगत असल्याचा भास होतो. ही नाव म्हणजे सर्वांसाठी ‘सेल्फी पॉर्इंट’ ठरले आहे. सायंकाळच्या मावळत्या सूर्यप्रकाशात या नावेचे सौंदर्य आणखी खुलले होते.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.