शेतकरी आत्महत्यांबाबत संवेदनशील होते ‘सोमनाथदा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:36 AM2018-08-14T11:36:07+5:302018-08-14T11:40:33+5:30

देशाच्या संसदीय परंपरेचे पालन करण्यासाठी स्वत:च्या पक्षाची नाराजी ओढवून घेणारे सोमनाथ चटर्जी यांची ओळख ‘हेडमास्टर’ अशी झाली होती. स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘सोमनाथदा’ यांचे नागपूरशीदेखील ऋणानुबंध होते.

'Somnathda' sensitive about Farmers suicides | शेतकरी आत्महत्यांबाबत संवेदनशील होते ‘सोमनाथदा’

शेतकरी आत्महत्यांबाबत संवेदनशील होते ‘सोमनाथदा’

Next
ठळक मुद्देनागपूरने अनुभवला स्पष्ट वक्ता जनप्रतिनिधी मनपाने केला होता सत्कार

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाच्या संसदीय परंपरेचे पालन करण्यासाठी स्वत:च्या पक्षाची नाराजी ओढवून घेणारे सोमनाथ चटर्जी यांची ओळख ‘हेडमास्टर’ अशी झाली होती. स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘सोमनाथदा’ यांचे नागपूरशीदेखील ऋणानुबंध होते. ए.बी.बर्धन यांच्या कार्ययज्ञाने घडलेल्या डाव्या चळवळीच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. विशेष म्हणजे सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याअगोदर त्यांच्या मनातील संवेदनशीलता अनुभवण्याची संधी नागपूरकरांना मिळाली होती. नागपूरच्या भूमीवरून त्यांनी शेतकरी आत्महत्यांना राष्ट्रीय कलंक असे म्हणत हा मुद्दा संसदेत उचलून धरण्याचे सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले होते.
लोकसभा अध्यक्षपद भूषवत असताना सोमनाथ चटर्जी नागपुरात आले होते. १८ फेब्रुवारी २००८ रोजी सोमनाथ चटर्जी यांचे शहरात विविध ठिकाणी चार कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान, मनपाने त्यांचा नागरी सत्कारदेखील केला होता. मात्र तो दिवस गाजला होता तो सर्वार्थाने शेतकऱ्यांसंदर्भात त्यांनी राजकीय पक्षांवर ओढलेल्या आसूडाने. देशात प्रगतीचे दावे होत असताना विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात ही शरमेचीच बाब आहे. या आत्महत्यांचा राष्ट्रीय प्रश्न म्हणून विचार करण्याची वेळ आली आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपले मतभेद बाजूला सारून संसदेत या विषयावर निरपेक्षा चर्चा करावी, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले होते. त्यांच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दातून शेतकऱ्यांबद्दलची त्यांची आत्मीयता व चिंता स्पष्टपणे दिसून येत होती, अशी आठवण डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली.

प्रसारमाध्यमांनादेखील केला हितोपदेश
टिळक पत्रकार भवनात नागपूर श्रमिक पत्रकार भवनातर्फे ‘मीट द प्रेस’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांसमवेत शहरातील गणमान्य नागरिकांशीदेखील संवाद साधला होता. संसद किंवा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका करण्याचे स्वातंत्र्य प्रसारमाध्यमांना आहे. मात्र चांगल्या निर्णयांना तसेच समाजातील सकारात्मक बाबींनादेखील बातम्यांत स्थान द्यायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला होता. ‘स्टींग आॅपरेशन्स’वर बंदीची त्या काळी मागणी होत होती. मात्र यावर बंदी घालण्यापेक्षा बंधने असावीत असे त्यांनी सुचविले होते. ‘पेज ३’ संस्कृतीला त्यांचा अगोदरपासूनच विरोध होता व या कार्यक्रमातूनदेखील त्यांनी याचा पुनरुच्चार केला होता.

न्यायपालिकेतील भ्रष्टाचारावर सडेतोड भाष्य
सोमनाथ चटर्जी यांनी स्पष्टवक्ता नेता म्हणून ओळख होती. आपल्या मनातील भाव ते थेट बोलून मोकळे होते. नागपुरातील वकिलांनादेखील याचा अनुभव आला होता. हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे आयोजित अ‍ॅड.एन.एल.बेलेकर स्मृती व्याख्यानमालेत बोलताना माजी मुख्य न्यायमूर्ती एस.पी.भरुचा यांच्या वक्तव्याचा दाखला देत त्यांनी न्यायपालिकेतील भ्रष्टाचाराबाबत चिंता व्यक्त केली होती. सरकारने कशाप्रकार कार्य करावे याबाबत न्यायालयांकडून भाष्य अभिप्रेत नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले होते.

डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांशी जिव्हाळा
पश्चिम बंगाल ही सोमनाथ चटर्जी यांची कर्मभूमी राहिली असली तरी नागपुरशीदेखील त्यांचे विशेष ऋणानुबंध होते. डाव्या चळवळीच्या काही मोठ्या कार्यकर्त्यांची भेट घ्यायला ते काही वेळा नागपुरात आले होते. ए.बी.बर्धन ‘सीपीआय’चे राष्ट्रीय सरचिटणीस असताना सोमनाथ चटर्जी अनेकदा त्यांचे मार्गदर्शन घेत. शहरातील अनेक जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांचे जवळचे संबंध होते.

Web Title: 'Somnathda' sensitive about Farmers suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.