रेल्वेगाड्यात ‘सीसीटीव्ही, आॅटोमॅटिक डोअर सिस्टिम’ सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:47 AM2018-08-14T00:47:14+5:302018-08-14T00:48:46+5:30

घाईगडबडीत रेल्वेगाडी पकडताना आणि धावत्या गाडीतून उतरताना अनेक प्रवासी गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे धावत्या गाडीत प्रवासी चढू आणि उतरू शकणार नाहीत, यासाठी रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वेगाड्यात मेट्रो रेल्वेच्या धर्तीवर ‘आॅटोमॅटिक डोअर सिस्टिम’ सुरू करावी आणि चोरी तसेच लुटमारीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी सर्व गाड्यात सीसीटीव्ही लावावेत, यासह खासदारांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसोबत झालेल्या बैठकीत विविध सूचना केल्या.

Start 'CCTV, Automatic Door System' in the train | रेल्वेगाड्यात ‘सीसीटीव्ही, आॅटोमॅटिक डोअर सिस्टिम’ सुरू करा

रेल्वेगाड्यात ‘सीसीटीव्ही, आॅटोमॅटिक डोअर सिस्टिम’ सुरू करा

googlenewsNext
ठळक मुद्देखासदारांच्या सूचना : मुंबईला जाणाऱ्या गाड्यांना बुटीबोरीला थांबा द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घाईगडबडीत रेल्वेगाडी पकडताना आणि धावत्या गाडीतून उतरताना अनेक प्रवासी गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे धावत्या गाडीत प्रवासी चढू आणि उतरू शकणार नाहीत, यासाठी रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वेगाड्यात मेट्रो रेल्वेच्या धर्तीवर ‘आॅटोमॅटिक डोअर सिस्टिम’ सुरू करावी आणि चोरी तसेच लुटमारीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी सर्व गाड्यात सीसीटीव्ही लावावेत, यासह खासदारांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसोबत झालेल्या बैठकीत विविध सूचना केल्या.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांनी नागपूर आणि भुसावळ विभागातील खासदारांसोबत आढावा बैठकीचे आयोजन नागपूर येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात केले. बैठकीत खासदार ज्योती धुर्वे, रामदास तडस, डॉ. विकास महात्मे, आनंदराव अडसुळ, संजय धोत्रे, प्रतापराव जाधव आदींनी आपापल्या क्षेत्रातील रेल्वेबाबतच्या समस्या मांडून योग्य त्या सूचना केल्या. यात नागपूर विभागातील खासदारांनी भोपाळ ते नागपूर नवी इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करावी, २२१११/२२११२ भुसावळ-नागपूर-भुसावळ दादाधाम साप्ताहिक एक्स्प्रेसला दररोज चालवावे, १२९१४/१२९२४ नागपूर-इंदोर आणि १२९१३/१२९२३ इंदोर-नागपूर या गाडीला नियमित करावे, नरखेड-अमरावती एक्स्प्रेसचा बैतुलपर्यंत विस्तार करून बैतुल रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या, वर्धा रेल्वेस्थानकाचा वर्ल्ड क्लास स्टेशननुसार विकास करावा, हावडा-पोरबंदर सुपरफास्ट एक्स्प्रेसला वर्धा येथे थांबा द्यावा, नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेसला धामणगाव येथे थांबा द्यावा, नागपूर-बल्लारशाह-नागपूर दरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करावी, सिकंदराबाद-नागपूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसला हिंगणघाट येथे थांबा द्यावा, पुलगाव, धामणगाव, वरुड, मोर्शी स्टेशनवर कोच इंडिकेटर लावावे, वर्धा, नरखेड, चंद्रपूर रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यात अनारक्षित कोच लावावे, मानवरहित रेल्वे क्रॉसिंग गेटवर बेरोजगार युवकांना कंत्राटी पद्धतीवर नोकरी देण्याच्या सूचना नागपूर विभागातील खासदारांनी केल्या. भुसावळ विभागातील खासदारांनी अचलपूर-मूर्तिजापूर यवतमाळ नॅरोगेज लाईनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करावे, नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस आणि हावडा-शिर्डी एक्स्प्रेसला बडनेरात थांबा द्यावा, अमरावती-नरखेड रेल्वे मार्गावर प्रवासी सुविधा उपलब्ध करून द्याव्या, रिद्धपूर येथे रेल्वेस्थानक तयार करावे, नरखेड-अमरावती एक्स्प्रेसला रिद्धपूर येथे थांबा द्यावा, चांदूर बाजार रेल्वेस्थानकाच्या पोस्ट आॅफिसमध्ये तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करावी, अमरावती-मुंबई गाडीत अमरावतीचा आरक्षण कोटा वाढवावा, भुसावळ विभागातील रेल्वेस्थानकावर बॅटरी कारची सुविधा उपलब्ध करावी, नागपूर-अकोला इंटरसिटी एक्स्प्रेस चालवावी, भुसावळ-अमरावती दरम्यान पॅसेंजर गाडी चालवावी आदी मागण्या केल्यात.
बैठकीच्या सुरुवातीला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांनी नागपूर आणि भुसावळ विभागात रेल्वे प्रशासनाने केलेल्या विकास कामांची माहिती उपस्थित खासदारांना दिली. बैठकीला नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ सोमेश कुमार, भुसावळचे ‘डीआरएम’ राम करन यादव, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक शैलेंद्र कुमार, मुख्य परिचालन व्यवस्थापक डी. के. सिंह, मुख्य अभियंता एस. के. अग्रवाल, मुख्य प्रशासन अधिकारी संजय कुमार तिवारी, उपमहाव्यवस्थापक दिनेश वशिष्ठ, महाव्यवस्थापकांचे सचिव साकेत कुमार मिश्रा, मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, एन. के. भंडारी उपस्थित होते.

प्रमुख मागण्या 

  • नागपूर-औरंगाबाद रेल्वेगाडी सुरू करा
  • मुंबईला जाणाऱ्या गाड्यांना बुटीबोरीत थांबा द्या
  • नागपूर-पुणे गरीबरथला धामणगाव येथे थांबा द्या
  • अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करा
  • सिकंदराबाद-नागपूर एक्स्प्रेसला हिंगणघाट येथे थांबा द्या
  • पुलगाव, धामणगाव, वरुड, मोर्शी स्थानकावर कोच इंडिकेटर बसवा
  • भुसावळ-अमरावती फास्ट पॅसेंजर गाडी सुरू करा
  • नरखेड-अमरावती एक्स्प्रेसला रिद्धपूर येथे थांबा द्या
  • दुरांतो, हावडा-शिर्डी एक्स्प्रेसला बडनेरात थांबा द्या

Web Title: Start 'CCTV, Automatic Door System' in the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.