सामूहिक वनहक्क संवर्धनासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 08:08 PM2019-02-20T20:08:28+5:302019-02-20T20:19:35+5:30

सामूहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापनासाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील चार स्वयंसेवी संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारांतर्गत ७५ गावांमध्ये सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन पद्धत राबविण्यात येणार आहे. या सामंजस्य करारासाठी ७५ ग्रामसभांसाठी १ कोटी ३३ लाख ४५ हजार ७९४ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संचालक नंदिनी आवडे यांनी दिली.

Triparty memorandum of understanding for conservation of Collective forest right | सामूहिक वनहक्क संवर्धनासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार

सामूहिक वनहक्क संवर्धनासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार

Next
ठळक मुद्देगडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील ७५ गावांचा समावेशसंवर्धन करणारा देशातील पहिला उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामूहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापनासाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील चार स्वयंसेवी संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारांतर्गत ७५ गावांमध्ये सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन पद्धत राबविण्यात येणार आहे. या सामंजस्य करारासाठी ७५ ग्रामसभांसाठी १ कोटी ३३ लाख ४५ हजार ७९४ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संचालक नंदिनी आवडे यांनी दिली.
गडचिरोली येथे सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन यासंदर्भात चार स्वयंसेवी संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संचालक नंदिनी आवडे, सहसंचालक दिवाकर केतकर, कौशल्य विकास संचालक किसन धुर्वे, वनहक्क साधन व्यक्ती संकेत जोशी, संदीप चव्हाण, वनहक्क कायदा व प्रकल्पाच्या जिल्हा व्यवस्थापक सोनम येरमे उपस्थित होते.
यावेळी ग्रामसभेच्यावतीने प्राधिकृत केलेले प्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्थेच्यावतीने प्राधिकृत केलेले प्रतिनिधी आणि आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने त्रिपक्षीय सामंजस्य करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली.
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ आणि नियम २००८ तसेच सुधारित नियम २०१२ च्या अंमलबजावणीअंतर्गत वैयक्तिक व सामूहिक वनहक्क किंवा दोहोंचे धारणाधिकार मिळण्याचे अधिकार प्राप्त झाले आहे. सामूहिक वनसंपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामसभेचे बळकटीकरण आवश्यक आहे. वनांवर उपजीविका साधन उपलब्ध करून देणे तसेच वनांचे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन, संरक्षण, पुनर्निर्माण करण्याकरिता संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम केंद्रीय जनजाती कार्य मंत्रालय हा पथदर्शी प्रकल्प राबवीत आहे.
स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी गडचिरोली तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ७५ ग्रामसभांसाठी १ कोटी ३३ लाख ४५ हजार ७९४ रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये गडचिरोली येथील ‘वृक्षमित्र’ स्वयंसेवी संस्थेला ३९ गावांसाठी ६९ लाख ३४ हजार ८५१ रुपये तर कुरखेडा येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेला ९ गावांसाठी १६ लाख २ हजार २१६ रुपये तसेच एरंडी येथील ‘सृष्टी’ संस्थेला २४ गावांसाठी ४२ लाख ६९ हजार ५७३ रुपये प्रकल्प निधीला मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर येथील विरुर तालूका राजुरा येथील ‘पर्यावरण मित्र’ या स्वयंसेवी संस्थेला ३ गावांसाठी ५ लाख ३९ हजार १५४ रुपयांचा प्रकल्प निधी मान्य करण्यात आला आहे, अशी माहिती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संचालक नंदिनी आवडे यांनी दिली.
गडचिरोली येथील ‘वृक्षमित्र’ या स्वयंसेवी संस्थेचे मोहन हिराबाई हिरालाल, एरंडी येथील ‘सृष्टी’ संस्थेच्यावतीने केशव गुरुनुले, कुरखेडा येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने डॉ. गोगुलवार तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर, तालुका राजुरा येथील पर्यावरण मित्र या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने विजय देठे प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत.
अमरावती जिल्ह्यातून अचलपूर येथील ‘खोज’ या स्वयंसेवी संस्थेला तसेच यवतमाळ येथील ‘ग्रामीण समस्यामुक्ती ट्रस्ट’ आणि पांढरकवडा तालुका, केळापूर येथील ‘नवी उमेद’ या स्वयंसेवी संस्थांसोबत सामूहिक वनहक्क संवर्धन त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.

 

 

Web Title: Triparty memorandum of understanding for conservation of Collective forest right

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.