राज्य शासनाने केस शिल्पी महामंडळ स्थापन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 11:55 PM2018-06-12T23:55:25+5:302018-06-12T23:55:37+5:30

The State Government should establish a case-maker corporation | राज्य शासनाने केस शिल्पी महामंडळ स्थापन करावे

राज्य शासनाने केस शिल्पी महामंडळ स्थापन करावे

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य नाभिक समाज : अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश करण्याची मागणीलोकमत व्यासपीठ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र नाभिक समाज राज्य शासनाकडे सन १९७९ पासून आरक्षणाची मागणी करीत आहे. या संदर्भात पाच वर्षांपूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर तब्बल दोन लाख नाभिक बांधवांनी आंदोलन केले होते. यासोबतच राजस्थान आणि मध्य प्रदेशाप्रमाणेच महाराष्ट्र शासनानेही राज्यातील लाखो नाभिक बांधवांच्या विकासासाठी राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेल्या राज्य केस शिल्पी महामंडळाची स्थापन करावी. शासनाने न्याय्य मागणी त्वरित मान्य करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य नाभिक संघटनेचे उपाध्यक्ष बंडू राऊत यांनी लोकमतशी बोलताना केली.
मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही केस शिल्पी महामंडळ स्थापन करा
महाराष्ट्र राज्य नाभिक संघटनेचे कार्याध्यक्ष अंबादास पाटील म्हणाले, समाजाने आरक्षणासाठी २६ मार्च १९७९ रोजी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाला पत्र लिहिले होते. शिवाय वारंवार पाठपुरावाही केला आहे. आंध्र प्रदेश, मेघालय, बिहार, उत्तराखंड, आसाम या पाच राज्यांमध्ये नाभिक समाज अनुसूचित जाती प्रवर्गात आहे. माहितीच्या अधिकारात समाजाला ११ जानेवारी २००८ रोजी प्राप्त पत्रात नाभिक समाजाची समावेश अनुसूचित जाती प्रवर्गात करता येईल, असे प्रधान सचिवांनी नमूद केले आहे. हीच मागणी समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रेटून धरली आहे. शिवाय राज्य केस शिल्पी महामंडळ स्थापनेसाठी समाज आग्रही आहे.
चर्चेदरम्यान महाराष्ट्र नाभिक समाजाचे सरचिटणीस रमेश लाकूडकर, संघटक गणेश धानोरकर, नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष श्याम आस्करकर, कार्याध्यक्ष गणपतराव चौधरी व सुरेश अतकरे, उपाध्यक्ष किशोर बोरकर, सरचिटणीस विष्णू ईजनकर, पश्चिम नागपूर अध्यक्ष महादेव जिचकार, संत नगाजी मठाचे सदस्य भास्कर विंचुरकर व नारायण मांडवकर उपस्थित होते.
६० हजार चौरस फूट जागेची मागणी
महाराष्ट्रात केस शिल्पी महामंडळ स्थापन झाल्यास खेड्यातून शहरात येणाऱ्या आणि या क्षेत्रात उच्चशिक्षण घेणाºया समाजातील तरुण-तरुणींना मदत मिळेल. समाज आता जागरूक झाला असून समाजाचे जाळे संपूर्ण राज्यात आहे. गावात आणि शहरात लहान सभागृह आहेत. पण राज्याच्या उपराजधानीत मोठे सभागृह नसल्याची खंत आहे. त्याकरिता ५० ते ६० हजार चौरस फूट जागेची मागणी नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नाभिक समाज दक्षिण नागपुरात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आ. सुधाकर कोहळे यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात येत आहे. या संदर्भात कोहळे यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.
सभागृहासाठी नितीन गडकरी यांनी दिला ५० लाखांचा निधी
सेंट्रल एव्हेन्यू रोड, तन्ना हॉस्पिटलमागे समाजाची ५ हजार चौरस फूट जागा आहे. जुने भाडेकरू खाली करण्यासाठी अशोक बोरकर यांनी मोलाची मदत केली. आता रिक्त प्लॉट आहे. तिथे श्री संत नगाजी महाराजांचे मंदिर आहे. सभागृहाचे बांधकाम आणि विकास कामांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ५० लाख रुपयांच्या निधी दिला आहे. याचे श्रेय बंडू राऊत यांना जाते. त्याचवेळी समाज बांधवांनी आठ दिवसांत १० लाख रुपये दिले, हे उल्लेखनीय.
