मान्यवरांचे मत : ‘ग्रामगीतेची शब्दश्रीमंती’ महाग्रंथाचे प्रकाशन
नागपूर : ग्रामगीतेत वापरलेली भाषा म्हणजे वक्ता आणि श्रोता यातील संवाद असून ग्रामगीतेतील शब्द प्रवास व्यक्तीपासून विश्वापर्यंत नेणारा आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.
विदर्भ गौरव प्रतिष्ठान, तारा प्रकाशन साकोली, मराठी बोली साहित्य संघ नागपूरतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेच्या षष्ठ्यब्दपूर्तीनिमित्त भाषाशास्त्राचे अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर लिखित ग्रामगीतेची शब्दश्रीमंती या महाग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन शंकरनगरातील धनवटे सभागृहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे सचिव डॉ. गिरीश गांधी होते. ग्रंथावर भाष्य करण्यासाठी डॉ. रत्नाकर भेलकर, डॉ. चंदू पाखरे उपस्थित होते. व्यासपीठावर कोमल ठाकरे, डॉ. राजन जयस्वाल उपस्थित होते. ग्रंथावर भाष्य करताना डॉ. रत्नाकर भेलकर म्हणाले, बोरकर यांचा ग्रंथ भाषाशास्त्राशी निगडित ग्रंथ आहे. व्याकरणाची दिशा अनुसरून या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली असून ग्रामगीतेचा शब्दकोश या ग्रंथाचे मूळ आहे. ग्रामगीतेच्या भाषेत प्रवाहीपणा आहे.
यातील शब्द चौकस रीतीने वापरण्यात आलेले असून ग्रामगीतेतील शब्दशक्तीला वैश्विक भान आहे. डॉ. चंदू पाखरे म्हणाले, मोठमोठ्या व्यक्तींनी ग्रामगीतेला प्रस्तावना लिहिली यावरून ग्रामगीतेची महती लक्षात येते. गाव सुखी व्हावे हे तुकडोजी महाराजांचे ‘टार्गेट’ होते. शेतकऱ्यांचा आसूड आणि ग्रामगीता घरी असल्यास एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. आजपर्यंत शब्दकोश या शब्दाला समानार्थी शब्द नव्हता.
तो समानार्थी शब्द या ग्रंथाच्या रूपाने मिळाला आहे. संचालन विजया मारोतकर यांनी केले. आभार डॉ. राजन जयस्वाल यांनी मानले. (प्रतिनिधी)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.