नागपुरातील सिमेंट रस्ते ५० वर्षे टिकतील का ? वर्षभरातच भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 09:28 PM2018-01-12T21:28:45+5:302018-01-12T21:31:41+5:30

गेल्या सहा वर्षांपासून शहरात सिमेंट रस्ते बांधले जात आहेत. हे रस्ते पुढील ५० वर्षे टिकतील, असा दावा करण्यात आला होता. मात्र, धड वर्षभरही हे रस्ते टिकलेले नाहीत. सिमेंट रस्त्यांना भेगा पडू लागल्या आहेत.

Will cement roads long lasting in Nagpur for 50 years? Within a year cracked on the road | नागपुरातील सिमेंट रस्ते ५० वर्षे टिकतील का ? वर्षभरातच भेगा

नागपुरातील सिमेंट रस्ते ५० वर्षे टिकतील का ? वर्षभरातच भेगा

Next
ठळक मुद्देगुणवत्तेवर प्रश्नचिन्ह :  कामही अर्धवट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डांबरी रस्ते वारंवार उखडतात. त्यावर खड्डे पडतात. यापासून होणाऱ्या त्रासापासून नागपूरकरांची मुक्तता करण्यासाठी दीर्घकाळ टिकणाऱ्या सिमेंट रस्त्याचे जाळे शहरभर निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या सहा वर्षांपासून शहरात सिमेंट रस्ते बांधले जात आहेत. हे रस्ते पुढील ५० वर्षे टिकतील, असा दावा करण्यात आला होता. मात्र, धड वर्षभरही हे रस्ते टिकलेले नाहीत. सिमेंट रस्त्यांना भेगा पडू लागल्या आहेत. एवढेच नव्हे तर पहिल्या टप्प्यातील फक्त ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील २५ ते ३० टक्के काम झाले आहे. यामुळे सिमेंट रस्ते प्रकल्पावरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
सिमेंट रस्त्याच्या गुणवत्तेकडे कमालीचे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळेच सिमेंट रस्त्यांना भेगा पडू लागल्या आहेत. पहिल्या टप्प्यात जगनाडे चौक ते अशोक चौकादरम्यान तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या आहेत. या भेगा स्पष्टपणे दिसत आहेत. या मार्गावर बांधलेल्या सिमेंट रस्त्याची जाडी २० सेंटिमीटर आहे. तज्ज्ञांच्या मते ही जाडी किमान २५ ते ३० सेंटिमीटर असावी. या मार्गावर व्हाईट टॉपिंग चा उपयोग करण्यात आला आहे. या सिमेंट रोडच्या समांतर नागनदी वाहते. सिवरेज लाईन व जलवाहिनी देखील आहे. त्यामुळे या मार्गावर अधिकच भेगा पडलेल्या आहेत. या रस्त्याचे काम सुरू झाले त्यावेळी व्हीएनआयटीकडून रस्त्याचे डिझाईन व तयार करण्याच्या पद्धतीबाबत मंजुरी घेण्यात आली होती. मात्र, हे सर्व फेल ठरले. यापासून धडा घेत रेशीमबाग ते अशोक चौकापर्यंतच्या रस्त्याची जाडी २२ ते २५ सेंटिमीटर करण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्ते तयार करताना त्याची जाडी व डिझाईन याची विशेष काळजी घेतली गेली. यानंतरही काही रस्त्यांना भेगा पडल्या आहेत.
मानेवाडा, अयोध्यानगर, सक्करदरा, छोटा ताजबाग रोड, तुकडोजी चौक आदी भागातील सिमेंट रस्त्यांवर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.
रुरकीच्या तज्ज्ञांनी केली पाहणी
 सिमेंट रस्त्याला एवढ्या लवकर भेगा पडल्यामुळे महापालिका प्रशासनही चिंतेत आहे. यामुळेच महापालिकेने सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट (सीआरआरआय) रुरकीच्या तज्ज्ञांना पाहणी करण्याची विनंती सहा महिन्यांपूर्वी केली होती. दौऱ्यासाठी सहा लाख रुपये देखील जमा केले होते. महिनाभरापूर्वी सीआरआरआयच्या चमूने संबंधित मार्गाचे निरीक्षण केले. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. दुसऱ्या टप्प्यात गुणवत्ता नियंत्रणासाठी जियोटेक कंपनीला जवाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे दिसत नाही. कामाची गतीही वाढलेली नाही.
नव्या रस्त्यांवर ग्रीड झाले लहान
 मुख्य सिमेंट रस्त्यांना भेगा पडू नये म्हणून ३.२५ बाय ३.७५ मीटरचे ग्रीड (बॉक्स) तयार करण्यात आले आहेत. मात्र, बऱ्याच ठिकाणी हा फॉर्म्युला देखील यशस्वी ठरला नाही. त्यामुळे आता नव्या मार्गांवर ग्रीडचा आकार २ मीटरहूनही कमी करण्यात आला आहे. टाटा पारसी शाळेसमोरील सिमेंट रोडवर हे पाहायला मिळते. जुन्या मार्गांवर मात्र ४.५० मीटरपर्यंत कटिंग करण्यात आली होती. नव्या तंत्रज्ञानामुळे सिमेंट रोडच्या ग्रीडचा आकार १.२५ मीटर बाय १.२५ मीटर निस्चित करण्यात आला आहे. यामुळे भेगा पडल्या तरी त्या वाढत नाहीत.
भेगा पडलेल्या रस्त्यांचे बिल रोखले : बनगिनवार
 महापालिकेचे मुख्य अभियंता विजय बनगिनवार यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यामध्ये जगनाडे चौक ते रेशीमबाग दरम्यान मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामातही काही ठिकाणी तशाच तक्रारी आहेत. याची गंभीर दखल घेत भेगा पडलेल्या रस्त्यांचे बिल रोखण्यात आले आहे. संबंधित कंत्राटदारालाच या रस्त्यांची पुढील पाच वर्षे देखभाल दुरुस्ती करायची आहे. त्यांनाच या भेगा दुरुस्त कराव्या लागतील. पावसाळ्यापूर्वी या भेगांची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी हे प्रमाण दोन टक्क्यांहून कमी होते. दुसऱ्या टप्प्यात तर भेगा पडण्याचे प्रमाण एक टक्क्यांहूनही कमी असल्याचा दावा त्यांनी केला. पडलेल्या भेगांची मॅपिंग करण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील आठवड्यात बैठक घेऊन याचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सिमेंट रोडची स्थिती  : पहिला टप्पा
 पहिल्या टप्प्यात २५.७७५ किमीच्या ३० सिमेंट रोडसाठी ६ जून २०११ रोजी वर्कआर्डर देण्यात आल्या होत्या. त्यावेळी १०१.१८ कोटी खर्च प्रस्तावित करण्यात आला होता.
 २४ महिन्यात संबंधित काम पूर्ण करायचे होते. यूनिटी इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेडला काम देण्यात आले होते.
 जानेवारी २०१८ पर्यंत ९.९४८ किमीचे काम पूर्ण झाले आहे. ४.१०२ किमी लांबीच्या रस्त्याचे काम सुरू आहे.
 आठ सिमेंट रस्त्यांचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

