Women took control of Intercity, Vidarbha Express | महिलांनी घेतला इंटरसिटी, विदर्भ एक्स्प्रेसचा ताबा
महिलांनी घेतला इंटरसिटी, विदर्भ एक्स्प्रेसचा ताबा

ठळक मुद्देनागपूर स्थानकावर ‘डीआरएम’ने दाखविली हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारी दोन रेल्वेगाड्यांचा ताबा महिला कर्मचाऱ्यांनी घेतला. यात नागपूर-भुसावळ इंटरसिटी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसचा समावेश आहे. या रेल्वेगाड्यांना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता, दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘सिनियर डीसीएम’ अर्जुन सिबल यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता यांनी रवाना केलेल्या इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये लोकोपायलट म्हणून माधुरी उराडे यांनी तर सहायक लोकोपायलट म्हणून मंजू वैद्य यांनी गाडीचा ताबा घेतला तर गार्डची जबाबदारी पूनम मेश्राम यांनी पार पाडली. गाडीतील इतर महिला कर्मचाऱ्यांमध्ये कंडक्टर वृंदा देसाई, तिकीट तपासणी कर्मचाऱ्यात शालिनी मीना, छाया गर्गे, महानंदा वाटकर यांचा समावेश होता. इंटरसिटी एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी उपस्टेशन व्यवस्थापक दीपाली मानकरे, अनघा मेश्राम यांच्यासोबत पॉर्इंट वूमेन अगस्था फ्रान्सिस उपस्थित होत्या. नागपूर रेल्वे स्थानकावरून सकाळी ७.३० वाजता महिलांद्वारा संचालित इंटरसिटी एक्स्प्रेस रवाना होत असताना वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (टीआरओ) महेश कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र, स्टेशन संचालक डी. एस. नागदेवे, अधिकारी आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दुसरीकडे सकाळी ९ वाजता मुंबई-गोंदिया-विदर्भ एक्स्प्रेसला वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांनी हिरवी झेंडी दाखविली. विदर्भ एक्स्प्रेसची कमान गार्ड कौशल्या साहू, लोकोपायलट सुनीता चौधरी, सहायक लोकोपायलट स्नेहा सहारे यांच्यासह तिकीट तपासणी कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला यांनी सांभाळली. यावेळी वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता आर. के. पटेल यांच्यासह महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिलांना संधी मिळावयास हवी
इंटरसिटी आणि विदर्भ एक्स्प्रेसमधील लोकोपायलट, सहायक लोकोपायलट, टीटीई, आरपीएफच्या महिलांशी चर्चा केली असता, महिलांना स्व:तला सिद्ध करण्यासाठी त्यांना संधी मिळावयास हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आज आम्हाला संधी मिळाली असून, ही संधी आम्ही जबाबदारीने पार पाडू; भविष्यात अशी संधी मिळाल्यास महिला अधिक विश्वासाने आपले कार्य करून रेल्वेला प्रगतिपथावर नेण्यासाठी योगदान देऊ शकतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.


Web Title: Women took control of Intercity, Vidarbha Express
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.