विजय मोहोड हत्याकांड : धावत्या कारमध्येच केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:41 PM2019-06-18T23:41:42+5:302019-06-18T23:42:26+5:30

बिट गँगचे खतरनाक गुंड अभय राऊत आणि निखिल तिडके या दोघांनी धावत्या कारमध्ये गँगस्टर विजय मोहोडवर घातक शस्त्राचे ३५ ते ४० घाव घालून त्याच्या शरीराची चाळणी केली. यावेळी त्यांचा तिसरा साथीदार सूरज कार्लेवार कार चालवीत होता. हत्येनंतर आरोपींनी वेळा हरी गावाजवळच्या शेतात विजयचा मृतदेह फेकून दिला आणि आपल्या एका साथीदाराला विजयचा गेम केल्याची माहितीही फोन करून दिली.

Vijay Mohad murder case: In the running car murdered | विजय मोहोड हत्याकांड : धावत्या कारमध्येच केली हत्या

विजय मोहोड हत्याकांड : धावत्या कारमध्येच केली हत्या

Next
ठळक मुद्देकट करूनच पोहचले होते आरोपी : आरोपींचा पीसीआर, तपास गुन्हे शाखेकडे सोपविला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिट गँगचे खतरनाक गुंड अभय राऊत आणि निखिल तिडके या दोघांनी धावत्या कारमध्ये गँगस्टर विजय मोहोडवर घातक शस्त्राचे ३५ ते ४० घाव घालून त्याच्या शरीराची चाळणी केली. यावेळी त्यांचा तिसरा साथीदार सूरज कार्लेवार कार चालवीत होता. हत्येनंतर आरोपींनी वेळा हरी गावाजवळच्या शेतात विजयचा मृतदेह फेकून दिला आणि आपल्या एका साथीदाराला विजयचा गेम केल्याची माहितीही फोन करून दिली.
हुडकेश्वर पोलिसांनी सोमवारी अटक केल्यानंतर आरोपी अभय आणि सूरजने प्राथमिक तपासात पोलिसांना उपरोक्त माहिती दिली आहे. हत्याकांडात तिघांचाच (अभय, निखिल आणि सूरज) सहभाग असल्याचेही ते सांगत आहेत. मात्र, हे तिघेही खतरनाक गुंड असून, पोलिसांच्या चौकशीचा सामना कसा करायचा, याचा त्यांना सराव असल्याने ते हत्याकांडातील अन्य आरोपींना वाचविण्याचे प्रयत्न करीत असल्याचा अंदाज पोलिसांसोबत गुन्हेगारी वर्तुळातूनही काढण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, या थरारक हत्याकांडाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, अटकेतील आरोपी अभय आणि सूरजला न्यायालयात हजर करून, पोलिसांनी त्यांचा २३ जूनपर्यंत पीसीआर मिळवला आहे.
उपराजधानीतील गुन्हेगारी जगतात खळबळ निर्माण करणाऱ्या गँगस्टर विजय मोहोडचे वर्चस्व सर्वाधिक बिट गँगच्या गुंडांना खटकत होते. कोट्यवधींच्या जमिनीचा सौदा, क्रिकेट सट्ट्यातील लाखोंची थकीत वसुली आणि जुगार अड्ड्यांवरील रोजच्या कमाईतही विजय मोहोड हस्तक्षेप करू लागल्याने, बिट गँगच्या गुंडांमध्ये विजय मोहोडचीच चर्चा चालायची. बिट गँगच्या अवैध धंद्यात तसेच प्रत्येक कमाईच्या ठिकाणी विजय आडवा येत होता. तो चारचौघांत पाहून घेण्याची धमकी देत होता. त्याचा लवकर बंदोबस्त केला नाही तर तोच आपल्या टोळीतील कुणाचा गेम करेल, अशी बिट गँगचा म्होरक्या स्वप्निल, अभय, निखिल, दिलीप, सूरजसह अनेकांना भीती वाटत होती. बुटीबोरीच्या डान्स बारमध्ये विजय अंगावर धावून आल्याने बिट गँगने त्याचा गेम करण्याची तयारी सुरू केली. एका गुन्हेगाराच्या घरी झालेल्या कार्यक्रमात बिट गँगच्या गुंडांनी विजय मोहोडसोबत मांडवली केली.
खरसोलीचा जुगार अड्डा अन् असेच काही अवैध धंदे तू चालव आम्ही तिकडे येणार नाही, काही ठिकाणी तू आडवे यायचे नाही, असे या मांडवलीत ठरले.
