Today Propose Day; Express your feelings with your dear ones | आज प्रपोज डे; करा जिवलगासोबत ‘मन की बात’
आज प्रपोज डे; करा जिवलगासोबत ‘मन की बात’

ठळक मुद्देसांगा ‘त्या’ला तुमच्या मिठीत स्वर्ग आहे सारा...

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काल दिलात ना लालबुंद गुलाब? या गुलाबाने पोहोचवलाच असेल तुमच्या भावनांचा अलवार गंध जिवलगाच्या हृदयापर्यंत. पण, भाषा नजरेची असो वा फुलांची, त्यांना हवाच असतो शब्दांचा आश्वस्त साज. हे शब्द केवळ बाराखडीतली अक्षरे नसतात. हे वचन असते निष्ठेचे, समर्पणाचे. तुम्ही एखाद्यावर प्रामाणिक प्रेम करत असाल तर या प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी प्रपोज डे हा उत्तम पर्याय आहे. आता एक करा...आपल्या जिवलगासमोर मोरासारखे छाती काढून उभे रहा,  नजरेत नजर बांधून पाहा... सांगा त्याला, तुमच्या मिठीत स्वर्ग आहे सारा. जास्तीत जास्त काही होईल नकार मिळेल. पण, ‘मन की बात’ सांगितल्याचे समाधान त्याहून कितीतरी जास्त असेल आणि काय सांगावे, कदाचित तुमच्या पदरात होकाराचे दानही पडेल.

कुणाला फसवू नका प्लीज
‘मंदिर टुटे तो बन जाये, ...दिल ना किसी का टुटने पाये...’ असे जे म्हणतात ना, ते खरयं अगदी. समर्पणाशिवाय प्रेम हा निव्वळ भ्रम नाही, शुद्ध फसवणूक आहे. प्रपोज डेचा सोयीचा अर्थ काढून कुणाला फसवू नका. तुमचा हा क्षणिक स्वार्थ एखाद्याच्या जीवावरही बेतू शकतो. प्रेम जीव लावायला शिकवते, जीव घ्यायला नाही हे विसरू नका. एवढी नैतिकता पाळणार असाल तर हा दिवस तुमचाच आहे. ‘सो...लेटस् एन्जॉय प्रपोज डे’
काळ आॅनलाईनचा आहे. त्यामुळे तुमच्या प्रेमाच्या प्रस्तावाचा एक व्हिडीओ तयार करा आणि द्या पाठवून आपल्या आवडत्या व्यक्तीला. हा व्हिडीओ पाहून त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले तर जिंकलातच तुम्ही.
फुलांचा अन् प्रेमाचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे अगदी ठरवून बागेत भेटा. चौफेर बहरलेल्या फुलांच्या साक्षीने सांगून टाका तुमच्या मनातील भावना. होकार मिळाला तर ही बाग आयुष्यभर स्मरणात राहील.
तुम्हा दोघांनाही वाफाळती कॉफी आवडते का? आवडत असेल तर थेट कॅफे हाऊस गाठा. कॉफीवर हृदयचा आकार आणि त्यात आवडत्या व्यक्तीचे नाव लिहायला सांगा. तुम्ही काहीच बोलू नका. तो कॉफीचा कप तेवढा त्याच्या पुढे ठेवा. तोच कपच वाचून काढेल तुमच्या प्रेमाचा कशिदा.


Web Title: Today Propose Day; Express your feelings with your dear ones
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.