जागतिक संगीत दिन; लोकल ‘म्युझिक कल्चर’ बनतेय ग्लोबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 10:06 AM2018-06-21T10:06:55+5:302018-06-21T10:07:05+5:30

अनेकांनी संगीत क्षेत्रात व्यावसायिक यश मिळविले आहे तर अनेकजण छंद म्हणून या संगीत संस्कृतीला समृद्ध करू पाहत आहेत. अशा संगीत साधकांच्या मनोगतातून त्यांचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

World Music Day; Local 'Music Culture' becomes Global | जागतिक संगीत दिन; लोकल ‘म्युझिक कल्चर’ बनतेय ग्लोबल

जागतिक संगीत दिन; लोकल ‘म्युझिक कल्चर’ बनतेय ग्लोबल

Next
ठळक मुद्देक्लासिकल, लाईट व सर्व प्रवाहाची दमदार वाटचालपुन्हा बहरू लागल्या संगीत मैफली कलावंतांच्या प्रतिभेला नागपूरकरांची दाद

निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘ए आई मला झोप येत नाहीये गाणे म्हण’ अशी आर्त हाक देणाऱ्या मुलाला प्रेमाची थपकी देताना आई जेव्हा अंगाईगीत गाते तेव्हा त्यातला गोडवा, लय आणि त्यातला जिव्हाळा, या संगमातून बाळ केव्हा झोपी जाते, हे दोघांनाही समजत नाही. त्या बाळाला संगीत म्हणजे काय, हे माहितीही नसेल, पण त्यातील स्वरलहरींनी तो सुखावतो. संगीताच हे असच असते. आपल्याला संगीत आवडत नाही, संगीताशी आपला काही संबंध नाही, असे म्हणणारा एकही माणूस या पृथ्वीतलावर शोधूनही सापडणार नाही. तसं पाहिलं तर आपले आयुष्य संगीताच्या सप्तसुरांनी व्यापले आहे. वसुंधरेच्या प्रत्येक कणाकणात संगीत सामावले आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात नवचैतन्य संचारले आहे. त्यामुळे दूरवरच्या फ्रान्सने रुजविलेला ‘संगीत दिन’ जगभरात स्वीकारला गेला.
गायकांच्या सुरांशी जेव्हा अनेक वाद्यांचा मिलाप होतो तेव्हा कलावंत आणि रसिक या दोघांनाही नादसमाधीची अवस्था प्राप्त होते. विज्ञानानेही हे संगीताचे अध्यात्म मान्य केले आहे. सप्तसुरांच्या स्पर्शाने आपले नागपूरही आनंदले आहे. काही वर्षाआधी संगीत कला क्षेत्रावर एक मरगळ आली होती. मात्र काही कलावंतांच्या सततच्या प्रयत्नांनी संगीताची मैफल पुन्हा बहरू लागली आहे. अनेक नवीन गायक-वादक कलावंतांनी आपले कौशल्य सिद्ध केले असून त्यांच्या प्रतिभेचे सूर सर्वत्र निनादत आहेत. अनेकांनी संगीत क्षेत्रात व्यावसायिक यश मिळविले आहे तर अनेकजण छंद म्हणून या संगीत संस्कृतीला समृद्ध करू पाहत आहेत. अशा संगीत साधकांच्या मनोगतातून त्यांचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

-तरच मिळेल प्रतिभांना बळ
येणाऱ्या प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे विविध कलासंस्थाचे होणारे कार्यक्रम आणि त्या प्रत्येक कार्यक्रमात रसिकांची होणारी गर्दी या परिवर्तनाचे रूप दर्शविणारी आहे. कदाचित धावपळीत जगताना विरंगुळ््याचा एक क्षण शोधण्यासाठीच हा ओढा संगीत कार्यक्रमाकडे वाढला आहे. नव्या कलावंतांसाठी ही बाब नक्कीच स्वागतयोग्य आहे. मात्र संगीताला व्यवसाय म्हणून स्वीकारण्यापूर्वी रियाज आणि तयारी करणे आवश्यक आहे. श्रोत्यांना प्रत्येक कार्यक्रमात नवीन काही देण्याचा प्रयत्न करावा. हौशी कलावंतांनी परफार्म करण्याची घाई न करता आधी तयारीवर भर देणे गरजेचे आहे. पासेस द्याल तर येतो ही मनोवृत्ती चुकीची आहे. श्रोत्यांनी तिकीट काढूनच स्थानिक कलावंतांचे कार्यक्रम नक्की पहावे. तरच या प्रतिभांना बळ मिळेल.
- श्वेता शेलगावकर, प्रसिद्ध निवेदिका

राजेश दुरुगकर

प्रतिभावंत गायक राजेश दुरुगकर यांची २५ वर्षाची संगीत साधना आज नागपूरकर आणि त्याबाहेरही परिचित झाली आहे. राजेश व्यवसायाने अभियंता असून एका कंपनीत काम करतात. प्रोफेशनल गायक म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. लहानपणापासून संगीतसाधना करणारे राजेश यांनी २००० पासून व्यावसायिक शो करणे सुरू केले. स्वरमधुरा संस्थेच्या माध्यमातून विविध विषय, नवीन संकल्पना व नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्रम आखले. त्याला रसिकांनीही भरभरून दाद दिली. संगीताकडे आलो की थकवा आपोआपच दूर होत असल्याचे ते सांगतात. स्वत:च्या कलेवर आत्मविश्वास होता, त्यामुळे अनिश्चितता कधी जाणवली नाही. आज चांगले स्वरूप आले आहे. नवीन कलावंतांना संधी मिळत असल्याचे ते म्हणतात.

