सार्वजनिक बागांमध्ये जाहिरातींचा गोंगाट कशासाठी? नागपूर महानगरपालिकेने सुरु केली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 10:00 AM2018-01-24T10:00:28+5:302018-01-24T10:01:31+5:30

सकाळ व संध्याकाळच्या वेळेत नागपूर महानगरपालिकेने सार्वजनिक पार्कमध्ये संगीत व जाहिराती ऐकविण्याच्या सुरु केलेल्या उपक्रमावर नागरिक संतप्त झाले आहेत.

Why the noise of advertising in public parks? Nagpur Municipal Corporation started its headache | सार्वजनिक बागांमध्ये जाहिरातींचा गोंगाट कशासाठी? नागपूर महानगरपालिकेने सुरु केली डोकेदुखी

सार्वजनिक बागांमध्ये जाहिरातींचा गोंगाट कशासाठी? नागपूर महानगरपालिकेने सुरु केली डोकेदुखी

Next
ठळक मुद्देनागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सकाळ व संध्याकाळच्या वेळेत नागपूर महानगरपालिकेने सार्वजनिक पार्कमध्ये संगीत व जाहिराती ऐकविण्याच्या सुरु केलेल्या उपक्रमावर नागरिक संतप्त झाले आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपला ताणतणाव घालविण्यासाठी व विरंगुळा म्हणून नागरिक सकाळी व सायंकाळी गार्डनमधील शांत वातावरणात फिरायला येतात. शहरातील रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ, सुरू असलेल्या कामामुळे उडणारी धूळ व ध्वनी प्रदूषण यामुळे गार्डनशिवाय दुसरे मन:शांतीचे ठिकाण नाही. परंतु महापालिकेच्या गार्डनमध्ये लवकरच सकाळी व संध्याकाळी जाहिरातीचा गोंगाट नागरिकांच्या कानावर पडणार आहे. गार्डनमध्ये हा गोंगाट कशाला असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.
महापालिकेचे विविध आर्थिक स्रोत आहेत. परंतु उपलब्ध स्रोतांकडे लक्ष न देता गार्डनमध्ये जाहिरातींचा गोंगाट करून पैसे जमा करण्याचा उपद्व्याप सुरू केला जाणार आहे. ‘दात कोरून पोट भरण्याचा’ हा प्रकार म्हणावा लागेल. नागपूर शहरात महापालिकेच्या मालकीचे १०० व नासुप्रचे ६० असे १६० गार्डन आहेत. जाहिरातीच्या गोंगाटचा प्रायोगिक प्रयोग गांधीसागर तलावातील भाऊजी पागे व अयोध्यानगर गार्डनमध्ये सुरू आहे. नागरिकांच्या आक्षेपांना न जुमानता पहिल्या टप्प्यात लवकरच भाऊजी पागे गार्डनसह तुळशीबाग गार्डन, लकडगंज गार्डन, सुभाष रोडवरील बापकर गार्डन व मानेवाडा रोडवरील बालाजीनगर गार्डनमध्ये हा गोंगाट सुरू केला जाणार आहे. त्यानंतर शहरातील सर्वच गार्डनमध्ये जाहिरातबाजीचा गोंगाट सुरू करण्याचा महापालिकेने घाट घातला आहे. फिरायला येणारे नागरिक इअरफोन लावून संगीत ऐकतात. म्हणून आम्ही संगीतासोबतच जाहिरातींचा आनंद देणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. यामुळे गोंगाट होणार असला तरी गार्डनमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी ही गूड न्यूज असल्याचा जावईशोध महापालिकेच्या जाहिरात विभागाने लावला आहे. सकाळ संध्याकळ ६ ते ८.३० या प्रत्येकी अडीच तासांच्या कालावधीत गाणी व कंपन्यांच्या जाहिराती नागरिकांच्या कानावर पडतील. या निर्णयाचे समर्थन करताना आम्ही नागरिकांच्या आवडीची गाणी लावणार असल्याचा अफलातून दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
गार्डनमध्ये जाहिरात करण्याची संधी मिळणार असल्याने ‘सुपर अ‍ॅडव्हर्टायझ्ािंग’ या खासगी कंपनीने यासाठी तत्परतेने पुढाकार घेतला आहे. नागरिकांच्या तक्रारी नको म्हणून वेगवेगळी आकर्षक गाणी व संगीत ऐकविले जात आहे.
जाहिरातीचे कंत्राट मिळताच खासगी कंपनीतर्फे सर्व गार्डनमध्ये दररोज नवनवीन गाण्यांचा धांगडधिंगा सुरू केला जाणार आहे. यासाठी कंपनीतर्फे उद्यानांमध्ये तशी ध्वनियंत्रणाची व्यवस्था करण्यात येत आहे. सोबतच महापालिका व शासकीय जाहिराती केल्या जाणार आहे’. स्वच्छता योजना, ओला व सुका कचरा, कर योजना, डेंग्यू अभियान यासह विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यात अपयशी ठरलेली महापालिका आता गार्डनमध्ये गोंगाट घालून योजनांची माहिती देणार आहे.
घरातील ताणतणाव थोड्या वेळासाठी काही होईना दूर व्हावा आणि सिमेंटच्या जंगलात गार्डनच्या रुपाने मिळणारी निसर्गाची ताजी हवा घेण्यासाठी गार्डनकडे लोकांची पावले वळतात. सकाळ, संध्याकाळी उद्यानात मिळणारा हा विरंगुळा अबालवृद्धांना दिवसभराचा ताण, कलकल, गोंगाट व धावपळीतून शांततेचा दिलासा देणाराच ठरतो. मात्र पैसा कमाविण्याच्या हव्यासापोटी महापालिकेने तयार केलेला नवीन प्रस्ताव या शांततेचा भंग करण्यासाठी कारणीभूत ठरणारा आहे. यात शहारातील सार्वजनिक गार्डनमध्ये स्पीकर लावून जाहिराती करण्याचा व त्यातून रेव्हेन्यू मिळविण्याचा हेतू आहे. अशा प्रस्तावाची माहिती होताच नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटणार नाही तर नवलचं. एकीकडे गार्डनची स्थिती वाईट आहे. ती सुधारण्याऐवजी गार्डनमधून मिळणारी शांतता व समाधान नष्ट करण्याचा ध्यास मनपाने घेतला आहे. घरापासून पाण्यापर्यंत सर्वावर महापालिका कर वसूल करते, पण हा प्रकार म्हणजे श्वासातून घेणाऱ्या शुद्ध आॅक्सिजनवर टॅक्स लावण्यासारखा आहे, अशा भावना नागरिकांकडून व्यक्त झाल्या.

