सीताबर्डी ठाण्यातून लाचखोर आरोपी पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:56 AM2019-04-24T00:56:05+5:302019-04-24T00:57:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई होऊ नये, यासाठी पोलिसांसोबत सेटिंग करून देण्याची भाषा वापरत ...

Sitabuldi Thane arrested in Thane | सीताबर्डी ठाण्यातून लाचखोर आरोपी पसार

सीताबर्डी ठाण्यातून लाचखोर आरोपी पसार

Next
ठळक मुद्देपोलिसांशी सेटिंग करून देण्याची बतावणी : एसीबीने लाच घेताना पकडले होते : पोलीस दलात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई होऊ नये, यासाठी पोलिसांसोबत सेटिंग करून देण्याची भाषा वापरत ८० हजार रुपये मागणाऱ्या रजत सुभाष ठाकूर (वय २९, रा. म्हाडा कॉलनी, हिंगणा) नामक दलालाला एसीबीच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी पकडले. त्याला सीताबर्डी ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ठाण्यात मोठ्या संख्येत एसीबीचे तसेच ठाण्यातील पोलीस हजर असताना, सर्वांच्या डोळ्यात धूळ झोकत रजत ठाकूर पळून गेल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
आरोपी ठाकूर पोलिसांचा दलाल (पंटर) म्हणून काम करतो. ठिकठिकाणच्या कुंटणखान्यांवर कारवाई करून देण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे समजते. त्यामुळे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकातील अनेकांसोबत त्याचा थेट संपर्क आहे. कुणावर कारवाई झाली, त्याचे नातेवाईक कोण, त्याचीही त्याला इत्थंभूत माहिती असते.
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने काही दिवसांपूर्वी एका कुंटणखान्यावर छापा मारून एकाला अटक केली. त्याच्या पत्नीसोबत आरोपी रजत ठाकूरने संपर्क साधला. तुमच्या पतीविरुद्ध झालेल्या कारवाईत त्यांना जामीन मिळावा म्हणून पोलीस प्रयत्न करतील तसेच भविष्यात त्याच्यावर कारवाई होणार नाही, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून आपण सर्व सेटिंग करून देतो, अशी हमी रजतने महिलेला दिली. त्याबदल्यात ८० हजारांची मागणी केली. महिलेने एवढी रक्कम देऊ शकत नाही, असे म्हटल्यानंतर त्याने ५० हजारांत सौदा पक्का केला होता. एकमुश्त रक्कम देता येत नसेल तर तीन किस्तीत रक्कम देण्याचेही त्याने सुचविले होते. महिलेने त्याला होकार देऊन सरळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यानुसार एसीबीने सापळा लावला. महिलेने आरोपी रजत ठाकूरला १५ हजारांची पहिली किश्त देण्याची तयारी दाखविली. त्याने तिला अमरावती मार्गावरील म्हाडा वसाहतीच्या खासगी बसथांब्याजवळ बोलविले. मंगळवारी सायंकाळी १५ हजारांची लाच घेऊन महिला तेथे पोहोचली. रजतने लाचेची रक्कम स्वीकारताच बाजुला घुटमळणाºया एसीबीच्या पथकाने त्याच्यावर झडप घातली. त्याला जेरबंद करून सीताबर्डी ठाण्यात आणण्यात आले.
एसीबीचे अधीक्षक श्रीकांत धीवरे, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख तसेच कर्मचारी रविकांत डहाटे, दीप्ती मोटघरे, मंगेश कळंबे, रेखा यादव आणि वकील शेख यांनी ही कामगिरी बजावली.
पोलिसाशी झटापट, मारहाण
पोलीस ठाण्यात रजतविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी तेथे एसीबीचे तसेच पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी हजर होते. रात्री ७.३० ते ८ दरम्यान सर्वांची नजर चुकवीत रजत ठाकूरने ठाण्यातून पळ काढला. ठाण्याबाहेर एसीबीचे वाहनचालक उभे होते. रजत पळताना दिसताच त्यांनी पाठलाग करून त्याला झाशी राणी चौकाजवळ पकडले. यावेळी वाहनचालकासोबत झटापट करून त्यांना मारहाण करीत आरोपी रजत पळून गेला. लाच घेताना रंगेहात पकडलेला आरोपी चक्क ठाण्यातून पळून गेल्याच्या वृत्ताने एसीबी तसेच पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली.
मिश्रासह तिघांची नावे चर्चेत!
रजत ठाकूरने महिलेसोबत बोलताना आपला साथीदार मिश्रा याचे गुन्हे शाखेतील अनेकांसोबत खास संबंध असून तोच कलेक्शनचे काम करतो, असे म्हटले होते. त्याने सेटिंग (लाचेचा सौदा) झाल्यानंतर आपल्या साथीदारालाही फोन केला होता. गुन्हे शाखेतील एकाच्या नावासोबत मिश्राचे संबंध सर्वश्रुत आहे. तो आधी भरोसा सेलमधील अधिकाऱ्याच्या नावाने कलेक्शन करायचा. त्याची मुख्यालयात बदली होऊनही फ्री हॅण्ड देण्यात आला होता. त्यामुळे त्याचे आणि त्याच्या निकटच्या दोघांची नावे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेला आली आहेत. एसीबी तसेच शहर पोलीस दलातील वरिष्ठांनी कडक भूमिका घेऊन तपासणी केल्यास रजत, मिश्रासारख्या अनेक दलालांच्या धक्कादायक नेटवर्कचा खुलासा होऊ शकतो.

 

Web Title: Sitabuldi Thane arrested in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.