पीएफवरील व्याज कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 10:03 AM2018-07-03T10:03:20+5:302018-07-03T10:06:05+5:30

केंद्राने २०१७-१८ या वर्षापासून पीएफचे व्याजदर ८.५५ टक्के करण्याचा निर्णय घेतला असला तरी, भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या (ईपीएफओ) कोट्यवधी सदस्यांना नव्या दराने पैसा मिळण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून वाट पाहावी लागत आहे.

When will you get interest on PF? | पीएफवरील व्याज कधी मिळणार?

पीएफवरील व्याज कधी मिळणार?

Next
ठळक मुद्देसर्व्हर अपडेशन प्रक्रिया कासवगतीने कोट्यवधी पीएफधारकांचा प्रश्न

फहीम खान।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्राने २०१७-१८ या वर्षापासून पीएफचे व्याजदर ८.५५ टक्के करण्याचा निर्णय घेतला असला तरी, भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या (ईपीएफओ) कोट्यवधी सदस्यांना नव्या दराने पैसा मिळण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून वाट पाहावी लागत आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षीचे अध्यादेश जारी करून एक महिना लोटल्यानंतरही लोकांच्या पासबुकवर नव्या व्याजदरानुसार रक्कम जमा झाली नाही.
याबाबत ईपीएफओच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी हात वर केले आहे. खाते अपडेट करण्याची प्रक्रिया केंद्रीय आॅफिसच्या माध्यमातून होत असल्याने याबाबत काही सांगण्यास असमर्थ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. केंद्रीय सर्व्हरमुळेच ही समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत अतिरिक्त केंद्रीय पीएफ आयुक्तांच्या दिल्लीस्थित कार्यालयात संपर्क साधला असता, हे प्रकरण नॅशनल डाटा सेंटरच्या अंतर्गत असल्याने त्या विभागातूनच माहिती घेतली जाऊ शकते, असे सांगण्यात आले. मात्र येथे चुकीच्या क्रमांकामुळे संपर्क होऊ शकला नाही.

पेन्शनधारकांना नाहक त्रास
यावर्षी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पीएफ कार्यालयाद्वारे जुन्याच व्याजदरानुसार पेमेंट दिले जात आहे. अधिकाऱ्यांनी नवीन व्याजदराने वेतन करण्यास असमर्थता दर्शविली आहे. पेन्शनधारकांना अधिक पैसा दिल्यास तो परत मिळविणे शक्य होणार नाही, असे वाटत असल्याने जुन्या व्याजदरानेच वेतन केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत ईपीएफओच्या अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर कोणतेही समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. दुसरीकडे याबाबत विचारपूस करण्यासाठी सदस्यांना कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. मात्र या समस्येबाबत अधिकारीच संभ्रमात असल्याने त्यांच्याकडून उत्तर देण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय सर्व्हरच्या संथगतीमुळे तीन महिने लोटूनही पीएफच्या व्याजाचा पैसा आणि ईटीएफ युनिट्स लोकांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. सरकारकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले जात असून, पीएफच्या प्रक्रियेसाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान वापरल्याचे बोलले जात आहे. मात्र याच तंत्रज्ञानाच्या संथगतीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

अपडेशनच पूर्ण नाही
लोकमतने याबाबत पीएफ कार्यालयात माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पीएफ खात्यांच्या अपडेशनची प्रक्रियाच पूर्ण झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. साधारणपणे पीएफ व्याजदराची राशी ३१ मार्चपर्यंत जमा होते. मात्र प्रक्रियाच अपूर्ण असल्याने पासबुकमध्ये पीएफचा पैसा दोन महिने लोटूनही जमा झालेला नाही.

ईटीएफ युनिट्स जमा होणार
सेंट्रल बोर्ड आॅफ ट्रस्टीज (सीबीटी) च्या बैठकीत ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड) चे युनिट्स ईपीएफओ सदस्यांच्या खात्यावर दर्शविण्यास मंजुरी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पासबूक अपडेट झाल्यानंतर ईटीएफ युनिट्स आणि पीएफ राशी नगदी स्वरुपात दर्शविली जाईल. पीएफ खात्यावर सदस्यांची ८५ टक्के राशी दिसेल व ईटीएफमध्ये १५ टक्के जमाराशीचे मूल्य ईटीएफ युनिट्सच्या स्वरुपात दिसतील. विशेष म्हणजे ईपीएफओद्वारे १ एप्रिलपर्यंत ईटीएफ युनिट्स जमा होतील असे सांगण्यात आले होते. मात्र तीन महिने लोटूनही ईटीएफ युनिटही जमा झाले नाही आणि पीएफचे व्याजही जमा होऊ शकले नाही.

तेव्हा कसा वाढतो वेग
सेन्ट्रल सर्व्हरच्या संथगतीमुळे पीएफ खाती अपडेट होण्यास विलंब होत असल्याचे ईपीएफओ अधिकाऱ्यांचे म्हणणे पीएफधारकांना न समजण्यासारखे आहे. जेव्हा सरकारी कार्यालयांना लोकांकडून पैसा घ्यायचा असतो तेव्हा या कार्यालयांचे सर्व्हर आणि तंत्रज्ञान वेगाने काम करते. परंतु जेव्हा पैसा देण्याची वेळ येते तेव्हा तंत्रज्ञानाची गती कशी मंदावते, असा प्रश्न सदस्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Web Title: When will you get interest on PF?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.