नागपुरात समाजाचे १,१३,३१५ मतदार
नागपुरात समाजाची लोकसंख्या आठ लाखांपेक्षा जास्त असून १,१३,३१५ नोंदणीकृत मतदार आहेत. महाराष्ट्रातील नाभिक समाज आता जागरूक झाला आहे. तरुण-तरुणी उच्च शिक्षण घेत आहेत. अनेकजण विदेशात आहेत. त्यांची नोंदणी सुरूच आहे. संपूर्ण देशात पण उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यात सर्वाधिक समाज बांधव आहेत. उत्तर प्रदेशाच्या नाभिकाने भूतान देशातही सलून थाटले आहे. या सजग समाजाकडे आता कुणीही उपेक्षित म्हणून पाहू नये, असे बंडू राऊत यांनी सांगितले.
वरुड येथे सामूहिक विवाह व गुणवंतांचा सत्कार
संघटनेतर्फे दरवर्षी अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे राज्यातील सर्वात मोठा सामूहिक विवाह आणि गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम प्रवीण सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येतो. विदर्भातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात शहरांसह खेड्यापाड्यातून आणि मध्य प्रदेशातून समाजबांधव मोठ्या संख्येने गोळा होतात. खासदार, आमदार आणि अनेक मान्यवर हजेरी लावतात.
तरुण-तरुणींनी तांत्रिक व यांत्रिक शिक्षण घ्यावे
तरुण-तरुणींनी उच्च शिक्षित होऊन अद्ययावत सलून व ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू करावा. युवकांना दाढी, कटिंग येते, पण ते नाविन्य शिकत नाहीत. पण आता पिढीजात व्यवसायात तरुण आल्याने सलून अद्ययावत झाले आहेत. संबंधित शिक्षण घेऊनच सलून व पार्लर सुरू करावे. कॉस्मेटिक इंजिनिअरिंगमध्ये युवतींनी प्रवेश घ्यावा. उच्च शिक्षण घेऊन अनेकजण विदेशात नोकरी करीत आहेत. ब्युटी पार्लरवर पडलेल्या पोलिसांच्या धाडीत नाभिक समाजाचा कुणीही नाही, याचा समाजाचा अभिमान आहे. सर्वजण मेहनतीने काम करीत आहेत. राज्य शासनाने महामंडळ सुरू करून ५० कोटींचा निधी दिल्यास त्याचा फायदा समाजातील तरुण-तरुणींना उच्च शिक्षण घेण्यासाठी होईल, असे पाटील यांनी सांगितले.
रेशीमबाग येथे स्मारकासाठी जागेचा प्रस्ताव
१९४२ च्या भारत छोडो आंदोलनात माथेरान येथे शहीद झालेले हुतात्मा वीर भाई अण्णासाहेब कोतवाल यांचा अर्धकृती पुतळा बसविला आहे. पण पुतळ्याची जागा अजूनही समाजाला मिळाली नाही. त्याकरिता नागपूर सुधार प्रन्यासकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. अर्धकृती पुतळ्यासाठी नितीन गडकरी यांनी १ लाख आणि छोटू भोयर यांनी ५० हजार रुपयांचा निधी दिला आहे.
मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर नाभिक समाजाचे
नाभिक समाजातील अनेकांनी राजकारणात लौकिक मिळविला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर हे समाजाचे होते. याशिवाय विधानसभेचे माजी अध्यक्ष शंकरराव जगताप, आ. अशोक जाधव आणि नागपुरात बंडू राऊत हे दोनदा नगरसेवक, नासुप्रचे सदस्य आणि मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. तसेच अनेकजण यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत आहेत.
महाराष्ट्र नाभिक समाजाचे पदाधिकारी
अंबादास पाटील - कार्याध्यक्ष
बंडू राऊत - उपाध्यक्ष
रमेश लाकूडकर - सरचिटणीस
गणेश धानोरकर - संघटक
नागपूर जिल्हा पदाधिकारी
श्याम आस्करकर - अध्यक्ष
गणपतराव चौधरी - कार्याध्यक्ष
सुरेश अतकरे - कार्याध्यक्ष
किशोर बोरकर - उपाध्यक्ष
विष्णू इजनकर - सरचिटणीस
महादेव जिचकार - पश्चिम नागपूर अध्यक्ष
भास्कर विंचूरकर - सदस्य, संत नगाजी मठ
नारायण मांडवकर - संत नगाजी मठ, सदस्य

 

Web Title: The State Government should establish a case-maker corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.