नागपुरात  विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीने तापवले वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:12 PM2018-02-24T23:12:03+5:302018-02-24T23:12:23+5:30

निवडणुकीत विजयाचा जल्लोष साजरा करणाऱ्या  अभाविपच्या कार्यकर्त्यांनी एनएसयुआयच्या विरोधात घोषणाबाजी केली. दोन्ही संघटना समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली.

Vidyarthi Parishad Elections become hot In the Nagpur | नागपुरात  विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीने तापवले वातावरण

नागपुरात  विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीने तापवले वातावरण

Next
ठळक मुद्देएनएसयुआय व राष्ट्रवादी विद्यार्थी परिषदेने टाकला बहिष्कार : पोलिसांकडून कार्यकर्त्यांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत विद्यार्थी संघटनांचा चांगलाच कलगीतुरा बघायला मिळाला. एनएसयुआय आणि राष्ट्रवादी विद्यार्थी परिषदेने बहिष्कार टाकत निवडणुकीच्या वेळी विद्यापीठाच्या बाहेर शिक्षण मंत्री व कुलगुरुंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निवडणुकीत विजयाचा जल्लोष साजरा करणाऱ्या  अभाविपच्या कार्यकर्त्यांनी एनएसयुआयच्या विरोधात घोषणाबाजी केली. दोन्ही संघटना समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली.
काही दिवसांपूर्वी महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी प्रतिनिधीच्या निवडणुका पार पडल्या. याच प्रतिनिधींमधून आठ जणांची निवड त्यांच्या महाविद्यालयांच्या स्थापनेच्या कालावधीनुसार, तर सात प्रतिनिधींची निवड कुलगुरुंनी केली. यामध्ये तीन प्रतिनिधी नागपूर शहर, दोन नागपूर ग्रामीण, दोन वर्धा, भंडारा आणि एका प्रतिनिधीची गोंदिया जिल्ह्यातून निवड करण्यात आली. शैक्षणिक सत्र समाप्तीकडे असताना निवडून येणाऱ्या  अध्यक्ष आणि सचिवाकडे केवळ एक महिन्याचाच कार्यकाळ असेल. मात्र, त्यांना व्यवस्थापन परिषदेमध्ये मताधिकार असल्याने त्यांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे सर्वच संघटना विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी प्रयत्नरत होत्या. परंतु, विद्यापीठाने प्रतिनिधींची निवड करताना नियमांना डावलून अभाविपला झुकते माप दिल्याचा आरोप एनएसयुआय आणि राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात आला. त्यामुळे संघटनांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. यासंदर्भात संघटनांनी कुलगुरुंची भेट घेत निवडणुका नियम डावलून होत असल्याचा आरोपही केला होता. शनिवारी झालेल्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटले. ऐन निवडणुकांच्या वेळी एनएसयुआयने जोरदार घोषणाबाजी करीत शिक्षण मंत्री विनोद तावडे व कुलगुरू यांचा निषेध नोंदविला. तसेच अभाविपला झुकते माप देण्यासाठी कुलगुरूंनी रचलेले हे षड्यंत्र असल्याचा आरोपही केला. यामुळे विद्यापीठासमोर अनेक वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी परिस्थिती आटोक्यात येत नसल्यामुळे पोलिसांनी एनएसयुआय व राष्ट्रवादी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना अटक केली. यामध्ये अजित सिंह, अमिन नुरी, शैलेंद्र तिवारी यांचा समावेश होता.
 विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत अभाविपची बाजी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पार पडलेल्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीमध्ये अभाविपने विजय मिळविला. विद्यार्थी परिषदेच्या १५ ही प्रतिनिधींनी अभाविपला समर्थन देत अध्यक्षपदी विद्यापीठ विधी महाविद्यालयाचा आशिष मोहिते व सचिवपदी भंडारा येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयाचा आकाश थानथराटे यांना बिनविरोध निवडून दिले. अभाविपचा दणदणीत विजय झाल्याने व्यवस्थापन परिषदेचा मार्ग सुकर झाला आहे.

Web Title: Vidyarthi Parishad Elections become hot In the Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.