अधिकारी म्हणतात टंचाई नाहीच; मग चारा गेला कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:09 AM2019-05-22T11:09:12+5:302019-05-22T11:09:39+5:30

जिल्ह्यातील तीन दुष्काळग्रस्त तालुक्यात चारा टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. जिल्ह्यात चाऱ्यासाठी पशुपालकांची भटकंती पहिल्यांदाच होत असून, मराठवाड्यासारख्या चारा छावणीची गरज आहे.

There is no shortage of fodder; Then where did the fodder go? | अधिकारी म्हणतात टंचाई नाहीच; मग चारा गेला कुठे ?

अधिकारी म्हणतात टंचाई नाहीच; मग चारा गेला कुठे ?

Next
ठळक मुद्देजनावरांची तडफड दुष्काळग्रस्त तालुक्याची विदारक अवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील तीन दुष्काळग्रस्त तालुक्यात चारा टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. जिल्ह्यात चाऱ्यासाठी पशुपालकांची भटकंती पहिल्यांदाच होत असून, मराठवाड्यासारख्या चारा छावणीची गरज आहे. जनावरांचे पोट भरण्यासाठी गावागावात तणसाच्या पेंढ्या ट्रकने येत आहे. अशी स्थिती असताना पशुसंवर्धन विभागाच्या कागदावर तीनही दुष्काळग्रस्त तालुक्यात १,२३, ०९५.७२ मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. पशुपालक ट्रक भरून भरून तणस आणत असेल, तर हा चारा गेला कुठे? असा सवाल पशुपालकांकडून होत आहे.
नागपूर जिल्ह्यात काटोल, कळमेश्वर आणि नरखेड तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. दुष्काळाचा फटका जनावरांना चांगलाच बसत आहे. या तीनही तालुक्यात आजच्या घडीला जनावरांसाठी वैरण राहिलेले नाही.
पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार काटोलमध्ये ७८२८७, कळमेश्वरमध्ये ४७४४८ व नरखेडमध्ये ६९८७३ जनावर नोंदणीकृत आहे. पशुसंवर्धन विभागाने या जनावरांसाठी ४८ दिवसाला लागणाºया वैरणाचे आकडेही दिले आहे. यात काटोल तालुक्यात १४१६९.६, कळमेश्वरमध्ये ८७१४.४ व नरखेडमध्ये १३०५९.८४ मेट्रिक टन लागते आहे. आजच्या घडीला विविध माध्यमातून उपलब्ध मुबलक वैरण उपलब्ध असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांचे आकडे बोलतात. काटोलमध्ये ४८७१८.६० मेट्रिक टन, कळमेश्वरमध्ये २८८०२.६२ मेट्रिक टन व नरखेडमध्ये ४५५७४.५० मेट्रिक टन एवढे वैरण पशुसंवर्धन विभागाच्या कागदावर आहे. त्यामुळे काटोलात केवळ तीन तीन दिवस, कळमेश्वरमध्ये नऊ दिवस व नरखेडमध्ये एक दिवस चाऱ्याची तूट भासणार असल्याचा स्थानिक पशुधन अधिकाऱ्यांनी अहवाल दिला आहे.
ही सर्व आकडेवारी फोल असल्याचे स्थानिक पशुपालकांचे म्हणणे आहे. जनावरांसाठी मध्यप्रदेशातील छिंदवाडा व बैतूल जिल्ह्यातून कुटार आणावे लागत आहे. भंडारा जिल्ह्यातून तणस मोठ्या प्रमाणावर आणले जात आहे.
एका एका गावात १० ते १२ गाड्या दररोज तणसाच्या येत आहे. एका एका गाडीवर ८ ते १० हजार रुपये पशुपालकाला खर्च करावे लागत आहे. जनावर जगवावी या विवंचनेत पशुपालक असताना, विभागाच्या खोट्या आकडेवारीमुळे पशुपालकांनी संताप व्यक्त केला आहे.

टंचाई नसेल तर चारा अधिकाऱ्यांनी उपलब्ध करावा
जानेवारी महिन्यापासून चारा टंचाई भेडसावत आहे. आता तर तालुक्यातील चाराच संपला आहे. माझ्याकडे २०० जनावरं आहे. त्यांना खाऊ घालण्यासाठी २५ गाड्या तणसाच्या बोलाविल्या आहे. अधिकारी जर चाऱ्याची टंचाई नाही, असे म्हणत असेल, तर त्यांनी चारा उपलब्ध करून द्यावा.
- इशाक बुराडे, पशुपालक

पहिल्यांदाच असा दुष्काळ काटोल तालुक्यात अनुभवत आहे. अधिकारी केवळ कार्यालयात बसून दुष्काळाचे नियोजन करीत आहे. जनावरे भुकेने आजारी पडत आहे. पशुपालकांनी जनावर बाजारात विकायला काढली आहे. चारा टंचाई नाही, असे म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांनी गावात यावे, जनावरांची अवस्था बघावी. दुष्काळ असतानाही अधिकाऱ्यांकडून अहवालात दुष्काळ दाखविला जात नाही. जनावरे मरो अधिकाऱ्यांना काही घेणेदेणे नाही. अधिकाऱ्यांच्या अहवालात चारा टंचाई नसली तरी, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांक डे चारा छावणीसाठी मागणी केली आहे.
- चंद्रशेखर चिखले,
माजी उपाध्यक्ष, जि.प. नागपूर

Web Title: There is no shortage of fodder; Then where did the fodder go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती