कर्जमाफीमुळे विदर्भातील तीन जिल्हा बँकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:04 AM2017-12-14T11:04:56+5:302017-12-14T11:05:16+5:30

गेल्या १५ वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेल्या व बंद पडायच्या बेतात असलेल्या तीन जिल्हा बँकांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीमुळे जीवदान मिळाले आहे.

Three district banks in Vidarbha are survived due to debt waiver | कर्जमाफीमुळे विदर्भातील तीन जिल्हा बँकांना जीवदान

कर्जमाफीमुळे विदर्भातील तीन जिल्हा बँकांना जीवदान

Next
ठळक मुद्देबुलडाणा, वर्धा व नागपूर बँका आता बंद होणार नाहीत

सोपान पांढरीपांडे।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : गेल्या १५ वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेल्या व बंद पडायच्या बेतात असलेल्या तीन जिल्हा बँकांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीमुळे जीवदान मिळाले आहे. या बँक म्हणजे बुलडाणा जिल्हा बँक, वर्धा जिल्हा बँक व नागपूर जिल्हा बँक या आहेत.
२००२ साली नागपूर जिल्हा बँकेने सरकारी कर्जरोखे खरेदीत १२४.६० कोटी व वर्धा जिल्हा बँकेने ३० कोटी गमाविले होते. त्या रोखे घोटाळ्यामुळे या दोन्ही बँकांची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती तर बुलडाणा बँकेत चुकीच्या कर्जवाटपामुळे तोटा झाला होता. परिणामी या तिन्ही बँका १५ वर्षांपासून प्रशासकाच्या ताब्यात आहेत.
नाजूक आर्थिक स्थितीमुळे तिथले कर्जवाटप बंद झाले होते व बँका बंद करायच्या बेतात आल्या होत्या. या बँकांना रिझर्व्ह बँकेचे लायसन्स मिळावे म्हणून २०१६ साली राज्य सरकारने नागपूर जिल्हा बँकेला १५६ कोटी, बुलडाणा जिल्हा बँकेला २०७ कोटी व वर्धा जिल्हा बँकेला १६१ कोटीचे पॅकेज दिले होते. त्यामुळे या जिल्हा बँकांचा संचित तोटा कमी झाला होता. पण जीवदान मिळाले नव्हते. ते आता शेतकरी कर्जमाफीमुळे मिळाले आहे.
नागपूर जिल्हा बँकेची कृषी कर्जाची थकबाकी ३०६ कोटी आहे व संचित तोटा २२१ कोटी होता. नागपूर जिल्हा बँकेने एकूण ३८४४४ शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे म्हणून अर्ज केले होते. त्यापैकी २०१८४ अर्ज मंजूर होऊन बँकेला १३७.५४ कोटी मिळाले आहेत व डिसेंबर अखेरपर्यंत अजूनही रक्कम मिळणार असल्याचे प्रशासक संजय कदम यांनी सांगितले.
बुलडाणा जिल्हा बँकेची कृषीकर्जाची थकबाकी २४४ कोटी व संचित तोटा २४८ कोटी होता. बँकेने ४७६८३ शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे म्हणून अर्ज केला होता. त्यापैकी २८१६२ शेतकऱ्यांचे १२९.३६ कोटी बँकेला मिळाले आहे अशी माहिती प्रशासक डॉ. अशोक खरात यांनी दिली.
वर्धा जिल्हा बँकेची कृषिकर्ज थकबाकी १३६ कोटी आहे व संचित तोटा २८३ कोटी होता. बँकेला ५१२० शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे २५.१७ कोटी मिळाले आहेत अशी माहिती प्रशासक संजय कोरडे यांनी दिली.
या तिन्ही बँकांना कर्जमाफीच्या केवळ दोन टप्प्यात ही रक्कम मिळाली आहे. अजून डिसेंबर अखेरपर्यंत आणखी दोन ते तीन टप्प्यात कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे नेमकी किती रक्कम मिळाली हे जानेवारीत कळू शकेल. पण पहिल्या दोन टप्प्यांच्या कर्जमाफीमुळे तरलता निधीची पूर्तता झाली आहे. त्यामुळे या बँका आता बंद पडणार नाहीत, असे तिन्ही प्रशासकांनी सांगितले.

Web Title: Three district banks in Vidarbha are survived due to debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक