शहा-फडणवीस-गडकरी यांची जादू चालली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 10:04 PM2019-05-24T22:04:55+5:302019-05-24T22:06:19+5:30

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारासाठी राष्ट्रीय पातळीवरील विविध नेत्यांनी सभा घेतल्या. मात्र या सर्वांमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची जादू चालल्याचे चित्र दिसून आले. खुद्द गडकरी यांनीदेखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या. या सर्वांचा महायुतीला फायदा झाला.

Shah-Fadnavis-Gadkari's magic | शहा-फडणवीस-गडकरी यांची जादू चालली

शहा-फडणवीस-गडकरी यांची जादू चालली

Next
ठळक मुद्देजाहीर सभांमुळे वातावरणनिर्मिती : उद्धव-आदित्य ठाकरेंनी रामटेक गाजविले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारासाठी राष्ट्रीय पातळीवरील विविध नेत्यांनी सभा घेतल्या. मात्र या सर्वांमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची जादू चालल्याचे चित्र दिसून आले. खुद्द गडकरी यांनीदेखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या. या सर्वांचा महायुतीला फायदा झाला.
प्रचाराच्या काळामध्ये प्रचारसभा व रॅलीसाठी प्रशासनाकडे ११० हून अधिक अर्ज आले होते. यात मोठ्या नेत्यांच्या सभांचादेखील समावेश होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व रामटेकचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्या प्रचारासाठी सत्ताधाऱ्यांकडून अमित शहा, केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय पाणीपुरवठामंत्री उमा भारती, माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसैन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे इत्यादींनी सभा घेतली होती.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी अमित शहा यांची पूर्व नागपुरात सभा झाली. भर उन्हात झालेल्या सभेला हाऊसफुल्ल गर्दी होती. कॉंग्रेस आघाडीकडे नेता, नीती या दोन्ही गोष्टी नाही आणि सिद्धांताचा अभाव आहे, असे त्यांनी टीकास्त्र सोडत जनतेच्या भावनांना हात घातला होता तर मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघ पिंजून काढत. स्थानिक व राष्ट्रीय मुद्द्यांना हात घालत जनतेला साद घातली होती. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर तर त्यांनी हा जैश-ए-मोहम्मदचा जाहीरनामा आहे का या शब्दांत टीका केली होती. रामटेकमध्ये शिवसेना प्रदेशाध्यक्ष उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्या ठाकरे यांच्या सभांचा प्रभाव दिसून आला.
राहुल गांधींची सभा गाजली
कॉंग्रेसचे नागपूरचे उमेदवार नाना पटोले व रामटेकचे उमेदवार किशोर गजभिये यांच्या प्रचारासाठी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील कस्तूरचंद पार्क येथे सभा घेतली होती. या सभेला अपेक्षेहून जास्त गर्दी झाली होती. राहुल यांनी सभेत राफेल करारावरुन केंद्रावर टीकास्त्र सोडत निवडणूकांनंतर राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यात येईल व सहभागी चौकीदार तुरुंगात जातील, असे प्रतिपादन केले होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नागपूर व रामटेक मतदारसंघात सभा घेतल्या. मात्र दोन्ही उमेदवारांना त्या विजयी करु शकल्या नाहीत.
ओवैसींच्या सभेतील गर्दी मतांमध्ये परावर्तित नाही
सागर डबरासे यांच्या प्रचारासाठी ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी व वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांची इंदोरा चौक येथे सभा झाली होती. सभेला गर्दीदेखील मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र प्रत्यक्षात अपेक्षेप्रमाणे आघाडीला मतं मिळू शकली नाही. ओवैसी यांनी मुद्यांच्या आधारे निर्माण केलेले वातावरण मतात परावर्तित झाले नाही.
मायावतींच्या आश्वासनाचा प्रभावच नाही
बसपा अध्यक्ष मायावती यांची कस्तूरचंद पार्क येथे सभा झाली होती. या सभेला जनतेची गर्दी होती. बसपा सत्तेवर आल्यास प्रत्येक गरीब व्यक्तीला शासकीय व अशासकीय सेवेत कायमस्वरूपी नोकरी देण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र मतदारांवर या आश्वासनाचा प्रभाव दिसूनच आला नाही.

 

Web Title: Shah-Fadnavis-Gadkari's magic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.