नागपुरात निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:59 AM2018-03-04T00:59:26+5:302018-03-04T00:59:36+5:30

नंदनवनमधील खरबी चौकाजवळच्या सहकारनगरात राहणारे मधुकर निनावे (वय ६९) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. बेदम मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.

Suspicious death of retired railway employee in Nagpur | नागपुरात निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

नागपुरात निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

Next
ठळक मुद्देबेदम मारहाण करून ठार मारल्याचा आरोप : उलटसुलट चर्चेला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नंदनवनमधील खरबी चौकाजवळच्या सहकारनगरात राहणारे मधुकर निनावे (वय ६९) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. बेदम मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
सहकारनगर, प्लॉट नं. ७ मध्ये राहणारे मधुकर निनावे रेल्वेच्या वॉकी टाकी विभागात कार्यरत होते. त्यांच्या परिवारात पत्नी सुमन, अरविंद, प्रशांत ही मुले आणि एका विवाहित मुलीचा समावेश आहे. १० वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. त्यावेळी त्यांना मोठी रोख रक्कम मिळाली. त्यावेळी त्यांनी घर, तर मुलांनी महागडी बुलेट आणि एक दुसरी दुचाकी घेतली. गेल्या काही दिवसांपासून त्यांना दारूचे व्यसन जडल्यामुळे त्यांचा मुलासोबत नेहमी वाद होत होता. होळीच्या दिवशी गुरुवारी रात्री ७ ते ८ च्या सुमारास त्यांच्यात आणि मुलात पुन्हा कडाक्याचा वाद झाला. शेजारच्या अनेकांनी तो बघितला. बाजूच्या काही सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो कैद झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर पांगापांग झाली. शुक्रवारी धुळवडीचा दिवस असल्याने त्यांना सकाळी उठवण्याचे पत्नीने टाळले. मात्र, दुपारी बराच वेळ होऊनही ते तसेच झोपून दिसल्याने पत्नीने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. निनावेंचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्याने पत्नीने मुलगी तसेच अन्य नातेवाईकांना कळविले. शेजारीही गोळा झाले. त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा असल्यामुळे एकाने नंदनवन पोलिसांना कळविले. पोलिसांनी मृतदेह बघितल्यानंतर पत्नी आणि मुलांसह अन्य नातेवाईकांचीही विचारपूस केली. निनावे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. तूर्त पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला.
पोलीस म्हणतात, चौकशी सुरू आहे
या संबंधाने परिसरात उलटसुलट चर्चा आहे. निनावे यांचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचा आरोप आहे तर नंदनवन पोलिसांनी जखमा असल्याचे मान्य केले तरी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट होईल, असे म्हटले आहे. चौकशी सुरू असून, सीसीटीव्हीचे फुटेजही तपासले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Suspicious death of retired railway employee in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.