शिवसेना विदर्भातील सर्व जागा लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:33 PM2018-05-23T22:33:46+5:302018-05-23T22:34:06+5:30

एका बाजूला भाजपाची कूटनीती आहे तर दुसऱ्या बाजूला बेधडक शिवसैनिक आहे. त्यामुळे कुणाचीही चिंता वाटत नाही. शिवसेना स्वबळावर विदर्भातील सर्व ६२ जागा लढविणार असून चांगले यशही मिळवून दाखवेल, असा विश्वास शिवसेनेचे संपर्क प्रमुख व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केला.

Shiv Sena will fight all the seats in Vidarbha | शिवसेना विदर्भातील सर्व जागा लढविणार

शिवसेना विदर्भातील सर्व जागा लढविणार

Next
ठळक मुद्देदिवाकर रावते : आयात उमेदवारांवर भाजपाची भिस्त

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : एका बाजूला भाजपाची कूटनीती आहे तर दुसऱ्या बाजूला बेधडक शिवसैनिक आहे. त्यामुळे कुणाचीही चिंता वाटत नाही. शिवसेना स्वबळावर विदर्भातील सर्व ६२ जागा लढविणार असून चांगले यशही मिळवून दाखवेल, असा विश्वास शिवसेनेचे संपर्क प्रमुख व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केला.
विदर्भातील पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी रावते हे बुधवारी नागपुरात दाखल झाले. त्यांनी भंडारा- गोंदिया व नागपूर अशा तीन जिल्ह्यांचा आढावा घेतला. बैठकीनंतर पत्रकारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निरंजन डावखरे यांनी भाजपात प्रवेश केल्याकडे लक्ष वेधले असता रावते म्हणाले, भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष आहे. इतर पक्षातून माणसे घेऊन निवडणुका लढवायचे काम भाजप करीत आहे. आयातीवरच पक्ष चालणार असेल तर एक दिवस ते त्यांना चांगलेच महागात पडेल. लोकशाही व घटनेचा सन्मान करणाऱ्या पक्षाचा जनता सन्मान करते. हे कर्नाटकने दाखवून दिले आहे. शिवसेनेने भाजपाची साथ सोडली तर शिवसेनेचे आमदार फुटतील, या रामदास आठवले यांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. रामदास आठवले विनोद करतात, हे माहीत आहे. मात्र, ते एवढा राष्ट्रीय विनोद करतील हे माहीत नव्हते, अशा शब्दात त्यांनी आठवले यांची खिल्ली उडविली.
एसटीच्या भाडेवाढीचे संकेत
 सातत्याने होत असलेल्या डिझेल भाववाढीमुळे एसटीची भाडेवाढ होण्याचे संकेत रावते यांनी दिले. ते म्हणाले, पूर्वी एखादवेळी इंधनवाढ होत होती. आता मात्र सातत्याने होत आहे. गेल्यावर्षी याच महिन्यात डिझेल ५७ रुपये होते. आता १० रुपयांनी वाढले आहे. या वाढीमुळे एसटीला ४६० ते ४७० कोटींचा अतिरिक्त भार सहन करावा लागला आहे. याशिवाय एक लाख कामगारांची पगारवाढही तोंडावर आहे. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी भाडेवाढीचा प्रस्ताव दिल्यास सरकार त्यावर निर्णय घेईल. मात्र, डिझेल दरवाढ पाहता भाडेवाढीची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नोटा फाडणे हा देशद्रोह
भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी हातगाडी चालविणाऱ्याच्या जवळील नोटा घेऊन फाडल्या. यावर रावते म्हणाले, खासदाराने नोटा फाडणे यावर केंद्रीय अर्थमंत्री व रिझर्व्ह बँकेचे प्रमुख काय मत देतात ते महत्त्वाचे आहे. नोटांवर देश चालतो, ही राष्ट्रीय मुद्रा आहे. त्यामुळे नोटा फाडणे हा राजद्रोह आहे का, असेल तर काय शिक्षा व्हावी, यावर विचार व्हावा. हा विषय सोमय्यांच्या निमित्ताने चर्चेला आला आहे. यामुळे लोक पुढे नोटांचा जपून वापर करतील. कुणी अवमान करणार नाही.

Web Title: Shiv Sena will fight all the seats in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.