नागपूर जिल्ह्यातील नवेगावात विद्यार्थ्यांमध्ये बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:39 AM2018-03-20T10:39:28+5:302018-03-20T10:39:42+5:30

केंद्र शासनामार्फत चालविण्यात येत असलेल्या नवेगाव (खैरी) (ता. पारशिवनी) येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे.

Students in threat of leopard in Navgaon in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील नवेगावात विद्यार्थ्यांमध्ये बिबट्याची दहशत

नागपूर जिल्ह्यातील नवेगावात विद्यार्थ्यांमध्ये बिबट्याची दहशत

googlenewsNext
ठळक मुद्देभिंतीची उंची फारच कमी शिक्षकाच्या निवासस्थानात चार तास ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र शासनामार्फत चालविण्यात येत असलेल्या नवेगाव (खैरी) (ता. पारशिवनी) येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. या बिबट्याने विद्यालयाच्या प्राचार्याकडील पाळीव कुत्र्याची शिकार केली. त्यामुळे येथील विद्यार्थी प्रचंड दहशतीत असून, पालक चिंतेत आहेत. पालकांनी या बिबट्याबाबत वन अधिकाऱ्यांना माहिती दिली. परंतु, वन विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याने बिबट्याचा मुक्तसंचार सुरूच आहे.
नागपूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय पारशिवनी तालुक्यातील नवेगाव (खैरी) येथे असून, हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त आहे. दीड वर्षांपासून या विद्यालयाच्या आवारात बिबट्याचा वावर आहे. पूर्वी या बिबट्याचे अधूनमधून दर्शन व्हायचे. हल्ली त्याचा वावर वाढला आहे. मागील आठवड्यात त्याने एका शिक्षकाच्या निवासस्थानात चक्क १० दिवस मुक्काम ठोकला होता. त्यानंतर अन्य एका शिक्षकाच्या निवासस्थानात चार तास ठिय्या मांडला होता, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली असून, त्याला शाळेचे प्राचार्य राम देव व शिक्षकांनी दुजोरा दिला. याबाबत प्राचार्य देव यांनी वन अधिकाऱ्यांना प्रत्येक वेळी माहिती दिली. परंतु, वन विभागाने त्या बिबट्याचा अद्यापही कायम बंदोबस्त केला नाही.
यासंदर्भात पालकांनी प्राचार्य राम देव यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. ही शाळा निवासी असल्याने पालकांनी त्यांची चिंताही यावेळी व्यक्त केली. या विद्यालयाच्या एका भागाला पहाडी व जंगल असून, शाळा व वसतिगृहाच्या आवाराची सुरक्षा भिंत ही या इमारतीपासून बरीच दूर आहे. शिवाय, या भिंतीची उंची फारच कमी आहे. काही ठिकाणी ही भिंत बेपत्ता झाली आहे. त्यामुळे बिबट्यासह इतर वन्य प्राणी या शाळेच्या परिसरात सहज प्रवेश करू शकतात. बिबट्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका उद्भवण्याची शक्यता बळावल्याने पालकांची हुरहुर वाढली आहे. वन विभागाची या गंभीर प्रकाराबाबतची अनास्था ही अनाकलनीय आहे.

विद्यार्थ्यांपेक्षा बिबट महत्त्वाचा?
या बिबट्याला आता मानवी सहवासाची सवय जडू लागली आहे. हा बिबट काही दिवसांपूर्वी प्राचार्य देव याच्या मुलीवर गुरगुरला होता. त्यामुळे त्याचा धीटपणा वाढण्याची शक्यता आहे. त्याचा कायम बंदोबस्त करणे वन विभागाला फारसे अवघड नाही. कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर पाळत ठेवून त्याला बेशुद्ध करून पकडावे आणि दूरवरच्या दुसऱ्या जंगलात सोडून देणे सहज शक्य आहे. मात्र वन अधिकारी येथील ४८० विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या जीविताची चिंता न करता त्या बिबट्याला महत्त्व देत असल्याने पालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

भोजनकक्ष अर्धा कि.मी. अंतरावर
या शाळेत इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत एकूण ४८० विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत असून, ४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे सर्व जण शाळेच्याच परिसरात राहत असल्याने शाळा, वसतिगृह, भोजनकक्ष, प्रार्थनाकक्ष, शिक्षक व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने अशा विविध इमारती आहेत. इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या वसतिगृह ते भोजनकक्ष हे अंतर अर्धा किमी एवढे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज भोजनकक्षात पायी जावे व परत यावे लागते. रात्रीच्यावेळी बिबट या मुलांवर हल्ला चढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थिनी व इतर विद्यार्थ्यांचे भोजनकक्ष त्यांच्या वसतिगृहापासून जवळ आहे.

उंच सुरक्षा भिंत गरजेची
या शाळेचा संपूर्ण परिसर निसर्गरम्य असला तरी तो जंगलव्याप्त आहे. त्यामुळे शाळेच्या संपूर्ण आवाराला उंच व मजबूत सुरक्षा भिंत असणे गरजेचे आहे. या संदर्भात आपण उपविभागीय अधिकारी राम जोशी यांच्याशी चर्चा केली. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. लवकरच ही मागणी मंजूर होईल. उंच भिंतीमुळे वन्य प्राण्यांच्या शाळा परिसरातील शिरकावाला प्रतिबंध घालणे शक्य होईल.
- राम देव, प्राचार्य,
जवाहर नवोदय विद्यालय,
नवेगाव (खैरी).

Web Title: Students in threat of leopard in Navgaon in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.