Starting the election training: Employee participation at 40 thousand | निवडणूक प्रशिक्षणाला सुरुवात : ४० हजारावर कर्मचाऱ्यांचा सहभाग
निवडणूक प्रशिक्षणाला सुरुवात : ४० हजारावर कर्मचाऱ्यांचा सहभाग

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. या प्रशिक्षणात तब्बल ४० हजारावर कर्मचारी सहभागी झाले असून ते निवडणूक प्रक्रिया समजावून घेत आहेत.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, निवडणुकीच्या कामासाठी असलेल्या सर्वच कर्मचारी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होत असते. ते विविध स्तरावर सुरू आहे. प्रत्यक्ष बुथवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शुक्रवारपासून सुरू झाले आहे. नागपूर लोकसभा मतदार संघांतर्गत येणारे नागपूर दक्षिण-पश्चिम, दक्षिण नागपूर, पूर्व नागपूर, उत्तर नागपूर, मध्य नागपूर आणि पश्चिम नागपूर अशा सर्व विधानसभा आणि रामटेक लोकसभा मतदार संघातील कामठी आणि हिंगणा या विधानसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू झाले आहे. दोन पाळीत हे प्रशिक्षण घेतले जात आहेत. मास्टर्स ट्रेनर त्यांना प्रशिक्षण देत आहेत. येथे तब्बल ३२ हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे. तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील सावनेर, उमरेड, रामटेक आणि काटोल येथील विधानसभा मतदारसंघनिहाय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी होत आहे. येथे १२ हजाराच्या जवळपास कर्मचारी सहभागी झाले आहेत. २२ मार्चपर्यंत हे प्रशिक्षण चालेल.

व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक
या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅटचा पहिल्यांदाच वापर होत आहे. त्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना व्हीव्हीपॅट हाताळण्याबाबत विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी सुरेश भट सभागृहात २४ मशीनद्वारे प्रात्यक्षिक सुद्धा केले जात आहे.

२२ नंतर दुसरे प्रशिक्षण
निवडणुकीच्या कामात असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण होत असते. २२ तारखेपर्यंत हे प्रशिक्षण चालेल. त्यानंतर पुन्हा दुसरे प्रशिक्षण होईल.


Web Title: Starting the election training: Employee participation at 40 thousand
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.