नागपुरात अभिवादन प्रश्नमंजूषा स्पर्धेने घडविला जागतिक विक्रम : १४ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 04:58 PM2017-12-06T16:58:34+5:302017-12-06T17:02:21+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन आॅफ इंजिनिअर्स शाखा नागपूर (बानाई) तर्फे बुधवारी अभिवादन प्रश्नमंजूषा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत तब्बल १११ शाळांमधील जवळपास १४ हजारावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मध्य प्रदेशातील रेकॉर्ड तोडून एक नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

World Record in Nagpur: More than 14 thousand students participants | नागपुरात अभिवादन प्रश्नमंजूषा स्पर्धेने घडविला जागतिक विक्रम : १४ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

नागपुरात अभिवादन प्रश्नमंजूषा स्पर्धेने घडविला जागतिक विक्रम : १४ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

Next
ठळक मुद्देनागपूरकरांनी रचला आणखी एक जागतिक विक्रमबानाई या संस्थेच्या पुढाकारातून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड

नागपूर :
गायनापासून तर कुकिंगपर्यंतचा विक्रम नागपूरने आपल्या नावावर केले आहेत. या विक्रमात आणखी एका जागतिक विक्रमाची भर पडली आहे.
बानाईतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांनी केलेल्या राष्ट्रीय कार्याबद्दल युवा पिढीत जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने मागील चार वर्षांपासून प्रश्नमंजूषा स्पर्धा घेतली जात आहे. परंतु आजवर ही स्पर्धा शहरातील विविध शाळांमध्ये होत होती. एकाच ठिकाणी ही स्पर्धा कधी झाली नाही. मध्य प्रदेशात अशीच एक स्पर्धा पार पडली होती. त्यावेळी एकाचवेळी ४,९०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तेव्हा गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली होती. हा विक्रम नागपुरातही होऊ शकतो, असे बानाईच्या लक्षात आले. त्यांनी या दिशेने नियोजन केले. त्यातून अभिवादन प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्याचे निश्चित झाले. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धा ही संपूर्ण वस्तुनिष्ठ स्वरुपाची होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जीवन चरित्र व कार्यावर आधारित ही स्पर्धा होती. ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व हिंदी या दोन भाषांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. ही संपूर्ण स्पर्धा नि:शुल्क होती. जवळपास १११ शाळांमधील १४,८१५ विद्यार्थ्यांची नोंदणी आधीच झाली होती. परंतु त्यापेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेसाठी आले. जागेअभावी काही विद्यार्थ्यांना बाहेरच थांबावे लागले. १४ हजारावर विद्यार्थ्यांनी एकाचवेळी परीक्षा देऊन जुना विक्रम मोडला आणि नवीन जागतिक विक्रमाला गवसणी घातली.
आकाशवाणीचे वरिष्ठ उद्घोषक अशोक जांभुळकर यांनी संचालन केले. बानाईचे अध्यक्ष डॉ. सुनील तलवारे, उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, सचिव डॉ. मनोज रामटेके, गोपाल वासनिक, प्रवीण जाधव, डॉ. विजय धाबर्डे, रवींद्र जनबंधू आदींसह बानाईची संपूर्ण टीम यावेळी कार्यरत होती.

 उर्वरित विद्यार्थ्यांनाही मिळाली संधी
जागेअभावी आणि उशिरा आलेल्या ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही, त्यांनी परीक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी आयोजकांपुढे मोठी पंचाईत उभी राहिली. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून आयोजकांनी उर्वरित विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हा आकडा नोंदणीपेक्षा कितीतरी अधिक होता.

प्रशस्तीपत्रांसह रोख पुरस्कारही मिळणार
या स्पर्धेतील प्रथम पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्याला ५० हजार रुपये रोख रकमेसह सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येईल. द्वितीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यास ३० हजार व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यास २० हजार रुपये रोखसह सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाईल. प्रत्येक शाळेतून पहिला क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यास एक हजार रुपये रोख दिले जाईल. सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास प्रशस्तीपत्र दिले जाईल. दोन महिन्यानंतर भव्य समारंभात हे पुरस्कार दिले जातील.

 मध्य प्रदेशातील रेकॉर्ड तुटला
यापूर्वी मध्य प्रदेशातील मेहर येथे प्रतिभा समाजसेवा कल्याण समितीच्यावतीने ‘राईट टू एज्युकेशन’ या विषयावर स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. त्यावेळी एकाचवेळी ४९०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा देऊन गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. बानाईने घेतलेल्या या परीक्षेत १४ हजारावर विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सहभागी हेऊन हा रेकॉर्ड तोडला.

 अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद
बानाईचे अध्यक्ष सुनील तलवारे यांनी सांगितले की, आम्ही जी अपेक्षा केली होती, त्यापेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. यासाठी सर्व शाळा, विद्यार्थ्यांसह नागपूरकरांचे आभार मानतो. जुना विक्रम तुटला आहे. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉडसाठी दोन पद्धती असतात एक त्यांची टीम स्वत: येऊन निरीक्षण करते. तर दुसरे त्यांना आवश्यक पुरावे सादर करावे लागतात. आम्ही दुसरी पद्धत अवलंबिली आहे.

Web Title: World Record in Nagpur: More than 14 thousand students participants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.