तोडसाम यांच्या पत्नींमधील वाद हायकोर्टात; एफआयआरला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 12:59 AM2019-03-27T00:59:37+5:302019-03-27T00:59:48+5:30

आर्णी (यवतमाळ) येथील भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमधील वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे.

Todesam's wife argues in High Court; Challenge FIR | तोडसाम यांच्या पत्नींमधील वाद हायकोर्टात; एफआयआरला आव्हान

तोडसाम यांच्या पत्नींमधील वाद हायकोर्टात; एफआयआरला आव्हान

नागपूर : आर्णी (यवतमाळ) येथील भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमधील वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे. तोडसाम यांची द्वितीय पत्नी प्रिया यांनी स्वत:विरुद्धचा एफआयआर रद्द करण्यासाठी व अन्य विविध मागण्यांसह रिट याचिका दाखल केली आहे.
तोडसाम यांची प्रथम पत्नी अर्चना यांनी १६ मार्च रोजी नोंदवलेल्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी प्रिया यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९, २९४, ५०६ व अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम ३(२) अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. त्यावर प्रिया यांचा आक्षेप आहे. अर्चना व प्रिया यांच्यातील भांडणाचा व्हिडीओ यूट्यूब व फेसबुकवर अपलोड करण्यात आला आहे. तो बदनामीकारक व्हिडीओ दोन्ही संकेतस्थळांवरून काढण्यात यावा. तसेच, स्थानिक पोलीस भेदभावपूर्ण कारवाई करीत असल्यामुळे या प्रकरणाचा सीबीआय किंवा सीआयडी यांच्यामार्फत तपास करावा, असे प्रिया यांचे म्हणणे आहे.
ही घटना १२ मार्च २०१९ रोजी घडली. त्याच दिवशी प्रिया यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली तर, अर्चना यांनी १६ मार्च रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी प्रिया यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. अर्चना यांच्या तक्रारीवरून मात्र एफआयआर नोंदविला. त्यावरून पोलीस विभागाचा पक्षपातीपणा सिद्ध होतो, असे याचिकेत नमूद केले आहे.

यूट्यूब, गुगल व फेसबुक यांना नोटीस
याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती झेड. ए. हक व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय, गृह विभागाचे सचिव, यवतमाळ पोलीस अधीक्षक, अर्चना तोडसाम, यूट्यूब, गुगल व फेसबुक यांना नोटीस बजावून याचिकेवर उत्तर सादर करण्यास सांगितले. तसेच, प्रिया विरुद्ध एफआयआर दाखल करण्यास मनाई केली.

Web Title: Todesam's wife argues in High Court; Challenge FIR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.