Wife murdered by husband in Butibori, Nagpur | नागपूरनजीक बुटीबोरी येथे पतीने केला पत्नीचा खून

ठळक मुद्देआरोपी पसार

आॅनलाईन लोकमत
नागपूर : पत्नीचा गळा आवळून पतीने खून केला आणि खोलीची बाहेरून कडी बंद करून निघून गेला. ही घटना बुटीबोरी (जुनी) येथील आझादनगरात बुधवारी रात्री ८ ते गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली असून, सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
अनिशा श्याम नारायण (२४, रा. आझादनगर, जुनी बुटीबोरी) असे मृत पत्नीचे नाव असून, श्याम नारायण (रा. दिल्ली) असे आरोपी पतीचे नाव आहे. अनिशा आणि श्याम यांचा प्रेमविवाह असून, विवाहानंतर दोघेही दिल्ली येथे राहायचे. श्याम हा दिल्ली येथील एका भांड्याच्या कारखान्यात नोकरीत करतो. अनिशा ही सहा महिन्यांपूर्वी अर्थात रक्षाबंधननिमित्त बुटीबोरी येथे माहेरी आली होती. त्यानंतर ती दिल्लीला परत गेली नाही. तिने श्यामलाही बुटीबोरी येथे स्थायिक होण्यास तयार केले होते. श्यामनेही तिला यासाठी होकार दिला होता.
अनिशा व श्याम या दाम्पत्याला दोन वर्षांची एन्जेल नामक मुलगी आहे. अनिशा ही एन्जेलला घेऊन तिच्या वडिलांच्या घराजवळ राहणाऱ्या  तिच्या काकांच्या घरी राहायची. श्याम हा दोन दिवसांपूर्वीच दिल्लीहून बुटीबोरी येथे आला होता. अनिशाचे वडील चंद्रभान रामटेके (आझादनगर, जुनी बुटीबोरी) हे गुरुवारी सकाळी तिच्या घरी गेले असता, त्यांना खोलीचे दार बाहेरून बंद असल्याचे आढळले. त्यांनी दाराची कडी उघडून आत प्रवेश केला असता, त्यांना अनिशा ही खोलीत मृतावस्थेत पडली असल्याचे तसेच श्याम नारायण खोलीतून बेपत्ता असल्याचे आढळून आले.
अनिशाचा खून करण्यात आल्याचे लक्षात येताच त्यांनी या प्रकाराची माहिती लगेच बुटीबोरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा गेला आणि मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विजय मराठे करीत आहेत.

कौटुंबिक कलह
अनिशा आणि तिचा पती श्याम यांच्यात मागील काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून कलह होता. त्याच कलहातून श्यामने अनिशाचा गळा आवळून खून केला असा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. कारण, श्याम घरून निघून गेला असून, अनिशाच्या खोलीचे दार बाहेरून बंद होते. विशेष म्हणजे, श्याम हा दोन दिवसांपूर्वीच दिल्ली येथून बुटीबोरीला आला होता. पोलिसांनी लगेच श्यामचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा मोबाईल क्रमांक ‘ट्रेस’ केला असता, तो वर्धा परिसरात कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे श्याम वर्धेच्या दिशेने पळाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्याच्या शोधार्थ वर्धेच्या दिशेने पोलीस पथक रवाना करण्यात आल्याचेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.