विदर्भात वन्यजीव विभागात तयार होताहेत ‘स्पेशालिस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 02:28 PM2018-01-24T14:28:54+5:302018-01-24T14:29:17+5:30

वाढता मानव-वन्यजीव संघर्ष रोेखण्याकरिता आखण्यात आलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांतर्गत विदर्भात विशेषज्ञांनी सज्ज असे किमान १० शीघ्र बचाव दले स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या दलांसाठी ‘स्पेशलिस्ट’ तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

'Specialists' are preparing for the wildlife section of Vidharbha | विदर्भात वन्यजीव विभागात तयार होताहेत ‘स्पेशालिस्ट’

विदर्भात वन्यजीव विभागात तयार होताहेत ‘स्पेशालिस्ट’

Next
ठळक मुद्देमानव-वन्यजीव संघर्षावर दीर्घकालीन उपाययोजनेचा भाग

सविता देव हरकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: वाढता मानव-वन्यजीव संघर्ष रोेखण्याकरिता आखण्यात आलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांतर्गत विदर्भात विशेषज्ञांनी सज्ज असे किमान १० शीघ्र बचाव दले स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या दलांसाठी ‘स्पेशलिस्ट’ तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्प्यात गेल्या आठवड्यात वन विभागातील ५० निवडक कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण नागपुरातील वनामती येथे पार पडले. यामधून काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची छ्राननी करुन त्यांना पुढील प्रशिक्षण दिले जाईल.
याशिवाय मानव-वन्यजीव संघर्षाचे प्रमाण जास्त असलेल्या भागात प्रायमरी रिस्पॉन्स युनिट स्थापन करण्याचीही वन विभागाची योजना आहे. याअंतर्गत नागपूर विभागात गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यात ३०० ठिकाणांचा शोध घेण्यात आला आहे. हे दोन्ही दल मिळून मानव-वन्यजीव संघर्ष थोपविण्याचा प्रयत्न करतील.
वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी स्थानिक पातळीवर शिघ्र कृती दल स्थापन करण्यात आले आहेत. परंतु त्यात कार्यालयातील कुठल्याही कर्मचाऱ्यांचा वेळेवर समावेश केला जात असतो. शिवाय त्यांच्या कार्यप्रणालीत अनेक उणिवा असल्याचेही निदर्शनास आले आहे. या जलद बचाव गटातील अधिकारी किंवा कर्मचारी नेहमीच बदलत असल्याने त्यांच्यात परस्पर समन्वय नसतो. बेशुद्धीकरण करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि औषधांची देखभाल योग्य पद्धतीने होत नाही.
गटातील सदस्यांचे नियमित उजळणी प्रशिक्षण घेतले जात नसल्याने त्यांच्यात अपेक्षानुरुप कौशल्य आणि आत्मविश्वास वृद्धींगत होत नाही. उपयोगात येणारी उपकरणे आणि साहित्याची वेळोवेळी तपासणी होत नाही. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाची एखादी घटना घडल्यास त्यावर आवर घालण्यास ही पथके फारशी प्रभावी ठरत नाहीत. तेव्हा भविष्यात या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शास्रोक्त आणि पद्धतशीरपणे कर्मचाऱ्यांना सज्ज करण्याचा निर्णय झाला आहे. त्यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाणार असून या कामात देशविदेशातील तज्ञांचे सहकार्य घेतले जाणार आहे.

कुणाला मिळेल शीघ्र बचाव दलात प्रवेश
शीघ्र बचाव दलात सहभागी होणारा कर्मचारी अथवा अधिकारी शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. त्याचे वय ३५ वर्षांपर्यंत असावे. अपवादात्मक परिस्थितीत एखादा कर्मचारी मानव-वन्यजीव संघर्ष हाताळण्यात तरबेज आणि उत्सुक असल्यास वयाची अट शिथिल केली जाईल.
प्रत्येक गटात संपूर्ण छाननीनंतर पात्र १० कर्मचाऱ्यांची निवड होईल. त्यात वाहनचालकासह १० अधिकारी व कर्मचाऱ्यांची चमू असेल.
मानव-वन्यजीव संघर्ष हाताळण्यास इच्छुक निसर्गप्रेमी त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांनाही जलद बचाव गटात सहभागी करुन घेता येईल.
व्याघ्र प्रकल्पातील पशुवैद्यक अधिकाऱ्यांसोबतच वनविभागाला सेवा देणाऱ्या पशुवैद्यकांचाही यात समावेश असेल.

मानव-वन्यजीव संघर्षाचे बळी
गेल्या ५ वर्षात राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१७ लोक ठार.
३०,६२५ गुराढोरांचा बळी. पीक नुकसानीची १ लाख १४ हजार ३६३ प्रकरणे, पिकांच्या रक्षणासाठी कुंपणावर सोडण्यात येणाऱ्या वीज प्रवाहाच्या धक्क्यात वर्षभरात ७ वाघांचा मृत्यू.
मानव-वन्यजीव संघर्षावर नियंत्रणाकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञ आणि प्रशिक्षणाने सज्ज शीघ्र कृती दल स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

पहिल्या टप्प्यात ५० निवडक कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम अशा कर्मचाऱ्यांना निवडून सक्षम कृती दल स्थापन केले जातील. ही पथके कायमस्वरुपी राहणार असून मानव-वन्यजीव संघर्ष थोपविण्यात महत्त्वाची जबाबदारी वठविणार आहेत.
-ए.के. मिश्रा
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)


विदर्भातील १० शीघ्र बचाव दले असलेले प्रकल्प
पेंच-बोर व्याघ्र प्रकल्प
नागपूर विभाग
पांढरकवडा वनविभागा व वन्यजीव विभाग
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
चंद्रपूर विभाग
ब्रह्मपुरी वनविभाग
मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती
अमरावती विभाग
नवेगाव-नागझिरा, व्याघ्र प्रकल्प, गोंदिया
भंडारा व गोंदिया विभाग

Web Title: 'Specialists' are preparing for the wildlife section of Vidharbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.