एटीएम कार्ड भाड्याने घेऊन बँकांच्या रकमांवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:03 AM2017-08-22T01:03:13+5:302017-08-22T01:08:38+5:30

तुमच्या खात्यात ५०० रुपये आहे. तरीसुद्धा तुमच्या एटीएम कार्डचा गैरवापर करून कुणी एकाच दिवशी चक्क १५ ते २० हजार रुपये काढून घेऊ शकतो.

Taking the ATM card on rent, the banker said | एटीएम कार्ड भाड्याने घेऊन बँकांच्या रकमांवर डल्ला

एटीएम कार्ड भाड्याने घेऊन बँकांच्या रकमांवर डल्ला

Next
ठळक मुद्देथक्क करणारी शक्कल : कानपुरी टोळीचा देशभरात गहजब

नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुमच्या खात्यात ५०० रुपये आहे. तरीसुद्धा तुमच्या एटीएम कार्डचा गैरवापर करून कुणी एकाच दिवशी चक्क १५ ते २० हजार रुपये काढून घेऊ शकतो. शक्य वाटत नसले तरी, हे खरे आहे. गरजूंचे आणि फारसा वापर न करणारांचे एटीएम कार्ड भाड्याने घेऊन अशा प्रकारे देशातील विविध प्रांतातील एटीएममधून लाखो रुपये लंपास करणारी टोळी उजेडात आली आहे. त्यातील एका गुन्हेगारानेच या खळबळजनक प्रकाराचा पोलीस चौकशीत गौप्यस्फोटवजा खुलासा केला आहे.
कानपूर, चकेरी (उत्तर प्रदेश) येथील गुन्हेगारांचा समावेश या टोळीत आहे. कोणत्याही बँकेच्या कोणत्याही गावा-शहरातील एटीएममधून एकाच दिवशी हजारो रुपये बिनबोभाटपणे या टोळीतील सदस्य काढून घेतात. त्यातीलच आरोपी नीरज उजागरसिंग यादव (वय २७) सध्या नागपूरच्या प्रतापनगर पोलिसांच्या कस्टडीत आहे. त्याला पोलिसांनी कानपुरातून पकडून आणले. त्याने व त्याच्या टोळीतील साथीदारांनी ९ जून ते ३ आॅगस्ट २०१७ च्या कालावधीत त्रिमूर्तीनगरातील मंगलमूर्ती चौकातील एका एटीएममधून ७ लाख, २५ हजार चोरून नेले. केवळ नागपूरच नव्हे तर दिल्लीसह देशातील अनेक प्रांतात त्यांनी एटीएममधून अशाच प्रकारे लाखो रुपये काढून घेतलेले आहे.
अशी आहे पद्धत
त्यांची रोकड चोरून नेण्याची पद्धत सरळसोपी परंतू तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. आरोपी नीरज, पंकज, गौरव आणि उदय अशा ८ ते १० जणांचा समावेश असलेल्या या टोळीचे सदस्य आजूबाजूच्या गरजू व्यक्तींना, ओळखीच्यांना आणि मित्रांसोबतच नातेवाईकांनाही त्यांचे एटीएम कार्ड मागतात. एक दिवसाचे ५०० ते १००० रुपये भाडेही प्रामाणिकपणे नंतर कार्डधारकाच्या हातात ठेवतात. आपल्या बँक खात्यात ५०० रुपयेच असल्याने आणि ही रक्कम विड्रॉल करता येत नसल्याने कार्डधारकांना त्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेतली जाण्याची भीती वाटत नाही. त्यामुळे ते आरोपींच्या हातात आपले एटीएम कार्ड बिनधास्तपणे ठेवतात.
कोड नंबर आणि बँक खाते क्रमांक माहीत करून घेतल्यानंतर या टोळीतील सदस्य कानपूरपासून शेकडो किलोमीटर दूर अंतरावर सैरसपाट्याच्या नावाखाली निघतात. मनात येईल त्या शहरात किंवा गावात पोहोचल्यानंतर तेथील एटीएममध्ये तीन ते चार जण शिरतात. आधी ज्या एटीएम कार्डचा वापर करणार आहे, त्या कार्डधारकाच्या खात्यात १० ते १५ हजार रुपये जमा करतात. काही वेळेनंतर ही रक्कम काढून घेण्यासाठी दुसºयांदा कार्ड मशीनमध्ये घातले जाते. पिनकोड नमूद केल्यानंतर रक्कम किती काढायची, तो आकडा टाकला जातो. येथपर्यंतची प्रक्रिया सुरळीत होताच मशीनमधून नोटा मोजल्या जाण्याचा आवाज येतो. नोटा मोजण्याचा आणि मशिनमधून त्या बाहेर येण्याचा अवधी ५ ते १० सेकंदाचा असतो, नेमक्या या वेळेत एक आरोपी नोटा बाहेर काढणाºया मशीनच्या पोळीत बोटे टाकून ठेवतो आणि दुसरा आरोपी मास्टर (डुप्लीकेट) चावीने मशीन बंद करतो. त्याने मशीन बंद केल्यामुळे नोटा मशीनच्या बाहेर अर्धवट स्वरूपातच येतात. मात्र, आरोपीने बोट टाकून ठेवल्यामुळे तो त्या नोटा ओढून घेतो. अशाप्रकारे आरोपीच्या हातात मशीनमधून नोटा येत असल्या तरी व्यवहार पूर्णत्वास जाण्यापूर्वीच मशीनमध्ये बिघाड (बंद पडण्याचा!) झाल्याने बँकेच्या लेखी हा व्यवहार पूर्ण झालेला नसतो,त्यामुळे खातेधारकाची रक्कम त्याच्या खात्यात जैसे थेच राहते. इकडे आरोपीच्या हातात रक्कम आलेली असते. एका कार्डचा दोन ते तीनवेळा उपयोग करून या टोळीतील सदस्यांनी नागपूरसह विदर्भातील वर्धा (हिंगणघाट) आणि हैदराबाद, दिल्लीसह विविध ठिकाणच्या एटीएममधून लाखो रुपये चोरून खळबळ उडवून दिली.

हाक ना बोंब, सारे कसे आलबेल!
काही दिवसानंतर कानपूरला परत गेल्यानंतर संबंधित व्यक्तीला ते त्याचे एटीएम कार्ड अन् कार्डचे भाडे म्हणून त्याच्या हातात दोन ते तीन हजार रुपयेही ठेवतात. नुसते कार्ड दिले म्हणून दोन-तीन हजार रुपये हातात पडत असल्याने कोणताही कार्डधारक कसलीही कुरबूर करीत नसल्याचे नीरज सांगतो. त्यामुळे कार्ड (भाड्याने) घेताना कसलीच अडचण जात नाही आणि त्याचमुळे नीरज आणि त्याच्या साथीदारांच्या कानपुरी टोळीचा भाड्याने एटीएम कार्ड घेऊन बँकेतून लाखो रुपये चोरण्याचा गोरखधंदा बिनबोभाट सुरू होता.

विशेष म्हणजे, एटीएममध्ये महिन्याला कोट्यवधी रुपये जमा केले जाते. रक्कम जमा करणारी एजन्सी वेगळीच असते. त्यामुळे महिनोन्महिने एटीएमच्या रकमेचा हिशेब होत नाही. या प्रकरणातही तब्बल तीन महिन्यांनी रोकड चोरीला गेल्याची बाब उघड झाली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी शिताफीने तपास करून अवघ्या दोन आठवड्यात या खळबळजनक प्रकरणाचा उलगडा करण्यात यश मिळवले.

Web Title: Taking the ATM card on rent, the banker said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.