दुसरा टप्पा
 दुसऱ्या टप्प्यात ५५.४२ किमी सिमेंट रस्त्यासाठी २७९ कोटी रुपयांचा वर्कआर्डर काढण्यात आला. सरकार तर्फे ८ जानेवारी २०१६ रोजी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली.
नासुप्र व राज्य सरकारतर्फे संबंधित प्रकल्पासाठी १००-१०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. उर्वरित रक्कम महापालिकेला खर्च करायची आहे.
 सिमेंट रस्त्याचे २२ पॅकेज तयार करून वेगवेगळ्या कंत्राटदारांना काम देण्याचा निर्णय घेण्यात आला.
 सद्यस्थितीत ३३ रस्त्यांचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील ३० टक्के म्हणजेच सुमारे ९० कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यात अनियमितता
 तिसऱ्या टप्प्यातील ६ पॅकेजमध्ये ३०० कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते तयार करायचे आहेत. मात्र, निविदाकार न आल्याने संबंधित पॅकेजची दहा भागात विभागणी करण्यात आली. प्रत्येक पॅकेज २० ते २५ कोटींचे करण्यात आले. एका वर्षात सहा निविदा निघाल्या. पाचव्या वेळी दहापैकी पाच पॅकेजसाठी कंत्राटदारांनी उत्सुकता दाखविली. मात्र, निविदा भरणाऱ्या काही कंत्राटदारांना फक्त कागदी अनुभव असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याच्या एका कंपनीकडून निविदेसाठी कागदपत्रे तयार करून घेण्यात आली. एक फूट रस्ता बनला नसतानाही तिला ८४ कोटी रुपये अदा करण्यात आले.

Web Title: Will cement roads long lasting in Nagpur for 50 years? Within a year cracked on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.