आजच्या संगीतात फारसे चांगले चालले नाही : उषा मंगेशकर यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:44 PM2019-03-14T23:44:14+5:302019-03-14T23:45:25+5:30

पूर्वीच्या काळी गीतकार खूप विचार करून गीतांची रचना करायचे. पुढे चित्रपटाच्या कोणत्या प्रसंगाला गीत योग्य बसेल इथपासून संगीत कोण देईल, कुणाकडून गाऊन घ्यायचे, यावर चर्चा केली जायची. त्यानंतर १५ दिवस ते महिनाभर त्यावर रिहर्सल व्हायची व नंतरच सुमधूर गीत निर्माण व्हायचे. आता मात्र तसे होताना दिसत नाही. ना शब्द चांगले, ना चाल आणि चित्रपटातील प्रसंगाचा अर्थबोधही त्यातून होत नाही. आजकाल चित्रपट संगीताबाबत फारसे चांगले चालले नाही, अशी खंत ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली.

Today's music does not work well: Usha Mangeshkar | आजच्या संगीतात फारसे चांगले चालले नाही : उषा मंगेशकर यांची खंत

आजच्या संगीतात फारसे चांगले चालले नाही : उषा मंगेशकर यांची खंत

googlenewsNext
ठळक मुद्देदीदीला भारतरत्न मिळणे सर्वोच्च क्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्वीच्या काळी गीतकार खूप विचार करून गीतांची रचना करायचे. पुढे चित्रपटाच्या कोणत्या प्रसंगाला गीत योग्य बसेल इथपासून संगीत कोण देईल, कुणाकडून गाऊन घ्यायचे, यावर चर्चा केली जायची. त्यानंतर १५ दिवस ते महिनाभर त्यावर रिहर्सल व्हायची व नंतरच सुमधूर गीत निर्माण व्हायचे. आता मात्र तसे होताना दिसत नाही. ना शब्द चांगले, ना चाल आणि चित्रपटातील प्रसंगाचा अर्थबोधही त्यातून होत नाही. आजकाल चित्रपट संगीताबाबत फारसे चांगले चालले नाही, अशी खंत ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली.
एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेल्या उषाताईंनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या ६-७ दशकापासून गाण गात असून यात अनेक अनुभव आले, अनेक लोक भेटले. त्यावेळी चांगले गाणारे होते तसे चांगले संगीत निर्माण करणारे संगीतकारही होते. आज मात्र गायक कोण व संगीतकार कोण, हेच लक्षात येत नाही, इतके गायक-संगीतकार दररोज या क्षेत्रात येत आहेत. मात्र त्यांचे अस्तित्व फार काळ टिकत नाही. आधी अनेक दिवसांच्या तयारीनंतर गाणे गायले जायचे आणि गायकांना ते पाठही व्हायचे. आज गाणच बसवलं जात नाही तर ते पाठ कसे होईल, असा सवाल त्यांनी केला. त्यांना बोल आणि चाल विचारत गावे लागते. पूर्वीची गाणी आजही लोकांच्या मनात आहेत. आताचे गाणे आले कधी आणि गेले कधी, हेच कळत नसल्याचे त्या म्हणाल्या. गाण्यांचे रिमिक्स करणे म्हणजे गाण्यांचा आत्मा मारल्यासारखे असते. आधीच्या लोकांनी अतिशय विचारपूर्वक ही गाणी तयार केली आहेत. त्यांचे रिमिक्स करून गाण्यांचे अर्थ आणि भावना बदलविल्या जात असल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान गेल्या काही वर्षात शास्त्रीय संगीताकडे तरुणांचा ओढा वाढला असून चांगले गायक निर्माण होणे, ही सुखदायी बाब असल्याची पावती त्यांनी दिली.
उषा मंगेशकर यांची चित्रकार म्हणूनही ओळख आहे. संगीत आणि चित्रकलेचा जवळचा संबंध आहे. आईकडून चित्रकलेची प्रेरणा घेतल्याचे सांगत प्रदर्शनाऐवजी हौसेखातर घरीच पोर्ट्रेट काढत असल्याचे त्यांनी सांगितले. लता मंगेशकर व आशा भोसले यांच्याविषयी सांगताना, आम्हा तिन्ही बहिणींचा गायनाचा बाज आणि दिशा वेगवेगळ््या असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र पुढचे १०० वर्षतरी दीदी (लता मंगेशकर) सारखे कुणीही गाऊ शकणार नाही. त्यांचा आवाज जगातले आश्चर्यच आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आईचे निधन हा सर्वात वाईट क्षण आणि दीदीला भारतरत्न मिळणे, हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
निवडणुकांकडे भीतीने बघते
होणाऱ्या निवडणुकांकडे कसे बघता, हा प्रश्न विचारला असता, निवडणुकीकडे भीतीने बघत असल्याचे त्यांनी सांगितले. काय होईल हे सांगता येत नाही, मात्र कोणतेही असो, ते स्थायी सरकार यावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कलावंतांच्या अभिव्यक्तीबाबत विचारले असता, कलाकारांनी योग्य असेल तर बाजू घ्यावी आणि चुकीचे असेल तर विरोध करावा असे सांगत, देशाचे नागरिक म्हणून कलावंतांनाही सरकारचे समर्थन अथवा विरोध करण्याचा अधिकार आहे, अशी भावना उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली.
उषाताईंच्या सोबत हार्मोनीचा ‘त्रिवेणी’ कार्यक्रम आज
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय चित्रपट संगीताचा इतिहास ठरलेल्या लता मंगेशकर, आशा भोसले व उषा मंगेशकर या तिघी बहिणींच्या संगीत प्रवासाला उजाळा देणारा संगीतमय कार्यक्रम ‘त्रिवेणी’ शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. सखे सोबती फाऊंडेशन आणि हार्मोनी इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमात गीत-संगीतासह उषा मंगेशकर यांच्याशी साधलेला संवाद वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. स्वत: उषाताई गाणी सादर करणार असून त्यांच्यासोबत स्थानिक कलावंतांचाही सहभाग राहणार असल्याचे, हार्मोनीचे राजेश समर्थ यांनी पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी विजय जथे, प्रफुल्ल मनोहर, रवी अंधारे, मिलिंद देशकर व प्रवीण मनोहर उपस्थित होते.

 

Web Title: Today's music does not work well: Usha Mangeshkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.