राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गुणवाढ घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:57 AM2018-06-30T10:57:46+5:302018-06-30T11:05:20+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गुणवाढ घोटाळा उघडकीस आला आहे.

Tukadoji Maharaj Nagpur University marks scandal | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गुणवाढ घोटाळा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गुणवाढ घोटाळा

Next
ठळक मुद्देएमए इंग्रजी तृतीय सेमिस्टरच्या विद्यार्थिनीचे वाढविले गुण उघडकीस आल्यानंतरही चौकशी नाही

आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गुणवाढ घोटाळा उघडकीस आला आहे. एमए इंग्रजीच्या तृतीय सेमिस्टरच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थिनीला उत्तीर्ण करण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने या प्रकरणाची चौकशी केलेली नाही. या प्रकरणी दोषी आढळलेल्या चार कर्मचाऱ्यांवर कारवार्ई न करता त्यांची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली. या प्रकरणात जर चौकशी झाली असती तर अनेक खुलासे पुढे आले असते. परंतु असे करण्यात आले नाही. या गंभीर प्रकरणात विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार ही विद्यार्थिनी एमए इंग्रजी विषयाच्या तृतीय सेमिस्टरच्या परीक्षेत एका विषयात अनुत्तीर्ण झाली होती. तिला केवळ १२ गुण मिळाले होते.
सूत्रांनुसार उत्तरपत्रिका मूल्यांकनानंतर तीन कर्मचाऱ्यांनी त्या विद्यार्थिनीला मिळालेले १२ गुण वाढवून ४२ केले. कर्मचाऱ्यांनी हे काम अतिशय दक्षतेने केले. त्यामुळे गुणांची यादी बनविण्याच्या प्रक्रियेत देखील ही बाब लक्षात आली नाही. परीक्षा विभागातून फाईल गुणसूची बनविण्यासाठी पाठविण्यात आली. गुणसूची बनविताना गुणांमध्ये झालेली वाढ लक्षात आली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती परीक्षा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. प्रकरणाची तपासणी करण्यानंतर गुण वाढविण्यात आल्याचे सिद्ध झाले. सूत्रांच्या मते गुणवाढ सिद्ध झाल्यानंतर विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे निदेशक डॉ. नीरज खटी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना बोलाविले. सोबतच त्यांच्याकडून विचारणा केली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना माहिती दिली. तरीसुद्धा कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता, त्यांची गुपचूप बदली दुसऱ्या विभागात करण्यात आली.

प्रकरणाची चौकशी का नाही
प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची कुठलीच चौकशी केली नाही. छोट्याछोट्या विषयात चौकशी समिती गठित करणारे विद्यापीठ या प्रकरणात खुलासा झाल्यानंतरही चुप्पी साधून असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सूत्रांच्या मते याबाबत चौकशी झाली असता, अनेक प्रकरणे पुढे आली असती.

परीक्षा विभागाची सुरक्षा वाढविली
या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर परीक्षा विभागाची सुरक्षा वाढविली आहे. इमारतीत एकाच दरवाजातून प्रवेश देण्यात येत आहे. उर्वरित सर्व दरवाजांना कुलूप लावण्यात आले आहे. परीक्षा भवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची महाराष्ट्र सुरक्षा बलाकडून विचारपूस होत आहे. ओळखपत्र दाखविल्यानंतरही त्यांना आत जाऊ देण्यात येत नाही. कर्मचाऱ्यांना कुणासोबतही बोलण्याची परवानगी नाही.

एका दिवसात अनेक बदल्या
सूत्रांच्या मते हे प्रकरण समोर आल्यानंतर परीक्षा विभागात मोठा फेरबदल करण्यात आला. शुक्रवारी अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. अचानक आदेश मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. बऱ्याच वर्षानंतर परीक्षा विभागात बदल्या झाल्या आहेत.

जे लिहायचे आहे ते लिहा
यासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगितले. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. डॉ.येवले सुटीवर असल्याने त्यांच्याशी बोलणे झाले नाही. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे निदेशक डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती न देता, जे लिहायचे आहे ते लिहा, असे सांगून विषय टाळला.

Web Title: Tukadoji Maharaj Nagpur University marks scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.