निरंजन बोबडे

नागपूरकरांचा आणखी एक लाडका कलावंत म्हणजे निरंजन बोबडे. वडिलांचा वारसा स्वीकारलेल्या प्रतिभावंत गायक निरंजनने व्यावसायिक यशही सिद्ध केले आहे. त्याने ही प्रतिभा स्वत:पुरती मर्यादित न ठेवता ‘स्वरतरंग’ संस्थेच्या माध्यमातून व्यापक रूप दिले. गेल्या दहा वर्षात या संस्थेतून शेकडो कलावंत घडले आहेत. १२०० कलावंतांना प्रशिक्षण दिले तर ३५० कलावंत या संस्थेत संगीत साधना करीत आहेत. संस्थेकडून दर महिन्याला कार्यक्रम घेतला जातो व प्रत्येक कार्यक्रमाला होणारी गर्दी रसिकांकडून भरभरून मिळणाऱ्या प्रेमाची पावतीच होय. निरंजनची ही यशस्वी वाटचाल उपराजधानीतील संगीत संस्कृतीला समृद्ध करणारीच आहे.


सागर मधुमटके
सागर मधुमटके म्हणजे आजचा लोकप्रिय आणि नागपूरचा लाडका कलावंत. त्याच्या आवाजाचे दर्दी चाहते आज पुण्या-मुंबईपर्यंत पसरले आहेत. मात्र आज स्टार झालेल्या या गुणी कलावंतांला संघर्ष करावा लागला आहे. गरिबीच्या झळा सहन करताना वेदनांवर फुंकर घालण्याचे काम संगीताने केले. किशोर कुमारशी साधर्म्य साधणारा आवाज. त्याचे मामा श्याम सागर यांनी त्याच्या प्रतिभेला वेकोलिच्या आॅर्केस्ट्रामध्ये संधी दिली. त्यानंतरही अनेक वर्ष संघर्षात गेले. अनेक वर्ष ड्रमर म्हणूनही काम केले. कधी एखाद्या गायकाच्या अनुपस्थितीत संधी मिळायची आणि सागर यांनी या प्रत्येक संधीचे सोने केले. पुढे रेडिओवर एका स्पर्धेत निवड झाल्यानंतर त्यांना गायनाची संधी मिळाली आणि या प्रतिभावंत गायकाला नवी ओळख मिळाली. आज त्यांचा कार्यक्रम म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. गेल्या २६ वर्षाची त्यांची ही संगीत साधना फळाला आली आहे.

सोनाली दीक्षित
उपराजधानीच्या कलाविश्वातील एक चमकणारा तारा म्हणजे सोनाली दीक्षित. या प्रतिभावंत गायिकेने १९९५ पासूनच्या त्यांच्या प्रवासात अनेक स्टेज शो, स्पर्धा, टीव्ही मालिका, म्युझिक अल्बम करण्यासह अनेक मातब्बर गायकांसोबत सादरीकरण केले आहे. लहानपणापासून शास्त्रीय संगीताचे धडे घेतलेल्या सोनाली यांनी संगीत विषयात बीए, एमएची पदवी घेतली. सारेगमपा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली तर ‘ता रा रम पम’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यांनी अरुण दाते, सोनू निगम, अवधूत गुप्ते या गायकांसोबत थेट सादरीकरण केले तर सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती व देवकी पंडित आदी दिग्गजांसोबत संगीत अल्बम केले आहेत. कापूस कोंड्याची गोष्ट या चित्रपटातील गायनासाठी त्यांना सन्मानितही करण्यात आले. त्यांनी दिली.

ईशा व योगेंद्र रानडे
उपराजधानीच्या कलाक्षेत्रासह महाराष्ट्रातही आपली ओळख निर्माण करणाऱ्या प्रतिभावंतांमध्ये ईशा व योगेंद्र रानडे या जोडीचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. योगेंद्र यांनी १९९९ ला स्वरश्री संस्थेच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात पदार्पण केले. पुढे कलासंगत प्रतिष्ठानची स्थापना केली आणि स्वतंत्र कार्यक्रम करणे सुरू केले. त्यांच्या पत्नीचीही साथ त्यांना लाभली व गेल्या १३-१४ वर्षापासून या जोडीचा एकत्रित प्रवास सुरू आहे. केवळ नागपूरच नाही तर पुणे-मुंबईतही त्यांच्या कार्यक्रमांना रसिकांचा प्रतिसाद मिळत आहे. चांगले काम आणि मेहनत करून कला सादर केली तर कुठल्याही रसिकांना ती आवडते असे ते सांगतात. त्यांचा डिझाईनिंग व प्रिटिंगचा व्यवसाय आहे. मात्र गाणे बंद करावे, असे कधी वाटले नाही. देवाने प्रतिभा दिली आहे व ती मेहनतीने टिकवणे आपल्या हाती असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सुधीर कुणावार
सुधीर कुणावार डॉक्टर आणि रिअल इस्टेटचा व्यवसायही सांभाळतात. मात्र जीवनातील ताणतणाव आणि व्यावसायातील थकवा घालविण्यासाठी संगीत मोठा विरंगुळा ठरल्याचे त्यांना वाटते. हे एक औषधच असल्याचे ते म्हणतात. त्यामुळे चार वर्षापासून सप्तरंग ग्रुपची स्थापना त्यांनी केली व त्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. वर्षाला किमान चार कार्यक्रम घेत असल्याचे सांगत यामधून आमच्यासारख्या हौशी कलावंतांनाही गायनाची, वादनाची संधी मिळत असल्याचे ते म्हणाले. संगीत आपली आवड असल्याचे सांगत ही आवड जोपासताना तीन वर्षापासून शास्त्रीय संगीताचे धडे घेत असल्याचे ते म्हणाले.
 

Web Title: World Music Day; Local 'Music Culture' becomes Global

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :musicसंगीत