उद्योगाला झुकते माप देण्याचा प्रयत्न : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 01:16 AM2018-07-12T01:16:22+5:302018-07-12T01:18:34+5:30

Trying to scale the industry: Subhash Desai | उद्योगाला झुकते माप देण्याचा प्रयत्न : सुभाष देसाई

उद्योगाला झुकते माप देण्याचा प्रयत्न : सुभाष देसाई

Next
ठळक मुद्देव्हीआयए, बीएमए, एमआयएतर्फे सत्कार

लोकमत  न्यूज नेटवर्क
नागपूर : एमआयडीसीमध्ये पारदर्शक पद्धतीने प्लॉटचे वाटप केले आहे. ८० टक्यांपेक्षा जास्त भूखंड विकले गेले आहेत. छोट्या बैठकांमधून उद्योगांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. उद्योगाला झुकते माप देऊन महाराष्ट्र उद्योगात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि खाण मंत्री सुभाष देसाई यांनी केले.
विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए), बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (बीएमए) आणि एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (एमआयए) हिंगणाच्या वतीने बुधवारी उद्योग भवनातील व्हीआयएच्या सभागृहात सुभाष देसाई यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. मंचावर एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, बीएमएचे अध्यक्ष नितीन लोणकर, एमआयएचे अध्यक्ष कॅ. सी.एम. रणधीर, व्हीआयएचे उपाध्यक्ष सुरेश राठी आणि सचिव डॉ. सुहास बुद्धे उपस्थित होते.
देसाई म्हणाले, हिंगणा येथे विस्तारासाठी ४६ भूखंड वितरित केले असून १२ गाळेधारकांना प्लॉट देण्यात येणार आहे. बुटीबोरीत ईएसआयसी रुग्णालयासाठी ५ एकर जागा दिली आहे. बैठकीनुसार यापुढे ग्रामपंचायतींनी वसूल केलेल्या कराचा ५० टक्के वाटा एमआयडीसीला मिळेल. यावर ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच अंमलबजावणी होईल. प्लास्टिक बंदीचा निर्णय अप्रिय आहे, पण पर्यावरण विभागाला तो सक्तीने घ्यावा लागला. संबंधित वस्तूंवरील बंदी चर्चेतून सुटू शकते. प्लास्टिकच्या बाटल्या तरंगताना दिसल्या तर त्यावरही बंदी येईल.
अमरावती येथील ५०० हेक्टरवरील टेक्सटाईल पार्क यशस्वी झाला आहे. आता या प्रकल्पात ११२४ हेक्टरपर्यंत वाढ केली आहे. काही बाबतीत महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे, पण झारखंडशी तुलना करू नका. शासनासोबत करार केलेल्या उद्योजकांना उद्योग सुरू करण्याचे बंधन नसल्याचे देसाई म्हणाले.
पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सेठी म्हणाले, राज्यात अनेक औद्योगिक क्षेत्रात सीईटीपी नाही. ज्या ठिकाणी आहे, तिथे अद्ययावत करण्यात येत आहे. एमआयडीसी वित्तीय पुरवठ्यासाठी तयार आहे. बोर्ड बैठकीत निर्णय घेऊ. असोसिएशननेही त्यात सहभाग नोंदवावा. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट व सिव्हरेज ट्रीटमेंट प्रकल्पावर एमआयडीसी काम करीत आहे. आॅप्टिकल फायबर टाकण्यात असोसिएशनचा सहभाग असावा.
संचालन सुहास बुद्धे यांनी केले. याप्रसंगी डिक्कीचे मध्य भारताचे अध्यक्ष निश्चय शेळके, बीएमएचे सचिव सीए मिलिंद कानडे, व्हीआयए महिला विंगच्या अध्यक्षा साची मलिक, व्हीआयएचे पदाधिकारी आणि विविध उद्योजक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Trying to scale the industry: Subhash Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.