ही मांडवली विजयचा गेम करण्यासाठी थंड डोक्याने रचलेल्या कटाचाच एक भाग होता. विजयला मात्र त्याची कल्पना आली नाही. तो गाफील झाला. ठरल्याप्रमाणे रविवारी विजय त्याच्या साथीदारासह जेवणासाठी अमित भोजनालयात गेला. तेथे आरोपी अभय, निखिल आणि सूरज वेगवेगळ्या कारने पोहचले. विजयला धोका कळू नये म्हणून अभयचे काही साथीदार भोजनालयातच विजयच्या साथीदारासोबत दारू पीत बसले. तर, जुगार अड्ड्याची जागा पाहून लवकर परत येऊ, असा बहाणा करून अभय, निखिल आणि सूरजने विजयला वारना कारमध्ये बसविले. सूरज कार चालवीत होता. निखिल त्याच्या बाजूला बसला तर अभय मागच्या सीटवर विजयच्या बाजूला बसला. या कारच्या मागे बिट गँगच्या गुंडांनी भरलेल्या आणखी काही कार धावत होत्या. त्याची विजयला कल्पना नसावी. वारना कार शहराबाहेर पडताच अचानक अभय आणि निखिल धावत्या कारमध्येच विजयवर तुटून पडले. त्यांनी विजयला बचावाची कोणतीही संधी न देता घातक शस्त्राचे त्याच्यावर ३५ ते ४० घाव घातले. कारमध्ये रक्ताचा सडा पडल्यानंतर आरोपी त्याचा मृतदेह फेकून देण्यासाठी निघाले.
आधीच ठरवून ठेवले सर्व
एकाने विजयच्या साथीदारासोबत दारू पीत बसलेल्या आपल्या साथीदारांना विजयचा गेम केल्याची माहिती देऊन तेथून उठून जायला सांगितले. त्यानंतर अभय, सूरज आणि निखिलने आपापले मोबाईल बंद करून टाकले. मुख्य मार्गाने गेल्यास सीसीटीव्हीत आपण आणि कार येईल, पोलिसांच्या तपासात तो पुरावा ठरेल, याची कल्पना असल्याने आरोपींनी अंधाऱ्या भागात वेळा हरी गावाजवळच्या शेतात विजयचा मृतदेह फेकून दिला. त्याच रात्री कार धुवून काढली अन् पार्टी केली. दरम्यान, कुख्यात विजय मोहोडचा बिट गँगने गेम केल्याची माहिती रविवारी रात्रीच गुन्हेगारी वर्तुळात चर्चेला आली होती. पोलिसांना मात्र मृतदेह मिळाला नव्हता. सोमवारी सकाळी विजयचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांची धावपळ तीव्र झाली.
विजयच्या हत्याकांडात १५ ते २० जणांचा समावेश असला तरी ठरल्याप्रमाणे अटक करवून घेणारे आरोपी अभय आणि सूरज तिघांनीच विजयचा गेम वाजविल्याचे सांगत आहेत.
अभय राऊतने केलेला हत्येचा हा तिसरा गुन्हा आहे. तो अत्यंत क्रूर आहे. त्याने यापूर्वी क्षुल्लक कारणावरून पलाश दिवटेची हत्या केली होती. तत्पूर्वी स्वप्निल साळुंके आणि अभयने संग्राम बारमध्ये सुमित तिवारीची हत्या केली होती. या हत्याकांडानंतर बिट गँग पोलिसांच्या रेकॉर्डवर आणि गुन्हेगारी वर्तुळात ठळकपणे चर्चेला आली होती. अभयविरुद्ध यापूर्वीही मोक्कानुसार कारवाई झाली आहे.
विजयचे सोनेही हडपले ?
विजयला मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने घालण्याचा शौक होता. त्याची हत्या केल्यानंतर आरोपींनी त्याचे १५ ते २० लाखांचे सोनेही काढून घेतले असावे, असा संशय आहे. या प्रकरणात १५ ते २० गुंडांचा सहभाग असल्याने आणि सर्वच्या सर्व गुन्हेगार सराईत असल्याने हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. आरोपींचा पाच दिवसाचा पीसीआर मिळाला असून, पोलिसांनी कार, कपडे तसेच शस्त्र जप्त केले आहे.

Web Title: Vijay Mohad murder case: In the running car murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.