Transformers will start only if all the farmers pay the money; Chandrasekhar Bawankulay | सर्व शेतकऱ्यांनी पैसे भरले तरच सुरू होणार ट्रान्सफॉर्मर; चंद्र्रशेखर बावनकुळे

ठळक मुद्देविरोधी पक्षाचा सभात्याग

आॅनलाईन लोकमत
नागपूर : प्रत्येक ट्रान्सफॉर्मरवरून जेवढे कनेक्शन असतील त्याचे तीन वर्षासाठी तीन हजार रुपये भरल्याशिवाय ट्रान्सफॉर्मर सुरू होणार नाही, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात जाहीर केले. यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आपली नाराजी व्यक्त करीत सभात्याग केला.
सदस्य डी.एस. अहिरे यांनी धुळे जिल्ह्यातील कापडणे उपकेंद्राअंतर्गत असलेले रोहित्र बंद करण्याच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, घरगुती ग्राहकांनी विजेचे बिल महिनोंमहिने थकीत केल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तीन-तीन वर्षे नोटीस देऊनदेखील वीज बिले भरली जात नाहीत. शेतकरी बांधवांच्या वीज बिलाची दुरुस्ती करण्यात येत आहे. यासाठी फिडरनिहाय कॅम्प लावण्यात येतील. दुष्काळ काळातील वीज बिलातदेखील दुरुस्ती केली जाईल. प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपल्या वीज बिलाची दुरुस्ती करून समायोजन करून घ्यावे.
दरम्यान ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख, अजित पवार, राजेश टोपे आदींनी सांगितले की, एखाद दुसऱ्याने वीज बिल भरले नाही म्हणून संपूण फिडरच बंद केले जात असल्याने जे नियमित बिल भरतात त्यांचेही वीज कनेक्शन कापले जाते. तेव्हा त्यांना दंड का? ज्यांनी वीज भरली नसेल केवळ त्यांचेच कनेक्शन कापण्यात यावे, सरसकट फिडर बंद का केला जातो? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर शेतकऱ्यांची वीजबिले दुरुस्त करण्यासाठी फिडरनिहाय कॅम्प लावण्यात येतील. विना नोटीस वीज कनेक्शन खंडित करणार नाही. परंतु ट्रान्सफॉर्मर सुरू करण्यासाठी गेल्या तीन वर्षासाठीचे तीन हजार रुपये शेतकरी बांधवांनी अदा करावेत. ट्रान्सफॉर्मरवरून संपूर्ण कनेक्शन असणाऱ्यांना तीन हजार रुपये भरावेच लागतील, असे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत सभात्याग केला.