ध्वनिप्रदूषणाचे समर्थन कसे?
विकसित शहराच्या व्याख्येत गार्डन हा महत्त्वाचा एक भाग. पर्यावरणाच्या दृष्टीने आणि परिसरातील वातावरण प्रदूषणमुक्त राहण्यासाठी उद्यानाची गरज शहराला भासत आहे. सौंदर्यीकरणाच्या दृष्टीनेही गाडनचे महत्त्व आहे. महानगरात बाहेरगावहून येणाऱ्या लोकांना थांबण्यासाठी, नागरिकांचा ताणतणाव घालविण्यासाठी गार्डन अतिशय महत्त्वाचे झाले आहे. विकासाच्या नावावर शहरातील पर्यावरणावर आघात होत आहे. काही क्षण निसर्गाच्या सानिध्यात घालवणे, हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्त्वाचे झाले आहे. आधीच शहरात असलेल्या मोकळ्या मैदानावर अतिक्रमणाचा विळखा आहे. त्यातच गार्डनमध्ये जाहिरातींचा गोंगाट होणार असेल तर नागरिकांची फिरायला जायचे कुठे असा प्रश्न आहे. ध्वनिप्रदूषण होऊ नही याचे समर्थन कशासाठी असा प्रश्न आहे.

प्रेमी युगुलांना प्रोत्साहन मिळणार
महापालिका व नासुप्रच्या गार्डनमध्ये प्रेमीयुगुलांचा वावर वाढला आहे. त्यांच्या आपत्तीजनक व्यवहारामुळे ज्येष्ठ नागरिक व कुटुंबासह येणाऱ्याची कुचंबणा होते. बहुसंख्य गार्डनमध्ये सुविधा नाही. सुरक्षा गार्ड नसल्याने महिलांना असुरक्षित वाटते. पार्किंग व अन्य सुविधांचा अभाव आहे. याकडे महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी लक्ष न देता जाहिरातबाजीचा गोंगाट सुरू करण्याचा घाट घातला आहे. यावर शहरातील नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Why the noise of advertising in public parks? Nagpur Municipal Corporation started its headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.