प्रस्तावांच्या गठ्ठ्यात अडकली नागपुरातील कुत्र्यांवरील नसबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 10:27 AM2018-01-23T10:27:53+5:302018-01-23T10:33:56+5:30

नागपूर शहरात एक लाख बेवारस कुत्रे आहेत. परंतु महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कुत्र्यांवरील नसबंदी प्रस्तावांच्या गठ्ठ्यात अडकली आहे.

Street dogs problem in Nagpur is due to lethargic approach | प्रस्तावांच्या गठ्ठ्यात अडकली नागपुरातील कुत्र्यांवरील नसबंदी

प्रस्तावांच्या गठ्ठ्यात अडकली नागपुरातील कुत्र्यांवरील नसबंदी

ठळक मुद्देप्रशासन व पदाधिकारी उदासीनबेवारस कुत्र्यांच्या त्रासातून नागरिकांची सुटका कधी होणार ?

गणेश हूड।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात एक लाख बेवारस कुत्रे आहेत. रात्रीला कामावरून घरी परतणारे कुत्र्यांमुळे दहशतीत असतात. दुचाकी वाहन दिसले की कुत्रे धावतात. यामुळे अपघात होण्याचा धोका असतो. तसेच लहान मुलांना चावण्याचा घटना वाढल्या आहेत. दरवर्षी शहरातील सात ते आठ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडतात. रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांमुळे घाण पसरत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. याला आळा घालण्यासाठी बेवारस कुत्र्यांवर नसबंदी होण्याची गरज आहे. यासाठी दोन वर्षात अनेकदा प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. परंतु महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कुत्र्यांवरील नसबंदी प्रस्तावांच्या गठ्ठ्यात अडकली आहे.
मागील चार-पाच वर्षांपासून बेवारस कुत्र्यांवर नसबंदी करण्याचा उपक्रम बंद आहे. काही महिन्यांपूर्वी सोसायटी फॉर प्रिव्हन्शन आॅफ क्रुरिटी अ‍ॅनिमल व व्हेस्टस् फॉर अ‍ॅनिमल (सातारा) या दोन संस्थांवर नसबंदीची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने घेतला होता. या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली होती. परंतु हा प्रस्ताव बारगळला. शासकीय पशु वैद्यकीय महाविद्यालयामार्फत नसबंदी केली जाते. परंतु दिवसाला जेमतेम एका कुत्र्यावर नसबंदी केली जात आहे. दुसरीकडे मारव्हा एसपीसीएल या संस्थेला ही जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु या संस्थेकडे सक्षम यंत्रणा नसल्याने नसबंदीचा आकडा दहाच्या पुढे गेलेला नाही. शहरातील बेवारस कुत्र्यांची संख्या विचारात घेता नसबंदीचा उपक्रम नावापुरताच सुरू आहे. आता पुन्हा वर्धा येथील पीपल्स फॉर अ‍ॅनिमल या संस्थेला नसबंदीचे काम देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात नसबंदीच्या अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. पण अमंलबजावणी शून्य आहे. नसबंदीसंदर्भात प्रशासन व पदाधिकाऱ्यांची उदासीनता विचारात घेता शहरातील नागरिकांना बेवारस कुत्र्यांचा त्रास सहन केल्याशिवाय तूर्त तरी दुसरा पर्याय दिसत नाही.

नियोजनाचा अभाव
बेवारस कु त्र्यांवर नसबंदीची प्रक्रिया करता यावी, यासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. परंतु त्यादृष्टीने कोणत्याही स्वरूपाचे नियोजन करण्यात आलेले नाही. नसबंदी केंद्रात कोणत्याही स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे ज्या काही पाच-दहा कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केल्या जातात त्यातील ५० टक्के यशस्वी होत आहेत. इतर कुत्र्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. महापालिकेकडे मनुष्यबळ नाही. निधीचाही अभाव आहे. अशा अडचणींमुळे हा उपक्रम कागदोपत्रीच राबविला जात आहे.

मनपाची सक्षम यंत्रणा नाही
शहरातील बेवारस कुत्र्यावर नसबंदी शस्त्रक्रिया केंद्रावर महापालिकेतर्फे कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही. औषध उपलब्ध नाही. कुत्री वाहून नेण्यासाठी कर्मचारी नाही. ज्या संस्थेकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे त्या संस्थेकडे कोणतीही यंत्रणा नाही. शस्त्रक्रिया केंद्रात सुविधा नसल्याने शस्त्रक्रिया क रण्यात आलेल्या कुत्र्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे. ज्यामुळे ज्या काही कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत त्यातील ५० टक्केच यशस्वी होत आहेत. दुसरीकडे सुविधा नसल्याने कुत्र्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यापूर्वी यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे.
- स्मिता मिरे, सेव्ह स्पीचलेस अ‍ॅनिमल आॅर्गनायझेशन

कालावधी निर्धारित करावा
नागपूर शहरात एक लाख बेवारस कुत्री आहेत. ही संख्या विचारात घेता नसबंदीसाठी कालावधी निश्चित करण्याची गरज आहे. चार ते पाच वर्षांत ही प्रक्रिया पूर्ण करावयाची असेल तर दररोज १२५ च्या आसपास शस्त्रक्रिया होण्याची गरज आहे. यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा महापालिकेने उपलब्ध करण्याची गरज आहे. शहरातील चार भागात केंद्र सुरू करावे. नसबंदी केंद्रात सर्व सुविधा असाव्यात. प्रशिक्षित पशुवैद्यकीय अधिकारी असावेत तरच हा उपक्रम यशस्वी होईल. परंतु महापालिक वा संबंधित संस्थांकडे अशी सक्षम यंत्रणा नाही.
- करिश्मा गिलानी, सदस्य पीपल्स फॉर अ‍ॅनिमल

Web Title: Street dogs problem in Nagpur is due to lethargic approach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.