Vidarbha responds strongly to Maharashtra Band; Police alert | महाराष्ट्र बंदला विदर्भात जोरदार प्रतिसाद; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

ठळक मुद्देअनेक बसस्थानकांवर प्रवासी अडकलेपेट्रोलपंप बंदचा नागरिकांना फटकाखासगी बसेसही बंदवैद्यकीय सेवा व औषध दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद

आॅनलाईन लोकमत
नागपूर: भीमा कोरेगाव प्रकरणी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त आहे. वैद्यकीय सेवा व औषध दुकाने वगळता बाजारपेठा, सरकारी व खाजगी वाहतूक सेवा, शैक्षणिक संस्था व अन्य प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. आंबेडकरी अनुयायांनी सकाळीच मोर्चे काढून सुरू असलेली काही दुकाने बंद करण्याचे आवाहन केले तर काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली होती. काही ठिकाणी तणावाचेही वातावरण निर्माण करणाऱ्या किरकोळ घटना घडल्याचे वृत्त आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. मूलच्या बसस्थानकावर अनेक प्रवासी सकाळच्या वेळेस अडकून पडले होते. सिंदेवाही व नागभीड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
नागपूर येथे तुकडोजी चौकात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहराच्या संवेदनशील भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गोंदिया जिल्ह्यात नवेगाव बांध येथे भीमसैनिकांनी शांतता रॅली काढली होती.
गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज व कुरखेडा येथे संपूर्ण बंद पाळण्यात आला. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर व तिवसा हे पूर्णपणे बंद होते. तिवसा येथे पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले होते. यवतमाळात दुपारी २ वाजेपर्यंत बंदचे आवाहन करण्यात आले. ठिकठिकाणी भीमसैनिक रॅली काढून बंदचे आवाहन करीत फिरत होते.