२०२० पर्यंत हत्तीरोग दुरीकरणाचे लक्ष्य : आरोग्य मंत्री शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 09:32 PM2019-01-18T21:32:15+5:302019-01-18T21:36:41+5:30

हत्तीरोगामुळे शारीरिक विकृती, आजन्म अपंगत्व असे गंभीर परिणाम होतात. यामुळे हत्तीरोग नियंत्रणात येणे अतिशय आवश्यक आहे. पूर्वी या रोगावर ‘डायथिल कार्बामेझिन सायट्रेट’ व ‘अलबेंडाझॉल’ औषध दिले जायचे. परंतु आता ‘आयव्हरमेक्टिन’ या औषधांचाही समावेश करण्यात आला आहे. या ‘ट्रिपल ड्रग’ उपचार पद्धतीमुळे २०२० पर्यंत हत्तीरोग दुरीकरणाचे लक्ष्य गाठा, असे आवाहन आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.

Targeting of philariasis diseases end by 2020: Health Minister Shinde | २०२० पर्यंत हत्तीरोग दुरीकरणाचे लक्ष्य : आरोग्य मंत्री शिंदे

२०२० पर्यंत हत्तीरोग दुरीकरणाचे लक्ष्य : आरोग्य मंत्री शिंदे

Next
ठळक मुद्दे‘ट्रिपल ड्रग’ उपचार पद्धतीची महाराष्ट्रात नागपूर येथून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हत्तीरोगामुळे शारीरिक विकृती, आजन्म अपंगत्व असे गंभीर परिणाम होतात. यामुळे हत्तीरोग नियंत्रणात येणे अतिशय आवश्यक आहे. पूर्वी या रोगावर ‘डायथिल कार्बामेझिन सायट्रेट’ व ‘अलबेंडाझॉल’ औषध दिले जायचे. परंतु आता ‘आयव्हरमेक्टिन’ या औषधांचाही समावेश करण्यात आला आहे. या ‘ट्रिपल ड्रग’ उपचार पद्धतीमुळे २०२० पर्यंत हत्तीरोग दुरीकरणाचे लक्ष्य गाठा, असे आवाहन आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
हत्तीरोग किंवा ‘लिम्फॅटिक फिलॅरिअ‍ॅसिस’ हा आजार हद्दपार करण्यासाठी आखलेल्या राष्ट्रीय पातळीवरील प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेची सुरुवात महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात २० जानेवारीपासून होणार आहे. याच्या शुभारंभाप्रसंगी आरोग्य मंत्री शिंदे उद्घाटक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश भोई, नागपूर विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, सहायक संचालक डॉ. मिलिंद गणवीर, डॉ. जितेंद्र डोलारे, अमनदीप सिंग आदी उपस्थित होते. आरोग्य मंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्रासह देशातील १६ राज्यात ‘लिम्फॅटिक फिलॅरिअ‍ॅसिस’ आरोग्य समस्या म्हणून समोर आली आहे. या आजाराचा फटका बसलेल्या व्यक्ती समाजापासून अलग पडतात. त्यांना रोजीरोटी कमाविणे अशक्य होते. २०१७च्या आकडेवारीनुसार या आजाराचे ६५ हजार रुग्ण आढळून आले. नागपूर जिल्ह्यात ४७५८ व्यक्तींना अवयव सुजण्याचा तर २८७७ व्यक्तींना गुप्तांग सुजण्याचा त्रास आहे. या आजाराच्या विरोधात २००४ पासून राष्ट्रीय मोहीम सुरू करण्यात आली आहे. परंतु त्यानंतरही रोगाचा संसर्ग हा सुरक्षित पातळीपेक्षा जास्त आहे. म्हणूनच तिहेरी औषध उपचाराचा मार्ग हाती घेण्यात आला आहे. प्रायोगिक स्तरावर देशाच्या पाच जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येईल. यात नागपूर जिल्ह्यासह बिहारमधील अरवल जिल्ह्यात, उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात, झारखंड येथील सिमडेगा जिल्ह्यात तर कर्नाटकमधील यादगिर या जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्वांच्या प्रयत्नामुळे व टीम म्हणून काम करणार असल्याने हत्तीरोग दुरीकरणाचे लक्ष्य गाठणे शक्य आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. भोई म्हणाले, देशात २५६ जिल्हे हत्तीरोगाने ग्रस्त आहेत. महाराष्ट्रात यातील ११ जिल्ह्यांचा समावेश असून एकट्या विदर्भात आठ जिल्हे आहेत. नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ५१ लाख आहे. यातील ४८ लाख लोकांना ‘ट्रिपल ड्रग’ दिले जाईल. या मोहिमेत १३ हजार ९०० कर्मचारी आपल्या समोर नागरिकांना जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) नियमानुसार औषधे खाऊ घालतील, असेही ते म्हणाले. उद्घाटन कार्यक्रमानंतर या औषध उपचारपद्धतीची माहिती डॉ. मिलिंद गणवीर, डॉ. के. बी. तुमाने, डॉ. जयश्री थोटे, डॉ. दिनेश अग्रवाल, राजश्री दास, डॉ. रश्मी शुक्ला व अमनदीप सिंग यांनी दिली.
सात हजार रिक्त जागा भरण्याला प्राधान्य -आरोग्य मंत्री शिंदे
राज्यातील आरोग्य विभागात सात हजार रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तत्कालीन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या आमदारकीची टर्म संपल्याने त्यांच्या खात्याचा कार्यभार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर आरोग्य विभागाच्या पहिल्याच कार्यक्रमात ते आले होते. शिंदे म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा असला तरी प्रत्येक रुग्णाला औषधी उपलब्ध करून दिली जाईल. आरोग्य सेवा ही शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

 

Web Title: Targeting of philariasis diseases end by 2020: Health Minister Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.