त्या आल्या,‘सेल्फी’ काढल्या अन् निघून गेल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:07 AM2017-08-17T01:07:10+5:302017-08-17T01:09:13+5:30

भाजपाची केंद्रात, राज्यात आणि नागपूर महानगरपालिकेत सत्ता आहे. अशास्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या चिनी वस्तूंच्या विरोधातील आंदोलनात कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात सहभागी होणे अपेक्षित आहे.

They came, 'Selfie' removed and left! | त्या आल्या,‘सेल्फी’ काढल्या अन् निघून गेल्या!

त्या आल्या,‘सेल्फी’ काढल्या अन् निघून गेल्या!

Next
ठळक मुद्देभाजपा महिला कार्यकर्त्यांचे चिनी वस्तूंविरोधात असेही आंदोलन : ‘चमकोगिरी’च अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाची केंद्रात, राज्यात आणि नागपूर महानगरपालिकेत सत्ता आहे. अशास्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या चिनी वस्तूंच्या विरोधातील आंदोलनात कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात सहभागी होणे अपेक्षित आहे. बुधवारी पक्ष कार्यालयासमोर महिला कार्यकर्त्या आल्या, अगोदर ‘सेल्फी’ काढल्या; नंतर बोटावर मोजण्याइतपत चिनी वस्तू दोन बादल्यांमध्ये बुडविल्या, परत ‘फोटोसेशन’ केले अन् ‘चायनीज मोबाईल’वर ‘से नो टू चायना’ असे लिहित ‘फोटो’ शेअर केले. अशारीतीने ‘सेल्फीमय’ आंदोलनाचे सोपस्कार पार पाडले. प्रसिद्धीच्या नादात बुधवारी महिला कार्यकर्त्यांच्या आंदोलनातील पार हवाच निघून गेली.
बुधवारी भाजपा महिला मोर्चातर्फे गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयासमोर चिनी वस्तूंच्या विरोधात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून ही माहिती पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. प्रत्यक्षात आंदोलनस्थळी ५० हून अधिक महिलादेखील जमल्या नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे आंदोलनस्थळी नियोजनाची तर बोंबच होती. अवघ्या चार ते पाच चिनी वस्तू होत्या. ‘चिनी वस्तू बुडवा’ असे आंदोलन होते. मात्र अतिउत्साहात कार्यकर्त्यांनी पायदळी वस्तू तुडविल्या. मग नेमके आंदोलन काय, याची आठवण आली.

ऐनवेळी जवळील दुकानांमधून दोन बादल्या आणल्या गेल्या आणि अगोदरच तोडलेल्या ‘चिनी’ वस्तूंना १ फूट पाण्यात जलसमाधी देण्यात आली. या आंदोलनाला पाहून शहर भाजपाच्या काही पदाधिकाºयांनी तर कपाळावरच हात मारून घेतला. शहराच्या महापौर डॉ. नंदा जिचकार यांच्या उपस्थितीत हे नियोजनशून्य आंदोलन झाले. या ‘सो कॉल्ड’ आंदोलनाला काही आजी-माजी नगरसेविकादेखील उपस्थित होत्या. कार्यकर्त्यांची ‘सेल्फीगिरी’ पाहून एका माजी महिला महापौरांनी संतापदेखील व्यक्त केला व कार्यकर्त्यांना फटकारले. मात्र त्यांच्या हाती सत्तेची चावी नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचे बोलणे गंभीरतेने घेतलेच नाही.
नियोजनाचा बोजवारा
संघाच्या विविध संघटनांतर्फे प्रसिद्धीच्या मागे न धावता नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र भाजपा महिला आघाडीच्या या आंदोलनात ना गर्दी दिसली ना नियोजन होते ना उत्साह होता. चिनी वस्तूंच्या विरोधापेक्षा ‘फोटोसेशन’वरच जास्त भर देण्यात आला. या नादात नियोजनाचा पार बोजवारा उडाल्याचे चित्र होते.

Web Title: They came, 'Selfie' removed and left!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.