Three year jail term for acid fakes: Decision on the Nagpur High Court | अ‍ॅसिड प्रकरणात साळ्याला तीन वर्षांचा कारावास : नागपूर हायकोर्टाचा निर्णय

ठळक मुद्दे५० हजारांचा दंडहीदंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून जखमीला देण्याचा आदेश

आॅनलाईन लोकमत

नागपूर : अंगावर अ‍ॅसिड फेकून भाऊजीस गंभीर जखमी करणाºया साळ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भादंविच्या कलम ३२४ (गंभीर जखमी करणे) अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच, दंड वसूल झाल्यास ती रक्कम जखमीला भरपाई म्हणून देण्यात यावी असा आदेश दिला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील आहे.
प्रकाश महादेव मोहतुरे (५५) असे आरोपीचे नाव असून तो खापा येथील रहिवासी आहे. साहसराम अस्वले असे जखमीचे नाव आहे. अस्वलेचा बांधकाम सामग्री पुरवठ्याचा व्यवसाय होता. अस्वले व आरोपीमध्ये बांधकाम सामग्री पुरवठ्यावरून वाद झाला होता. त्यातून २८ मे २००१ रोजी आरोपीने अस्वलेच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले. त्यामुळे अस्वले गंभीर जखमी झाला.
सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील अंशत: मंजूर केले व सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल करून आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. शिक्षा भोगण्यासाठी आरोपीला ताब्यात घेऊन कारागृहात धाडण्यात यावे व भंडारा पोलीस अधीक्षकांनी या आदेशावर अंमलबजावणी झाल्याचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

आरोपी दयेस पात्र नाही
प्रकरणाची गंभीरता पाहता आरोपी दयेस पात्र नाही असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. अ‍ॅसिडमुळे जखमीला असह्य वेदना होतात. त्याला मानसिक धक्का बसतो व त्याच्या शरीराला विद्रुपता येते. आरोपी व्यवसायाने औषध विक्रेता असल्यामुळे या गोष्टी त्याला माहिती आहेत. त्यानंतरही त्याने हा गुन्हा केला असे न्यायालयाने निर्णयात म्हटले.
व्यवसायाने औषध विक्रेता असल्यामुळे या गोष्टी त्याला माहिती आहेत. त्यानंतरही त्याने हा गुन्हा केला असे न्यायालयाने निर्णयात म्हटले.